tax121आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com  या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com

प्रश्न: मी एका सरकारी खात्यात नोकरी करतो. २००९ मध्ये मी पुण्यात एक घर विकत घेतले. त्यासाठी मी गृहकर्ज घेतले आहे आणि ५००० रुपये हफ्ता भरतो. २०१३ मध्ये मी उस्मानाबाद मध्ये दुसरे घर विकत घेतले या घरासाठी सुद्धा मी गृहकर्ज घेतले आहे. मला दोन्ही गृहकर्जाच्या परतफेडीच्या वजावटी मिळू शकतील का?
– सुनील साठे
उत्तर: आपण दोन्ही घरच्या गृहकर्जावरील मुद्दल आणि व्याजाच्या वजावटी घेऊ शकता. एकापेक्षा जास्त घरे असतील तर फक्त एका घरावरील उत्पन्न करमुक्त असते आणि बाकीच्या घरांवर भाडय़ाचे उत्पन्न दाखवून (जरी घर भाडय़ाने दिले नसले तरी) व्याजाच्या आणि मुद्दल परतफेडीवर मिळणारी वजावट घेऊ शकता. परंतु कलम ‘८० क’ खाली मिळणारी वजावट ही एकूण १,५०,००० रुपये मर्यादेपर्यंतच आहे. कलम २४ खाली मिळणारी व्याजाची वजावटीची मर्यादा एका घरासाठी (जे राहते घर आहे आणि ज्याचे भाडे उत्पन्न शून्य आहे) त्यासाठी २,००,००० रुपये आणि एकापेक्षा जास्त घरांसाठी भरलेल्या व्याजाची वजावट मिळते.

प्रश्न: मी अनिवासी भारतीय आहे. मी ऑगस्ट १९७८ मध्ये मुंबईत एक घर ६०,००० रुपयांना विकत घेतले होते. आता त्याचा बाजार भाव १ कोटी ८० लाख रुपये आहे. मी घर विकले तर मला किती कर भरावा लागेल? हे घर मी माझ्या मुलीला भेट दिले तर माझ्या मुलीला किती कर भरावा लागेल?
– अनंत मिसाळ
उत्तर: आपण घर विकले तर भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. आपल्याला १९८१ सालचे बाजारभाव/ मूल्य काढावे लागेल आणि त्यावर महागाई निर्देशांकानुसार किंमत काढून भांडवली नफा काढावा लागेल आणि या नफ्यावर २०% दराने कर भरावा लागेल. उदा. १९८१ सालचे मूल्य २ लाख रुपये इतके आहे आणि २०१४-१५ या आर्थिक वर्षांचा महागाई निर्देशांक १०२४ आहे तर खरेदी मूल्य हे २०,४८,००० (2 लाख रुपये ७ १०२४/१००) इतके असेल आणि भांडवली नफा हा विक्री किंमत १ कोटी ८० लाख रुपये वजा २०,४८,००० रुपये म्हणजेच १,५९,५२,००० रुपये इतका असेल. त्यावर २०% दराने कर भरावा लागेल. हा कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. हे घर मुलीला भेट दिले तर त्यावर तिला कर भरावा लागणार नाही.    

प्रश्न: मी मित्राबरोबर नुकतीच भागीदारी संस्था स्थापन केली आहे. या भागीदारी संस्थेला जे उत्पन्न मिळते ते आम्ही भागीदार कशा प्रकारे आमच्या उत्पन्नात दाखवू शकतो? त्यावर भागीदारी संस्थेला आणि भागीदारांना कसा आणि किती कर भरावा लागेल?
– नितीन निरगुडकर
उत्तर: भागीदारी संस्थेला मिळणाऱ्या उत्पन्नावर संस्थेला कर भरावा लागतो हा कर ३०% इतका आहे. त्यावर १०% अधिभार (जर उत्पन्न १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर) आणि ३% शैक्षणिक कर भरावा लागेल. भागीदारी संस्थेकडून काम करणाऱ्या भागीदारांना पगार, व्याज  आणि संस्थेच्या लाभाचा हिस्सा (याची तरतूद भागीदारी करार पत्रात असली पाहिजे) भागीदारांना मिळू शकतो. भागीदारांना मिळणाऱ्या पगार आणि व्याज यांना प्राप्तिकर कायद्यात काही मर्यादा आहेत. हा पगार आणि व्याज हे भागीदारांना करपात्र आहे आणि लाभाचा हिस्सा हा भागीदारांना करमुक्त आहे. पगार आणि व्याज जे करपात्र आहे त्यातून प्राप्तिकर कायद्यातील वजावटी (जसे ८०क, गृहकर्जाच्या व्याज-मुद्दलफेडीच्या वजावटी इत्यादी) नंतर येणाऱ्या रकमेवर तुमच्या करनिर्धारण टप्प्याप्रमाणे – इन्कम स्लॅबनुसार कर भरावा लागेल.

