|| श्रीकांत कुवळेकर

सोन्यामध्ये गुंतवणुकीचा कुठला पर्याय योग्य आहे हे ठरवताना आपली जोखीम पत्करण्याची आर्थिक आणि मानसिक क्षमता, परताव्याबद्दलच्या अपेक्षा, गुंतवणूक कालावधी, कर सवलती हे घटक विचारात घ्यावे लागतात.

मागील लेखात आपण भारताचे आणि भारतीयांचे सोन्याशी असलेले नाते पाहिले. पाश्चिमात्य देशांमध्ये सोने या मौल्यवान धातूकडे प्रामुख्याने ‘कमोडिटी’ म्हणून पाहिले जाते. हे लोक सोन्याला गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहतानाच, सोने दागिन्यांमध्येही वापरतात, परंतु तिकडे हिरे आणि रत्नजडित आभूषणे वापरण्याचा कल असल्यामुळे शुद्ध सोन्याऐवजी आठ ते जास्तीत जास्त १८ कॅरेट सोने वापरले जाते. भारतात मात्र दागिन्यांमध्ये प्रामुख्याने १८ ते २२ कॅरेट सोने वापरले जाते, तर मराठी लोकांमध्ये २३ कॅरेटचे दागिने करण्याची प्रथा आहे.

मात्र दागिन्यांव्यतिरिक्त भारतात सोन्याची फार मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली जाते. म्हणजे चार पैसे गाठीशी जमले की, बरेच जण विशेषत: गृहिणी, सोनाराकडे जाऊन जेवढे येईल तेवढे सोने घेऊन टाकतात. त्या सोन्याचे काय करायचे याचा कुठलाच विचार त्यावेळी केलेला नसतो. आता ही सवय योग्य की अयोग्य हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकेल. तसेही कधी ना कधी साठवलेले सोने हुंडय़ासाठी नाही तर इतर मंगलप्रसंगी देवाणघेवाणीसाठी लागतेच. असे म्हणतात सोन्याचा सर्वात जास्त वापर लाच देण्यासाठी आणि काळा पैसा लपवण्यासाठी केला जातो.

थोडक्यात, सोने ही केवळ विकत घेण्याची वस्तू आहे असा काहीसा समज करून घेतल्यामुळे तेजीमध्ये ते विकून फायदा करून घ्यावा आणि मंदीमध्ये परत खरेदी करून नफा कमवावा, अशी धारणा असल्यामुळे सोन्याकडे शिस्तबद्ध गुंतवणूक करून पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहण्याची वृत्ती नाही. नाही म्हणायला ‘मिलेनिअल’ म्हणजे एकविसाव्या शतकातील तरुण पिढीमध्ये सोन्याबद्दल अशी ‘क्रेझ’ दिसत नाही. महागडे दागिने करून तिजोरीत ठेवण्यापेक्षा कमी शुद्ध सोन्याचे दागिने नेहमीच्या वापरासाठी घेण्याकडे त्यांचा कल दिसतो. एकंदरीतच गुंतवणुकीकडे कल कमी असल्यामुळे आणि सोन्यातील गुंतवणुकीचे फारसे ज्ञान नसल्यामुळे ही पिढी सोने घेताना दिसत नाही.

वास्तविक, जागतिक बाजारातील सध्याची दोलायमान स्थिती, आखाती देशांमधील अस्थिरता, त्यामुळे रुपयासहित बहुतेक आशियाई चलनांची दयनीय अवस्था आणि भांडवल बाजारातील वेगवान घसरण या पाश्र्वभूमीवर सोन्यातील गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे असे म्हणता येईल.

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र आपल्यासाठी कुठला पर्याय योग्य आहे हे ठरवताना आपली जोखीम पत्करण्याची आर्थिक आणि मानसिक क्षमता, गुंतवणुकीवरील परताव्याबद्दलच्या अपेक्षा, गुंतवणुकीचा कालावधी, कर सवलती हे आणि असे अनेक घटक विचारात घ्यावे लागतात.

प्रथम आपण प्रत्यक्ष सोने म्हणजे सोन्याचे वळे, बिस्कीट, सुवर्ण मुद्रा किंवा दागिने यामधील गुंतवणुकीतील फायदे, तोटे याचा ऊहापोह करू. मुळात गुंतवणुकीचे मुख्य सूत्र आहे कमीत कमी किमतीत खरेदी आणि जास्तीत जास्त किमतीत विक्री करणे. जोपर्यंत तुम्हाला सराफा बाजाराच्या खाचाखोचा आणि व्यवहारातील बारकावे समजत नाहीत, तोपर्यंत वरील सूत्रानुसार व्यवहार करणे जमणे नाही. पुढे जाण्यापूर्वी एक लक्षात घेणे गरजेचे आहे ते म्हणजे सोने खरेदीची किंमत भारतातील कुठल्याही दोन शहरांमध्ये सारखी असणे जवळजवळ दुरापास्त. बऱ्याचदा शेजारी शेजारी दोन भावांची दुकाने वेगवेगळा भाव दर्शवितात. मुंबईत सोन्याचा भाव http://www.ibja.co/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र प्रत्यक्ष दुकानात तो भाव थोडा जास्त असतो.

