niyojanगुंतवणुकीच्या परिपक्वतेला पुरेसा वेळ द्यावाच लागतो. मागील दहा वर्ष न केलेल्या कामाचा अनुशेष एका महिन्यात भरून काढणे शक्य नाही. नियोजन करा आणि ठरावीक शिरस्त्याने गुंतवणूक करा. शिवाय केलेल्या गुंतवणुकीचा निदान वर्षांतून एकदा आढावा घेणे गरजेचे आहे.
अनेक ‘अर्थवृत्तान्त’चे वाचक प्रत्यक्ष भेटीची इच्छा व्यक्त करतात. कोणत्याही लेखकाला आपल्या वाचकांना भेटणे आवडते, पण हे शक्य होतेच असे नाही. मागील आठवडय़ात गोंदवलेकर येथे समाधी उत्सवात ‘लोकसत्ता’च्या वाचक असलेल्या एक प्रसूतीतज्ज्ञ सहज भेटल्या. डॉक्टरांचे पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णेच्या पाण्यामुळे समृद्धी प्राप्त झालेल्या एका तालुक्याच्या ठिकाणी स्वत:चे सूतिकागृह आहे. अर्थ वृत्तान्त वाचत असल्याने डॉक्टरांना समभागसदृश्य गुंतवणुकीचे महत्त्व पटले होते. महाराजांच्या पालखीसोबत नगर प्रदक्षिणेदरम्यान डॉक्टरीण बाईंनी एक प्रश्न सहज विचारला, ‘‘बँकेतील पशांतून दहा लाखांचे शेअर्स महिन्याभरात घेतले तर चालतील का?’’ असा त्यांचा प्रश्न होता. बाई प्रसूतीतज्ज्ञ असल्याने त्यांना समजेल अशा भाषेत प्रतिप्रश्न केला, तुम्हाला नऊ गर्भवती स्त्रिया दिल्या व एका महिन्यात बाळ आणा असे सांगितले तर ते शक्य आहे काय? एखाद्या जोडप्याने बाळ हवे ठरविले तरी बाळ या जगात यायला कमीत कमी नऊ महिने व काही दिवस लागतात. त्याचप्रमाणे गुंतवणुकीलाही पुरेसा वेळ द्यावाच लागतो. मागील दहा वर्ष न केलेल्या कामाचा अनुशेष एका महिन्यात भरून काढणे शक्य नाही. म्हणून या डॉक्टरीण बाईनी मासिक एक लाखाची एसआयपी पुढील पाच वष्रे करता येईल अशा दहा फंडाची नावे सांगितली. बाईंचे नियोजन अनेक वैद्यकीय व्यावसायिकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. आज मात्र आणखी एका पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या युवकाचे नियोजन पाहू.
मूळचे अहमदनगर जिल्ह्य़ातील कोपरगाव तालुक्यातील असलेले डॉ.पराग काटे (३०) हे फार्मकॉलॉजी या विषयात एमडी करीत आहेत. त्यांनी नाशिकच्या विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली. या शिक्षणासाठी त्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले होते. या कर्जाचा मोठा हिस्सा त्यांच्या वडिलांनी फेडला. त्यांचे आईवडील कोपरगांव येथे राहतात. वडील निवृत्त प्राध्यापक व आई गृहिणी आहेत. वडिलांना निवृत्तिवेतन मिळते. थोरली बहीण विवाहित आहे. डॉ.पराग यांनी वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर दोन वष्रे मुंबईत अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी केली. या काळात त्यांना जे वेतन मिळत होते त्या वेतनातून त्यांनी स्वत:चा खर्च भागवून शैक्षणिक कर्जाचा काही हिस्सा फेडला. ऑगस्ट २०१४ पासून त्यांना मुंबई महानगर पालिकेच्या लोकमान्य टिळक रुणालय व वैद्यकीय महाविद्यालय (सायन हॉस्पिटल) येथे प्रवेश मिळाला. तीन वर्षांनंतर म्हणजे साधारण जून २०१७ दरम्यान त्यांचे महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण होईल. त्यानंतर त्यांनी एक वर्ष सक्तीची सरकारी नोकरी करणे अपेक्षित आहे. त्यांना पदव्युत्तर पदवी मिळण्यास अजून चार वष्रे लागतील. म्हणजे त्यांच्या उत्पन्नाला सुरुवात त्यांच्या वयाच्या ३४व्या वर्षी सुरू होईल. दरम्यानच्या काळात त्यांच्या आईवडिलांनी डॉ.पराग यांच्यासाठी सुयोग्य वधूचा शोध सुरू केला असून येत्या वर्षभरात ते विवाहबद्ध होतील. फार्मकॉलॉजी या विषयात एमडीची पदवी घेतल्यानंतर स्वतंत्र व्यवसायास मर्यादित वाव असतो. साहजिकच त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकी किंवा औषध निर्माण कंपनीत नोकरी हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहेत.

