समभाग खरेदीची हीच उत्तम वेळ आहे असे तुम्ही सुचवाल काय?

– आंतरराष्ट्रीय स्तरावर आयातीत जिनसांच्या विशेषत: सोने आणि कच्चे तेल यांच्या घसरलेल्या किमती, महागाई दरातील नरमाई, निम्न व्याजदराबाबतची आशा आणि सरकारचा आर्थिक सुधारणांबद्दलचा ध्यास वगैरे घटक तरी एकंदर बाजारभावना सकारात्मक राहण्याकडेच संकेत करतात. शिवाय, जागतिक स्तरावर दिसून आलेली रोकडसुलभता एकूण जागतिक भांडवली बाजारात तेजीला कारक ठरली आहे. हा तेजीचा वारू आगामी काही काळ तरी टिकाव धरेल असे दिसून येते. कारण जगभरच्या मध्यवर्ती बँकांचा कल अर्थविकासाला पूरक ठरेल असे व्याजाचे दर निम्न पातळीवर ठेवण्याकडे आहे. देशांतर्गत कंपन्यांच्या वित्तीय निकालांमध्ये यापेक्षा अधिक वाईट यापुढे संभवणार नाही. आगामी तिमाहींमध्ये उद्योगक्षेत्राची कामगिरीत सुधारणेचीच शक्यता अधिक आहे. हे सर्व पाहता दीघरेद्देशी गुंतवणूकदारांसाठी खरेदीची ही एक उत्तम संधी आहे असा निष्कर्ष निश्चितच काढता येतो.

आगामी दोन-तीन वर्षे समभाग हाच सर्वोत्तम परतावा देणारा गुंतवणूक पर्याय असेल असे खात्रीपूर्वक सांगता येईल. गुंतवणुकीचे क्षितिज तीन वर्षांचे असणाऱ्या मंडळींना सध्या खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. काहीशी सावधगिरी म्हणून त्यांनी इक्विटी फंडांमध्ये ‘एसआयपी’ धाटणीच्या नियमित गुंतवणुकीला सुरुवात करता येईल.

 एप्रिलमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने दशकातील गाठलेला नीचांक आणि एकंदर अर्थस्थितीबाबत शोचनीय ठरतील असे अन्य अनेक घटक असतानाही, विदेशातून गुंतवणुकीचा दमदार ओघ आपण अनुभवत आहोत. एक गुंतवणूकदार म्हणून अशा बाजारात आपण नेमका कोणता पवित्रा घ्याल?

– घसरलेला विकासदर, चालू खात्यातील तसेच वित्तीय तुटीची भयंकर मात्रा, चढा महागाई दर वगैरे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंतेचे घटक निश्चितच आहेत. परंतु त्यात सुधारणाही दृष्टीपथात आहे आणि विद्यमान भारतीय बाजाराचे मूल्यांकन पाहता फिरंगी गुंतवणूकदारांसाठी हे गुंतवणुकीचे आकर्षक ठिकाण ठरते, अशीही वस्तुस्थिती आहे. माझे वैयक्तिक मत विचाराल, तर समभाग हाच या घडीला गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय असून, आम्ही आमच्या सर्व फंडातील गंगाजळी विद्यमान स्थितीत बाजारात पूर्णपणे गुंतविली आहे.

 बाजाराची नजीकच्या काळात दिशा काय असेल?

– मध्यम ते दीर्घावधीसाठी भांडवली बाजाराबद्दलचे संकेत खूपच सकारात्मक आहेत. शेअर बाजारासाठी अनुकूल घटकांचे मूलभूत चित्र लक्षणीय सुधारत आहेच, तर दुसऱ्या बाजूला समभागांना पर्यायी असा अन्य गुंतवणुकीचा मार्ग उपलब्ध नसणेही शेअर बाजाराच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे काहीसे मध्यम अवधीचे गुंतवणूक क्षितिज असलेल्यांना निश्चित दमदार परतावा अपेक्षिता येईल.

 सद्य पातळीवरून आणखी कितपत घसरण दिसून येते?

– मे महिन्यांतील दमदार तेजीनंतर, नफावसुली म्हणून ५ ते १० टक्क्यांची सुधारणा ही साहजिकच आहे. पण सध्याच्या बाजारात एक उल्लेखनीय ध्रुवीकरण घडताना दिसत आहे. बाजाराचा एक घटक आजही किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) ५० ते ६० पट असलेल्या भाग वर्गवारीत उलाढाल करीत आहे, तर दुसरा गट ८ ते १० पट पी/ई असलेल्या चांगल्या समभागांचा आहे. आपल्या बाजाराचा सरासरी पी/ई हा १५ च्या आसपास आहे. त्यामुळे बाजारातील मोठा हिस्सा आजही आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नीचांक स्तरावर हेलकावे घेत आहे. त्यामुळे निर्देशांकांची पातळी काहीही का असेना, समभागांचा एक लक्षणीय हिस्सा हा आकर्षक मूल्याला उपलब्ध आहे. यातील चांगला वित्तीय पाया असलेल्या समभागांची वेचक खरेदीची संधी वाया दवडता कामा नये.

 सध्याच्या स्थितीत कोणत्या क्षेत्राकडे, समभागांकडे गुंतवणूक वळविण्याचा सल्ला आपण द्याल?

– घसरलेला रुपया आणि रचनात्मक स्थित्यंतरांमुळे औषधीनिर्माण क्षेत्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक सरस वाटते. त्याचप्रमाणे बँकिंग आणि आयटी क्षेत्राबातही मी सकारात्मक आहे. देशाच्या आर्थिक उभारीचा सर्वाधिक लाभ मिळू शकेल अशा कंपन्यांना हेरून त्यात गुंतवणुकीचा माझा सल्ला राहील.

 

सुनील सिंघानिया
समभाग बाजार प्रमुख, रिलायन्स कॅपिल अ‍ॅसेट मॅनेजमेंट.