आता सोने केवळ गुंतवणुकीसाठी घ्यायचे तर वरील चार पर्यायांपैकी सुवर्ण मुद्रा आणि दागिने घेणे बाद करावे. कारण सुवर्ण मुद्रा खरेदी करताना सोन्याचा बाजारभाव अधिक ब्रॅण्डनुसार २ ते ३ टक्के एवढी करणावळ आकारली जाते. जेव्हा या सुवर्ण मुद्रा विकण्याची वेळ येते तेव्हा त्या दिवसाचा सोन्याचा भाव वजा २ टक्के घट या सूत्राने दुकानदार घेतात. बँका आणि काही मोठे ब्रँड आपल्याच सुवर्ण मुद्रादेखील परत विकत घेत नाहीत. म्हणजे सोन्याचा भाव स्थिर राहिला तर पूर्ण करणावळ आणि २ टक्के घट मिळून किमान ५ टक्के तोटा सहन करावा लागतो. उदाहरणार्थ, समजा सोने ३,००० रुपये प्रति ग्रॅम असेल, तर १ ग्राम सुवर्ण मुद्रा ३,०५० ते ३,१०० रुपयांना विकली जाते आणि परत घेताना २,९४० रुपये भाव मिळतो. यात ११० ते १६० रुपयांचा तोटा होतो, जो ३.५ ते ५.५ टक्के एवढा असतो. थोडक्यात, या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये सोन्याच्या भाव ५ टक्के वाढेपर्यंत आपला परतावा शून्य असतो.

दागिन्यांमधील गुंतवणूक तर जवळपास ‘डेड’ म्हणजे बहुधा तोटय़ातच असते. कारण डिझाइननुसार घडणावळ ५ ते १० टक्के एवढी असते. दागिने परत विकताना घडणावळ अधिक २ टक्के घट वजा केल्यास हाती ३,००० रुपयांपैकी २,५०० रुपये राहतात. सध्या सोनेखरेदीवर आकारण्यात येणारा ३ टक्के वस्तू आणि सेवा करदेखील खरेदी किंमत वाढवतो आणि अधिकचे नुकसान करतो. थोडक्यात, सोने किमान १० टक्के वाढेपर्यंत परतावा शून्य असतो. या प्रकारची गुंतवणूक किमान दशकभर ठेवली अथवा सोन्याच्या भावात जेव्हा प्रचंड चढ-उतार होतात तेव्हाच फायदेशीर ठरते.

आता राहिले दोनच पर्याय. सोन्याचे बिस्कीट किंवा वळे किंवा तुकडा. त्यासाठीदेखील दुकानदार भिशीसारख्या योजना आणत असतात. यामध्ये मासिक हफ्त्याने गुंतवणुकीचे एक वार्षिक लक्ष्य ठरते. यात १० किंवा ११ मासिक हफ्ते ग्राहकाने भरायचे आहेत आणि वर्षांच्या शेवटचा किंवा शेवटचे दोन हफ्ते दुकानदार भरतो. यामध्ये जमा झालेल्या रकमेचे सोनेच घेणे ग्राहकाला बंधनकारक असते. तेदेखील त्या वेळच्या भावात. म्हणजे गुंतवणुकीचे टायमिंग साधणे ग्राहकाच्या हाती नसते. ही योजना म्हणजे सोने गुंतवणूक योजनेपेक्षा आवर्ती ठेव योजना असते आणि दुकानदाराला वार्षिक ८ ते १० टक्के व्याजाने हमखास पैसे मिळतात. उलट धंद्यातील जोखमीमुळे दुकानदाराचे नुकसान झाले तर ग्राहकाला पैसे गमावण्याची वेळ येऊ  शकते. फायदा एकच की जबरदस्ती का होईना पैशाची शिस्तबद्ध बचत होते. मात्र परताव्याची फार अपेक्षा नसल्यासच यात पडावे.

आता सोन्याचा तुकडा, वळे किंवा बिस्कीट घेण्याचा फायदा म्हणजे फक्त सोन्याची किंमतच द्यावी लागते. त्यामुळे घडणावळ वाचते, परंतु आकाराने छोटे असल्यामुळे घरात ते जपून ठेवावे लागते. म्हणजे जोखीम आली. बँकेतील लॉकरमध्ये ठेवले तर त्याचे भाडे भरावे लागते. म्हणजे वरील पर्यायांच्या तुलनेत यामध्ये फक्त घडणावळ वाचते. थोडक्यात, खरेदीभावावर ३ टक्के वस्तू आणि सेवा कर, विकतानाची २ टक्के घट, लॉकरचे भाडे आणि त्या अनुषंगाने येणारे किरकोळ खर्च जमेस धरता, वार्षिक ८ टक्के परतावा मिळण्यासाठी सोन्याच्या भावात किमान १५ टक्के वाढ एक वर्षांत होणे आवश्यक आहे. गेल्या काही दशकांत किती वेळा सोने एवढे वाढले आहे हे पाहिले तर सोने गुंतवणुकीसाठी हा पर्याय कितपत योग्य आहे हे समजेल.

यातील एक मोठा फायदा म्हणजे आणीबाणीच्या वेळी पैसे उभारायचे झाल्यास सोन्याचा तुकडा किंवा बिस्कीट फार कामी येते. सोन्याएवढी रोकडसुलभता इतर कुठल्याही मालमत्तेत नाही.

पुढील भागात प्रत्यक्ष सोने गुंतवणूक करूनदेखील त्या व्यवहारात वरील चार पर्यायांमधील खर्च कसे टाळून गुंतवणुकीवरील परतावा कसा वाढवता येईल हे पाहू.  त्याचप्रमाणे सोने ईटीएफ, सुवर्णरोखे खरेदी करून आपली गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि जास्त परतावा देणारी होईल हेही पाहू.

ksrikant10@gmail.com

(लेखक वस्तू बाजार विश्लेषक)