05 August 2020

News Flash

विदेशी संस्थागत गुंतवणूक

नावात काय?

|| कौस्तुभ जोशी

सेन्सेक्स, निफ्टीमध्ये जोरदार विक्री..

विदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्यामुळे बाजारात निरुत्साह..

विदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीचा सपाटा; शेअर्सच्या भावात उसळी..

अशा बातम्या आपण वाचतो, यात उल्लेख आलेले गुंतवणूकदार म्हणजे कोण? आजच्या लेखात याचा वेध घेऊया. जेव्हा परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात पैसे गुंतवताना इथल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेतात तेव्हा ती गुंतवणूक ‘एफआयआय’ प्रकारची असते. फक्त समभाग नाही तर रोखेसुद्धा ती मंडळी विकत घेऊ शकतात. जेव्हा एखाद्या कंपनीत संस्थागत गुंतवणूक येते तेव्हा गुंतवणूक करणारी विदेशी कंपनी कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात भाग घेत नाही, फक्त आपले पैसे गुंतवत असते.

परदेशातील हेज फंड्स, पेंशन फंड्स, विमा कंपन्या, म्युचुअल फंड्स एफआयआयच्या माध्यमातून भारतात पैसे गुंतवतात. भारतीय बाजाराचा गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतल्यास विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या भरपूर खरेदीमुळे बाजाराचा कल चढता राहिला आहे किंबहुना जेव्हा जेव्हा विदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली तेव्हा बाजारातील वातावरण काळजीचे राहिले आहे. रिझव्‍‌र्ह बँक कोणत्या कंपनीत किती टक्के परदेशी गुंतवणूक करता येते याचे दिशानिर्देश देते. म्हणजे १० टक्के, २४ टक्के, ५० टक्के अशा वेगवेगळ्या मर्यादा असतात. सरकारी बँकांत १८ टक्के मर्यादा आहे, खासगी बँकांत ही मर्यादा अधिक आहे, त्यापेक्षा अधिक गुंतवणूक रिझव्‍‌र्ह बँकेच्या परवानगीने करता येते. जर एखाद्या कंपनीत २४ टक्क्य़ांपर्यंत गुंतवणूक करण्यास मुभा असेल तर त्यापेक्षा जास्त संस्थागत गुंतवणूक होऊ शकत नाही.

भारतात एफआयआयच्या माध्यमातून जी गुंतवणूक होते त्याचा अभ्यास करताना ‘नेट इन्व्हेस्टमेंट’ ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. म्हणजे रोज हे गुंतवणूकदार जशी खरेदी करतात त्यासारखे शेअर्स विकतातसुद्धा! म्हणजे जर एखाद्या दिवशी एकूण खरेदी कमी आणि विक्री अधिक असेल याचा अर्थ लगेचच तो समभाग नकोसा झाला असे नाही! मात्र सलग काही आठवडे विक्रीचा सपाटा लावला तर बाजार नकारात्मक होत आहे, असे विवेचन करता येते. एप्रिल महिन्यात भारतीय बाजारांत समभागात १३,००० कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक आली आहे (खरेदी वजा विक्री) आणि रोखे बाजाराचा कल नकारात्मक आहे. खरेदी कमी आणि विक्री अधिक झालेली दिसते.

एनएसई, एनएसडीएल यांच्या वृत्तस्थळांवरून आपल्याला नियमितपणे एफआयआय गुंतवणुकीची आकडेवारी अभ्यासासाठी उपलब्ध होऊ शकते.

joshikd28@gmail.com

(लेखक वित्तीय नियोजनकार आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2019 12:05 am

Web Title: foreign direct investment 3
Next Stories
1 धोरणलंबक वित्तीय बेशिस्तीकडे
2 इच्छापत्र : समज-गैरसमज ५ – इच्छापत्राचा प्रभाव: काही प्रश्न..
3 ‘फायद्या’तील माध्यमसमूह
Just Now!
X