मुलगा अथवा मुलगी कमावते झाल्यानंतर मुलांपेक्षा त्यांच्या आईवडिलांचे बचत म्हणजे आयुर्वमिा हे समीकरण पक्के असल्याने पहिल्यांना एखादी एन्डोंमेंट अथवा मनीबॅक योजना खरेदी केली जाते. परंतु विमा हा बचतीसाठी नव्हे तर जोखीमेचे व्यवस्थापन करण्यासाठी घ्यायची गोष्ट आहे. म्हणून नियोजनाची सरुवात मुदतीचा विम्याने (टर्म इन्श्युरन्स)करणे इष्ट ठरते. डॉ. काटे सध्या महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात राहतात. सध्याच्या त्यांच्या अंदाजपत्रकानुसार ४० हजार वेतनापकी १० हजार खर्चून ३० हजार शिल्लक राहतात. त्यांनी दीड ते दोन कोटीचा २५ वष्रे मुदतीचा विमा खरेदी करावा. पूर्ण वेळ नोकरी सुरू झाल्यानंतर टप्याटप्याने त्यांनी आपले एकूण विम्याचे कवच पाच कोटीपर्यंत वाढवत न्यायचे आहे. त्यांचा पगार जसा वाढत जाईल तसे त्यांची विमा पात्रता वाढत जाईल. आजच्या घटकेला त्यांना दीड कोटीपेक्षा जास्त विमा मिळू शकणार नाही. परंतु अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई मिळणारे विमा कवच घेणे शक्य आहे.
डॉ. काटे यांच्या कुटुंबात दोन ज्येष्ठ नागरिक आहेत. अशा कुटुंबाला आरोग्य विम्याची आवश्यकता नक्कीच आहे. म्हणून त्यांनी न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीची पाच लाखांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चाच्या विमाछत्राचे संरक्षण देणारी पॉलिसी घ्यावी. एकाद्या वर्षांनंतर या योजनेचे छत्र वाढविण्यासाठी डॉ. काटे यांना तीन ते चार पट टॉप-अप प्लान खरेदी करणे शक्य आहे. विवाहापश्चात पत्नीचे व अपत्य प्राप्तीनंतर अपत्याचे नाव या पॉलिसीत जोडावे.
