कौस्तुभ जोशी

देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रगतीचा दर जीडीपीमध्ये मोजला जातो. जर जीडीपी वाढत असेल तर देशाची आर्थिक प्रगती होत आहे. जर जीडीपी सलग खाली येत असेल / नकारात्मक वाढ दाखवत असेल, तर आपण मंदीकडे वाटचाल करत आहोत असे म्हणतात. वृद्धी आणि घट याचे चक्र हे सारखे सुरूच असते, यालाच व्यापार चक्र म्हणतात (आकृती १).

आर्थिक मंदी आली की जीडीपी ढासळतो, (आकृती १ पाहा) आणि अर्थव्यवस्था सावरायला सुरुवात झाली की वक्ररेषा (कव्‍‌र्ह) पुन्हा वरच्या दिशेने जायला लागते. मात्र कधीकधी हे एवढय़ा सहजपणे होत नाही. एकदा गाळात रुतलेले अर्थचक्र परत वर यायला वेळ लागतो.

मंदी येते म्हणजे एकंदरीत सर्वच घटकांवर नकारात्मक चित्र दिसते. व्यापार थंडावतो, नवीन प्रकल्प सुरू होत नाहीत, बेरोजगारी वाढते, हाताला काम नाही, उत्पन्न नाही म्हणून लोक खर्च कमी करतात. त्यामुळे वस्तूंची मागणी कमी होते, म्हणून उत्पादन कमी! हे दुष्टचक्र किती काळ सुरू राहील? यावर आपण यातून किती लवकर बाहेर येऊ  हे अवलंबून असते. ढासळलेली व्यवस्था पुन्हा वाढीस लागणे यालाच सावरण्याची पातळी (रिकव्हरी फेज) असं म्हणूया.

ती सावरण्यासाठी किती वेळ लागतो यावरून याचे ‘यू’ अवस्था, ‘व्ही’ अवस्था, ‘डब्ल्यू’ अवस्था असे प्रकार पडतात. (संदर्भासाठी आकृती समूह २ पाहा)

सध्याच्या काळात जागतिक आणि भारतामधील टाळेबंदी किती कालावधीसाठी राहील हे आत्ताच सांगता येणार नाही. टाळेबंदी संपली तरीही अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर यायला किती वेळ लागेल याचे भाकीत वर्तवणे धाडसाचे ठरेल. स्थलांतरित मजूर पुन्हा कामावर येणे, उत्पादनाचा वेग वाढणे, जनतेकडे वस्तू खरेदी करण्याची क्षमता येणे आणि वस् तूंची मागणी वाढणे यासाठी दीर्घकाळ लागला तर ‘यू’ आकाराची स्थिती निर्माण होईल. हात आखडता न घेता सरकारने त्वरित अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी आर्थिक पातळीवरील उपाय योजना हाती घेतल्या पाहिजेत.

प्रत्यक्षात काय घडतं हे येणारा काळच सिद्ध करेल!

‘यू’ आकार म्हणजे एकदा मंदीच्या फेऱ्यात अडकलो की पुन्हा त्यातून सावरायला वेळ लागतो. उदाहरणार्थ – अमेरिकेमध्ये १९७३ साली आलेली आर्थिक मंदी या प्रकारची होती. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीने उच्चांक गाठल्यामुळे अर्थव्यवस्थेचे चक्र थांबलेले होते. अमेरिकेची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी दशकभराच्या कालावधी लागला होता.

‘व्ही’ आकार म्हणजे अर्थव्यवस्थेची पडझड झाली की अल्प कालावधीत परत उसळी घेऊन वेगाने सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढू लागतो. साधारणपणे दोन वर्षांच्या आत अर्थव्यवस्था पुन्हा घोडदौड करू लागली तर या प्रकारची ‘रिकव्हरी’ आली असे म्हणता येईल. २००८ साली अमेरिकेत आलेल्या ‘सबप्राईम क्रायसिस’नंतर जागतिक अर्थव्यवस्थेने दोन वर्षांंच्या आतच पुन्हा एकदा वरच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती.

‘डब्ल्यू’ आकारात अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यात सापडते. थोडय़ाच काळात पुन्हा उसळी घेते! सर्व काही ठीक होत आहे असे वाटू लागते तोवर पुन्हा अर्थव्यवस्थेत घसरण येऊन ती मंदीच्या कचाटय़ात अडकते. या प्रकारच्या आकारामध्ये शेअर बाजारातसुद्धा अनाकलनीय घडामोडी घडून येतात. सर्व काही सावरते आहे असे वाटू लागताना अचानक पुन्हा व्यवस्था कोलमडते व पुन्हा काही महिन्यानंतर धुगधुगी निर्माण होते या प्रकारची परिस्थिती जनतेमधील विश्वास डळमळीत करणारी ठरते.

लेखक वित्तीय नियोजनकार व अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

joshikd28@gmail.com