अजय वाळिंबे

गॅलेक्सी सरफॅक्टंट्स लिमिटेड ही मुंबईस्थित कंपनी असून जानेवारी २०१८ मध्ये तिचा आयपीओ आला होता. त्या वेळी प्रत्येकी १,४७० रुपये अधिमूल्याने शेअर्सची विक्री होऊन १,४८० रुपयांना गुंतवणूकदारांना देण्यात आला होता. गॅलेक्सी सरफॅक्टंट्स ही पर्सनल केअर तसेच गृहनिर्माण उद्योगांसाठी सरफॅक्टंट्स आणि इतर स्पेशलिटी केमिकल्सचे उत्पादन करणारी एक आघाडीची भारतीय कंपनी आहे. कंपनीची बहुतांशी उत्पादने सामान्यत: कन्झ्युमर केअर, पर्सनल केअर आणि स्कीन केअर, ओरल केअर, केसांची निगा, सौंदर्य प्रसाधने, प्रसाधनगृह आणि डिटर्जंट उत्पादने यासारख्या घरगुती उत्पादनांमध्ये वापरतात. गॅलेक्सी सरफॅक्टंट्स उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये २००हून अधिक उत्पादन श्रेणी समाविष्ट आहेत. कंपनीची उत्पादने जगभरात ७५ देशांमधील ग्राहकांना विकली जातात. गेल्या २० वर्षांंत कंपनीने संशोधनाच्या जोरावर ६५ पेटंट्स प्राप्त केली.

गॅलेक्सी सरफॅक्टंट्सच्या प्रमुख उत्पादनांचे खालील प्रकारे वर्गीकरण करता येईल :

परफॉरमन्स सरफॅक्टंट्स : यात आयनिक सरफॅक्टंट्स, नॉन-आयनिक सरफॅक्टंट्स समाविष्ट आहेत.

स्पेशलिटी केमिकल्स : स्पेशलिटी केअर प्रॉडक्ट्स मध्ये १५५ हून अधिक प्रॉडक्ट ग्रेड आहेत आणि त्यात अ‍ॅलम्फोटेरिक सरफॅक्टंट्स, कॅशनिक सरफॅक्टंट्स, यूव्ही फिल्टर्स, प्रिझर्वेटिव्ह्ज, प्रिझव्‍‌र्हेटिव्ह ब्लेंड्स आणि सरफॅक्टंट्स ब्लेंड्स, सौम्य सरफॅक्टंट्स, सिंडेट आणि पारदर्शक बाथिंग बार आणि प्रथिने, फॅटी अल्कोनोलामाइड्स आणि फॅटी अ‍ॅसिड यांचा समावेश आहे.

गॅलेक्सी सरफॅक्टंट्सवरील दोन्ही उत्पादनात अग्रेसर आहे. कंपनीचे सात उत्पादन प्रकल्प असून, त्यापैकी पाच भारतात आहेत तर दोन परदेशात (इजिप्त आणि अमेरिकेत) आहेत. भारतातील जवळपास सर्व मोठय़ा एफएमसीजी कंपन्या गॅलेक्सी सरफॅक्टंट्सच्या ग्राहक आहेत. यात केविन केअर, कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड, डाबर, हेन्केल, हिमालय, लोरेल, प्रॉक्टर अँड गॅम्बल, रेकिट बेन्कीझर आणि युनिलिव्हर यांचा समावेश आहे. कंपनीचे मार्च २०२० साठीच्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर व्हायचे आहेत. ते अपेक्षेप्रमाणे असतीलही कारण भारतामध्ये कोविड २०१९ चा प्रभाव मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवडय़ापासून सुरू झाला होता. परंतु यंदाच्या जून २०२० अखेर संपणाऱ्या कालावधीचे निकाल मात्र फारसे चांगले नसतील. हे लक्षात घेता गुंतवणूकदारांनी केवळ दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करूनच खरेदी करावी.

सद्यस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचवलेले शेअर्स हे खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक टप्याटप्यात करावी.

गॅलेक्सी सरफॅक्टंट्स लिमिटेड

(बीएसई कोड : ५४०९३५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १,३९९/-

 

स्मॉल कॅप

उद्योग क्षेत्र : केमिकल्स / एफएमसीजी

बाजार भांडवल : रु. ४,९६० कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                          रु.  १,७९० / ९७५

भागभांडवल भरणा : रु. ३५.४५ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ७०.९३

परदेशी गुंतवणूकदार      ३.०६

बँक/ म्यु. फंड/ सरकार    १६.२०

इतर/ जनता     ९.८१

पुस्तकी मूल्य :  रु. २२०.७

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश : ८०%

प्रति समभाग उत्पन्न :   रु. ४९.७९

किंमत उत्पन्न गुणोत्तर : २८.१४

समग्र पी/ई गुणोत्तर :    ४५.७७

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.१८

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १३.२

रिटर्न ऑन कॅपिटल :    ३०.२८

बीटा :  ०.५

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.