डॉ. काटे यांना मिळणाऱ्या विद्या वेतनातून ते काही बचत करू इच्छितात. त्यांचे शिक्षण व एका वर्षांची सरकारी नोकरी पूर्ण झाल्यावर त्यांना मुंबई अथवा पुण्यात स्वत:चे घर घेण्याची इच्छा आहे. साहजिकच घरासाठी लागणारी स्वत:ची रक्कम उभी करणे (बचत) हे एकमेव उद्दिष्ट पुढील पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आले आहे. डॉ. काटे यांना मिळणाऱ्या विद्या वेतनातून ५६ हजारांचे वार्षिक शिक्षण शुल्क भरावयाचे आहे. हे पसे त्यांनी लिक्विड अथवा शॉर्ट टर्म बॉन्ड फंडसारख्या रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवावे. घर घेण्यासाठी गंगाजळी तयार करण्यासाठी पाच हजारांची एसआयपी करण्यासाठी चार फंड सुचविण्यात आले आहेत. यापकी दोन लार्ज कॅप तर दोन मिडकॅप व स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणारे फंड आहेत. या फंडातील एसआयपी निदान चार वष्रे सुरू राहावी अशी अपेक्षा आहे. चौथ्या वर्षांच्या अखेरीस निदान पाच लाखांची रक्कम हाती यावी, अशा अपेक्षेने ही गुंतवणूक सुचविली असली तरी निदान वर्षांतून एकदा याचा आढावा घेणे गरजेचे आहे.
वैद्यकीय क्षेत्रात ‘फॉलोअप व्हिजिट्स’ना खूप महत्त्व आहे. रोग्याची प्रगती पाहण्यासोबत गरज भासल्यास उपचारात (औषधे) बदल इतपतच याचा उद्देश नसतो. आíथक नियोजकालासुद्धा त्याच्या अशिलांनी ‘फॉलोअप व्हिजिट’ द्यायला हवी. नियोजन केल्यानंतर नवीन योजना उपलब्ध झालेल्या असतात. अशिलाच्या कौटुंबिक जबाबदारी अथवा कुटुंबाच्या उत्पन्नात बदल झालेला असतो. उदाहरण देऊन सांगायचे तर पत्नीने नोकरी सोडलेली असते तरी बदललेल्या स्थितीत विम्याचा हप्ता भरणे सुरूच असते. अशा एक ना अनेक कारणांसाठी आíथक नियोजकाची वर्षांतून एकदा भेट घेणे महत्त्वाचे असते. परंतु अनेक वित्तीय नियोजकांचा असा अनुभव आहे की, एकदा नियोजन केले की नियोजकाकडे वार्षकि आढावा घेण्यास अशील येत नाहीत. या उलट विमा विक्रेत्याकडून ज्यांनी नियोजन करून घेतले आहे असा विक्रेता दर तीन वर्षांनी नवीन विमा योजना खरेदीचा प्रस्ताव घेऊन अशिलांना भेटत असतो. आज केलेले नियोजन योग्य असले तरी वर्षांतून एकदा ‘फॉलोअप व्हिजिट’ देणे व वार्षकि आढावा घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, हाच अर्थबोध यानिमित्ताने घेता येईल.
डॉ. पराग काटे यांनी आपल्या वित्तीय नियोजनासाठी करावयाच्या गोष्टी
दीड कोटीचा मुदतीचा विमा पुढील दहा वर्षांत विम्याचे कवच पाच कोटी पर्यंत वाढविणे
अपघाती मृत्यू झाल्यास २० लाखांचे विमा छत्र  
संपूर्ण कुटुंबासाठी पाच लाखांचे आरोग्य विमा छत्र         
वरील फॅमिली फ्लोटर विमा छत्राच्या चार पटीने टॉप-अप कवच
शैक्षणिक शुल्कासाठीची तरतूद         
मध्यमकालीन भविष्यातील खर्चासाठी तरतूद
दीर्घकालीन भविष्यातील खर्चासाठी तरतूद
सर्वोत्तम ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ असलेल्या पहिल्या चारपकी एका विमा कंपनीची पॉलिसी
एसबीआय जनरल इन्शुरन्सची पॉलिसी
न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीची ‘फॅमिली फ्लोटर’ योजना
न्यू इंडिया अश्युरन्स / एल अँड टी जनरल इन्शुरन्स
डीएसपी ब्लॅकरॉक शॉर्ट टर्म अथवा एलआयसी नोमुरा सेव्हिेंग्ज प्लस  
दोन लार्ज कॅप म्युच्युअल फंड      
दोन मिडकॅप फंड व मायक्रो कॅप फंड