कोटक इंडिया ईक्यू काँट्रा फंड ही ‘व्हॅल्यू फंड’ गटात मोडणारी योजना आहे. एखाद्या समभागात गुंतवणूक करण्यापूर्वी समभाग संशोधनाच्या जोडीला भावनिक बुद्धिमत्तेवर (इमोशनल इंटेलिजन्स) काबू मिळविला, तर मिळणारा परतावा केवळ समभाग संशोधनावर विसंबून केलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक उजवा असतो असे मानणाऱ्या विश्लेषकांचा एक समूह आहे. व्यावसायिक अनुभवातून आलेला अतिआत्मविश्वास, वेगाने वाढणाऱ्या समभागांची खरेदी, अल्पदृष्टिता, समभागांचे वर्तमानातील मूल्यांकन, विशिष्ट विचारसरणीच्या आहारी जाणे यासारख्या दोषांवर काबू मिळविण्यासाठी या दोषांचे मूळ असलेल्या मानवी भावनांवर काबू मिळविण्यासाठी समभाग संशोधन आणि भावनारहित निकषांवर या फंडात गुंतवणुकीसाठी समभागांची निवड केली जाते. हा फंड व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग तंत्राचा अवलंब करणारा फंड असल्याने फंडाच्या गुंतवणूक परिघात गुणात्मक आणि संखात्मक निकषांवर आधारित विकसित केलेल्या प्रणालीत बसणाऱ्या समभागांचा समावेश होतो.

फंडाच्या गुंतवणुकीत माहिती तंत्रज्ञान, खासगी बँका, वाहन आणि वाहन पूरक उत्पादने, ग्राहकोपयोगी टिकाऊ  वस्तू, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या या उद्योग क्षेत्रांना प्राधान्य दिले असून, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनीलिव्हर, मारुती सुझुकी, एसकेएस मायक्रो फायनान्स, टायटन या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. मागील महिन्याभरात फंडाच्या निधी व्यवस्थापकांनी नाल्को आणि पॉवर ग्रीड या कंपन्यांचे समभाग विकून टाकले असून या कालावधीत अशोक लेलँड, भारत फायनान्शियल इन्क्लुजन आणि नव्याने सूचीबद्ध झालेला वेरॉक इंजिनीयरिंग यांचा गुंतवणुकीत नव्याने समावेश केला आहे. मागील वर्षभरात सरासरी ५७ समभागांचा समावेश राहिला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत पहिल्या पाच, पहिल्या १० आणि पहिल्या १५ समभागांचे एकूण गुंतवणुकीशी सरासरी प्रमाण अनुक्रमे २४.८१ टक्के, ४२.९२ टक्के आणि ५२.९६ टक्के असे आहे.

फंडाची कामगिरी तपासताना फंडाच्या परताव्याची चलत सरासरी (रोलिंग रिटर्न) हा योग्य मापदंड असल्याचे वेगवेगळ्या संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. कोटक इंडिया ईक्यू काँट्रा फंडाच्या तीन, पाच आणि दहा वर्षांची चलत सरासरी तपासली असता वेगवेळ्या कालावधीत फंडाचा चलत परतावा ९८.३५ टक्के फंडाच्या मापदंड निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी करण्याची शक्यता असल्याचे आढळते. भारतीय म्युच्युअल फंड उद्योग बाल्यावस्थेतून तारुण्यात पदार्पण करताना फंड निवड ही सामन्यांसाठी जटील प्रक्रिया झाली आहे. सामान्य गुंतवणूकदारांचा निकष ‘सीएजीआर’चा अर्थात वार्षिक सरासरी परतावा दराचा राहिला असताना या निकषाच्या मर्यादा समोर येताना दिसत आहे. ज्या फंडांना फंडाच्या सुरुवातीच्या तेजी अनुभवयास मिळाली (२००५ मध्ये सुरुवात झालेले फंड) आणि ज्या फंडांना सुरवातीच्या काळात मंदीचा सामना करावा लागला (जून २००७ नंतरचे फंड) यांची तुलना ‘सीएजीआर’च्या निकषांवर केली तर तीन वर्षांनतर फंड निवड ९० टक्के चुकीची ठरल्याचे आढळून आले आहे. परंतु हीच निवड चलत् सरासरीच्या निकषावर केली असता, ९६ टक्के वेळा फंड निवड अचूक असल्याचे दिसून आले आहे. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग तंत्र अनेक वर्षांच्या वापरानंतर दीर्घ मुदतीत संपत्ती निर्मितीत यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. मुलांचे शिक्षण, सेवानिवृत्तीपश्चातची तरतूद यासारख्या दीर्घकालीन वित्तीय ध्येये साध्य करण्यासाठी यशस्वी गुंतवणूक साधन म्हणून हा फंड काम करेल असे मानण्यास जागा आहे. आपल्या जोखिमांकानुसार आणि गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने या फंडात गुंतवणुकीचा विचार करावा.

वसंत माधव कुलकर्णी

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)