16 October 2019

News Flash

सातत्याने २५ टक्क्यांहून अधिक परतावा!

माझा पोर्टफोलियो

|| अजय वाळिंबे

वर्ष १९८१ मध्ये स्थापन झालेली फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आज भारतातील पीव्हीसी-यू पाइप्स आणि फिटिंग्ज यामधील एक अग्रणी कंपनी असून, पीव्हीसी रेझिनचे उत्पादन करणारी दुसऱ्या क्रमांकाची मोठी उत्पादक कंपनी आहे. फिनोलेक्सचे महाराष्ट्रात रत्नागिरी आणि पुण्यात तर गुजरातमध्ये मसार येथे अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प असून कंपनीची चिंचवड, कटक, दिल्ली आणि इंदूर येथे वितरण केंद्रे आहेत. देशभरात कंपनीची १५,००० हून अधिक रिटेल विक्री दालने आहेत. पीव्हीसी कॉम्प्लेक्सचा एक भाग म्हणून कंपनीने भारतीय खासगी क्षेत्रातील पहिलीच ‘क्रायोजेनिक जेटी’देखील स्थापित केली आहे.

कंपनीची उत्पादने प्रामुख्याने कृषी क्षेत्र तसेच गृह, औद्योगिक आणि बांधकाम व्यवसायातदेखील वापरली जातात. कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी ४५ टक्के उलाढाल पीव्हीसी व्यवसायातील असून सुमारे ५५ टक्के उलाढाल पाइप आणि फिटिंग्समधून आहे. पीव्हीसीची वार्षिक उत्पादन क्षमता २९,००० टन असून गेल्याच वर्षांत कंपनीने २५० कोटी रुपयांचा भांडवली प्रकल्प राबवून आपल्या पाइप आणि फिटिंग्सची क्षमता ३७,००० टनांपर्यंत वाढवली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारी क्षेत्रातील युद्ध तसेच कच्च्या तेलाच्या किमती यांवर कंपनीच्या कच्च्या मालाच्या किंमती अवलंबून असल्याने मध्यंतरीच्या काळात कंपनीच्या कामगिरीवर परिणाम झाला होता. मात्र आता कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने पीव्हीसी रेझिनच्या उत्पादन खर्चात साधारण १२ ते १५ टक्के घट होईल. डिसेंबर २०१८ अखेर समाप्त नऊ माहीसाठी कंपनीने २,१५६.३९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २५८.४१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांकरिता कंपनी ३०० कोटी रुपयांचा नक्त नफा कमावू शकेल अशी अपेक्षा आहे. अत्यल्प कर्ज असलेल्या फिनोलेक्सने गेल्या वर्षभरात (२६.७ टक्के) परतावा दिला असला तरीही आगामी वर्षांत मात्र हा परतावा +२५ टक्के असेल अशी आशा आहे.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on March 11, 2019 12:03 am

Web Title: finolex industries ltd bse code 500940