खरं तर महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र या कंपनीबद्दल संक्षिप्त स्वरूपात लिहिणं खूप कठीण आहे. परंतु त्याच वेळी ‘महिंद्र’बद्दल काय लिहायचं असंही वाटतं. कारण गेली अनेक वर्षे कंपनीने आणि महिंद्र समूहाने कायम उत्तमच कामगिरी करून दाखविली आहे. ट्रॅक्टर्स, पॅसेंजर कार, यूटिलिटी व्हेइकल्स, टेम्पो, कमर्शियल व्हेइकल्स इ. विविध वाहनांचे उत्पादन करणारी ही भारतातील आघाडीची कंपनी. सप्टेंबर २०१२ साठी संपणाऱ्या तिमाहीसाठी कंपनीने विक्रीत ३३ टक्के वाढ नोंदवून ९,६५९ कोटी रुपयांवर नेली आहे, तर नक्त नफ्यात २२ टक्के वाढ होऊन तो ९०२ कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीने नव्यानेच आणलेली एक्सयूव्ही- ५०० ला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ट्रॅक्टर आणि तीन चाकी वाहनांच्या विक्रीत घट झाली असली तरीही येत्या रब्बी आणि खरीप हंगामात ट्रॅक्टर्सच्या विक्रीत वाढ अपेक्षित आहे. कंपनीने वाहने आणि ट्रॅक्टर्सच्या किमतीत वाढही केली आहे. कोरियातील कंपनी ताब्यात घेऊन परदेशातही आपले पाय रोवतानाच, कंपनीच्या निर्यातीतही वाढ होत आहे. चालू आर्थिक वर्षांअखेर कंपनीचे प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) ६० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. उत्कृष्ट प्रवर्तक, उत्तम व्यवस्थापन आणि उज्ज्वल भवितव्य    असलेली ही कंपनी सुयोग्य गुंतवणूक ठरेल.     

महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र लि.       रु. ९५४.१५
मुख्य प्रवर्तक     :    महिंद्र समूह
मुख्य व्यवसाय     :    वाहन निर्मिती
भरणा झालेले भागभांडवल     :    रु. ३०६.९९ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा     :    २५%
दर्शनी मूल्य     :     रु. ५    
पुस्तकी मूल्य     :     रु. १९८.३०
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)    :    रु. ४९.५
किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पी/ई)    :    १८.५ पट
वर्षभरातील उच्चांक/नीचांक  :   रु. ९५९/६२१