|| अजय वाळिंबे

निवडणुकांचे निकाल लागले, स्थिर सरकार आले. तरीही शेअर बाजारातील चढ-उतारांनी गुंतवणूकदार भांबवून गेला आहे. शेअर बाजारातील अनिश्चिततेवर काही ठोस उपाय नसला तरीही काही ‘डिफेन्सिव्ह’ शेअर्स तुमच्या पोर्टफोलियोमध्ये असले तर तुमच्या पोर्टफोलियोचे नुकसान मोठय़ा प्रमाणात कमी होऊ शकते. सध्याच्या शेअर बाजारातील परिस्थितीला अनुसरून आजचा शेअर सुचवला आहे.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ही सुप्रसिद्ध गोदरेज समूहाची एक ग्राहकोपयोगी उत्पादन कंपनी. आज, गोदरेज समूहाचे वेगवेगळ्या व्यवसायांत जगभरातील १.१५ अब्ज ग्राहक आहेत. गेल्या १९ वर्षांत कंपनीने अनेक उत्पादनांत अग्रगण्य स्थान मिळवले असून जगभरातील प्रसिद्ध ब्रॅण्ड आणि कंपन्या ताब्यात घेऊन पसाराही वाढविला आहे. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आज आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या अनुषंगाने, आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या तीन खंडांतील, तीन श्रेणींमध्ये (होम केअर, पर्सनल केअर, हेयर केअर) आपली बाजारपेठ विस्तारीत आहे. कंपनी उदयोन्मुख बाजारपेठेतील सर्वात मोठय़ा घरगुती कीटकनाशके आणि केश निगा उत्पादनांत अग्रणी आहे. घरगुती कीटकनाशकांमध्ये (हायकेअर) कंपनीचा भारतातील आणि इंडोनेशियातील बाजारपेठेत मोठा हिस्सा आहे. वार्षकि पाच हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या या कंपनीचे अनेक ब्रॅण्ड्स असून त्यांनी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान पक्के केले आहे. कंपनीच्या प्रमुख ब्रॅण्ड्समध्ये सिन्थॉल, गूड नाइट, गोदरेज एक्स्पर्ट, गोदरेज नंबर 1, गोदरेज नूपुर, गोदरेज रिन्यू, ईझी, हिट, प्रोटेक्ट, ब्लन्त, स्टेला आदींचा समावेश होतो. कंपनीचे मार्च २०१९ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षित निष्कर्ष जाहीर झाले असून कंपनीने उलाढालीत गत वर्षीच्या तुलनेत २७.२% वाढ नोंदवून ५,५५६.७९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,७५४.९८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत तो तब्बल ७८ टक्क्यांनी अधिक आहे. सातत्याने लाभांश देण्याव्यतिरिक्त कंपनीने आपल्या भागधारकांना गेल्या दोन वर्षांत लागोपाठ बोनस देऊन (२०१७ मध्ये १:१ आणि २०१८ मध्ये २:१) खूश ठेवले आहे. उत्तम प्रवर्तक, विविध उत्पादने आणि गुणवत्ता यामुळे आगामी कालावधीतदेखील कंपनी उत्तम कामगिरी करून आपला आवाका वाढवत राहील अशी अपेक्षा आहे. कधीही पोर्टफोलियोमध्ये असावा असा हा शेअर सद्य:स्थितीत खरेदीयोग्य वाटतो.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.