29 March 2020

News Flash

कर बोध : अग्रिम कराचा अंतिम हफ्ता १५ मार्चपूर्वी..

करदात्यांनी व्याज भरण्यापासून सुटका करून घेण्यासाठी आपला अग्रिम कराचा हा शेवटचा हफ्ता १५ मार्चपूर्वी भरावा.

||  प्रवीण देशपांडे

आर्थिक वर्ष २०१९-२० चा (कर निर्धारण वर्ष २०२०-२१) अग्रिम कराचा चौथा आणि शेवटचा हफ्ता भरण्याची वेळ आली आहे. हा हफ्ता भरण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२० अशी आहे.

अग्रिम कर कोणी भरावयाचा आहे : ज्या करदात्यांचे अंदाजित करदायित्व १० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात. ज्या करदात्याच्या उत्पन्नातून उद्गम कर (टीडीएस) कापला जातो अशा करदात्यांना अग्रिम कराच्या तरतुदीसाठी अंदाजित करदायित्व गणताना उत्पन्नावरील टीडीएस वजा केल्यानंतर देय कर १० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर अग्रिम कर भरावा लागतो.

 

अग्रिम कर कसा गणावा आणि किती भरावा :

करदात्याने २०१९-२० या आर्थिक वर्षांत अंदाजित उत्पन्नाचा आढावा घेऊन, त्या उत्पन्नातून प्राप्तिकर कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या वजावटी (गृहकर्ज, कलम ८० सी वगरे) विचारात घेऊन बाकी उत्पन्नावर एकूण किती कर भरावा लागेल याची गणना करावी या रकमेतून टीडीएस वजा करावा आणि बाकी कर हा अग्रिम कराच्या रूपाने भरावा. करदात्याला नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त काही उत्पन्न अग्रिम कराचा एखादा हफ्ता भरल्यानंतर मिळाले असेल, (भांडवली नफा, करपात्र भेट वगरे) तर असे उत्पन्न अग्रिम कराचा पुढील हफ्ता भरताना विचारात घ्यावे.

सारांशात..

  • एकूण देय करातून उद्गम कर (टीडीएस) वजा केल्यानंतर करदायित्व १० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तरच अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात.
  • अतिज्येष्ठ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नात जर धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नसेल तर त्यांना अग्रिम कर भरावा लागणार नाही त्यांनी संपूर्ण देय कर विवरणपत्र भरण्यापूर्वी भरला तरी त्यांना व्याज भरावे लागणार नाही.
  •   ज्येष्ठ नागरिक अनिवासी भारतीय असेल आणि त्याच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाचा समावेश नसला तरी त्याला अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात, अनुमानित कराचा फायदा करदात्याने घेतल्यास त्याला संपूर्ण १०० टक्के कर एकाच हप्त्यात १५ मार्चपूर्वी भरावा लागेल.
  • अग्रिम कर कसा भरावा : अग्रिम कर ऑनलाइन किंवा बँकेत चलन देऊन भरता येतो. यासाठी २८० क्रमांकाचे चलन वापरावे.
  • अग्रिम कर न भरल्यास, कमी किंवा उशिरा भरल्यास : अग्रिम कर न भरल्यास, कमी भरल्यास किंवा मुदतीनंतर भरल्यास व्याज भरावे लागते.
  • अग्रिम कर जास्त भरल्यास : अग्रिम कर जास्त भरल्यास विवरणपत्र भरून कर परताव्याचा (‘रिफंड’चा) दावा करता येतो.

 

करदात्यांनी व्याज भरण्यापासून सुटका करून घेण्यासाठी आपला अग्रिम कराचा हा शेवटचा हफ्ता १५ मार्चपूर्वी भरावा. जे करदाते १५ मार्चपूर्वी अग्रिम कराचा हफ्ता भरू शकत नाहीत त्यांनी हा कर ३१ मार्चपूर्वी भरल्यास तो अग्रिम कर म्हणून समजला जाईल. अग्रिम कर भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी जर बँकेला सुट्टी असेल तर अग्रिम कराचा भरणा लगेचच दुसऱ्या दिवशी करता येतो.

  •  लेखक सनदी लेखाकार व कर सल्लागार

pravin3966@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 12:04 am

Web Title: financial year last week tds akp 94
Next Stories
1 बंदा रुपया : परिघापुढचे पाऊल..
2 थेंबे थेंबे तळे साचे : करोना उद्रेक  संकट  की  संधी?
3 नावात काय : चलनवाढ
Just Now!
X