प्रश्न: माझ्या मित्राने एक प्लॉट मला १५ लाख रुपये इतक्या कमी भावात विकला. जेव्हा या प्लॉटची नोंदणी केली तेव्हा त्याचे मुद्रांक शुल्कासाठी मूल्यांकन ३२ लाख रुपये होते. या व्यवहारावर मला कर भरावा लागेल का?
– मनीषा सावंत
उत्तर: अपुऱ्या किमतीत विकत घेतलेल्या मालमत्तेची रक्कम आणि मुद्रांक शुल्कासाठी झालेले मूल्यांकन यातील फरकाची रक्कम ही इतर उत्पन्नात गणली जाते. त्यामुळे १७ लाख रुपये (मुद्रांक शुल्कासाठी मूल्यांकन ३२ लाख वजा खरेदी किंमत १५ लाख रुपये) हे इतर उत्पन्नात दाखवून त्यावर तुमच्या इन्कम स्लॅबप्रमाणे कर भरावा लागेल.

प्रश्न: माझ्याकडे एका शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीचे ५०० शेअर्स होते. हे शेअर्स मी २००८ साली विकत घेतले होते. या कंपनीने जानेवारी २०१४ मध्ये २०० शेअर्स बोनस म्हणून दिले. असे हे एकूण ७०० शेअर्स मी नोव्हेंबर २०१४ मध्ये शेअर बाजारामार्फत विकले. या विक्रीतून मिळालेला नफा हा करपात्र आहे का?
– सचिन गोटे
उत्तर: आपण २००८ मध्ये घेतलेले ५०० शेअर्स हे एक वर्षांहून अधिक कालावधीपूर्वी घेतल्यामुळे त्यावर झालेला नफा हा दीर्घ मुदतीचा आहे. त्यावर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरलेला असल्यामुळे ५०० शेअर्सवरचा नफा हा कलम १०(३८) नुसार करमुक्त आहे. परंतु आपल्याला मिळालेले बोनस २०० शेअर्स हे आपण एक वर्षांच्या आत विकल्यामुळे त्यावर होणारा नफा हा अल्पमुदतीचा आहे. त्यावर १५% इतका कर भरावा लागेल. बोनस शेअर्सचे खरेदी मूल्य हे शून्य गणले जाते. त्यामुळे जेवढे पसे विक्रीतून मिळाले ते पूर्णपणे करपात्र आहेत. त्या सर्व रकमेवर १५% दराने कर भरावा लागेल.

प्रश्न: मला माझ्या सासऱ्यांच्या भावाकडून २५,००० रुपये भेट  स्वरूपात मिळाले. ते मला करपात्र आहेत का?
– सारांश मोरे
उत्तर: प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीप्रमाणे नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी करमुक्त असतात. सासऱ्यांचे भाऊ हे प्राप्तिकर कायद्याप्रमाणे ‘नातेवाईक’ या व्याख्येमध्ये बसत नाहीत म्हणून त्यांच्याकडून मिळालेली भेट ही करपात्र आहे. परंतु एका वर्षांत मिळालेल्या एकूण रोख भेटी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असतील तरच त्या करपात्र आहेत. त्यामुळे जर आपल्याला या भेटी व्यतिरिक्त इतर कोणत्याही रोख भेटी मिळाल्या नसतील तर ही २५ हजार रुपयांची भेट करमुक्त आहे.
प्रश्न: माझे एक घर मी भाड्याने दिले आहे. मला त्याचे दरमहा १५,००० रुपये भाडे मिळते. नगरपालिका मला मालमत्ता कराचे देयक (२४ हजार रुपये वार्षकि) पाठवते. परंतु मी काही कारणाने मागील वर्षांचा मालमत्ता कर भरला नाही. प्राप्तिकर कायद्याप्रमाणे मला या मालमत्ता कराची वजावट भाडय़ाच्या उत्पन्नातून मिळेल का?
– स्नेहल पवार
उत्तर: मालमत्ता कर हा भरला असेल तरच त्याची वजावट घेऊ शकतो. आधी तो भरला गेला पाहिजे. आपण हा कर भरला नसल्यामुळे त्याची वजावट घेता येणार नाही.
(लेखक सनदी लेखाकार असून, व्यावसायिक कर-सल्लागार आहेत.)