भारतीय अर्थव्यवस्थेचे बरे-वाईट प्रतिबिंब हे शेअर निर्देशांक अर्थात सेन्सेक्समध्ये उमटत असते. त्याउलट आपल्याकडे सोन्याची झळाळी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगती-अधोगतीपेक्षा बाहय़ घटकांच्या विशेषत: डॉलरच्या मूल्याशी थेट निगडित आहे. म्हणूनच आर्थिक-राजकीय अस्थिरता आणि मुख्यत: महागाईच्या भडक्यापासून बचावासाठी सोने गुंतवणुकीचा आश्रय आजही उपयुक्त मानला जातो. त्यामुळे देशाची आर्थिक भरभराट, त्याच वेळी जागतिक अर्थकारणाचे स्थिरत्व या दोन्हीबाबत चित्र जोवर सुस्पष्टरीत्या पुढे येत नाही, तोवर या दोन्ही पर्यायांकडे गुंतवणूकदारांचा सारखाचा कल राहील. व्याजाचे दर घटत जाण्याच्या स्थितीत आणि मंदीमुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रापासून पाठ फिरलेल्या निधीत सोने गुंतवणुकीचाही लक्षणीय वाटा राहील, असा विश्वास पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ व्यक्त करतात. आयबीजेएया सुवर्ण व्यापाऱ्यांच्या संघटनेचेही उपाध्यक्ष असलेले गाडगीळ यांच्या मते आगामी काळ सोन्यातील दमदार तेजीचा असेल..

 

* सोने खरेदीचा पारंपरिक मुहूर्त अक्षय्यतृतीयेला खरेदी कशी अपेक्षित आहे?

– गेले काही दिवस अमेरिकी डॉलरच्या मूल्यातील नरमाई पाहता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याला तेजी आली आहे. आपल्याकडे भाव प्रति १० ग्रॅमसाठी २५ हजारांवरून ३० हजारांवर गेला आहे; परंतु गतसप्ताहाभरातील उतार पाहता, विशेषत: अक्षय्यतृतीयेला भाव ३० हजारांच्या आत येणे ग्राहकांच्या दृष्टीने आकर्षक ठरले आहे. विशेषत: गुढीपाडव्याचा मुहूर्त बंद आंदोलनाने हुकल्याने, अक्षय्यतृतीयेला चांगल्या खरेदीच्या आशा निश्चितच उंचावल्या आहेत. सप्ताहाभराआधीपासून झालेले बुकिंग आणि प्रत्यक्ष सोमवारी होणारी खरेदी ही गतवर्षांच्या तुलनेत किमान ३० टक्के अधिक राहील, असे उत्साहदायी संकेतही मिळत आहेत.

 

* संपत्तिनिर्माण आणि महागाई दरापेक्षा सरस परतावा या दृष्टीने सोन्यातील गुंतवणुकीचे महत्त्व हे विशेषत: भांडवली बाजाराच्या ताज्या उभारीमुळे घटले असल्याचे जाणवत नाही काय?

– सोने आणि समभाग गुंतवणूक दोन्हींचे संपत्तिनिर्माण आणि महागाईपेक्षा सरस परताव्याच्या दृष्टीने आजही सारखेच महत्त्व आहे, किंबहुना गत वर्षभरात स्थावर मालमत्ता आणि समभाग गुंतवणुकीने चांगला परतावा दिलेला नाही, तर सोन्याने या अवघड काळातही २० टक्क्य़ांनी वृद्धी साधली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत ही अमेरिकी डॉलरमध्ये मापली जाते. त्यामुळे डॉलर जितका कमजोर तितके सोन्यासाठी सोन्याचे दिवस ठरतात. अमेरिकेबाहेरच्या मंडळींसाठी तो आकर्षक गुंतवणूक पर्याय ठरतो. येत्या काळात अनिश्चित भू-राजकीय स्थिती, युरोपीय महासंघाची अखंडता व आर्थिक आव्हाने, खुद्द अमेरिकेत होऊ घातलेल्या निवडणुका या बाबी डॉलरच्या मूल्यात नरमाईलाच सूचित करतात. त्यामुळे सोन्यात गुंतवणुकीची हीच सर्वोत्तम वेळ आहे. व्यक्तिगत गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूक भांडारात सोने गुंतवणुकीला १२ ते १५ टक्के वाटा निश्चितच द्यायला हवा.

 

* चांगल्या मान्सूनची ठोस भाकिते पुढे आली आहेत, त्याचे कोणते परिणाम संभवतात?

– पाऊसपाणी चांगले असणे हे सोन्याच्या दृष्टीने मोठीच सकारात्मक बाब आहे. शहरी भागांतील खरेदीदारावर त्याचा भावनात्मक परिणाम दिसेल, तर ग्रामीण भागातून गत काही काळ दुष्काळामुळे रोडावलेल्या खरेदीला प्रत्यक्ष बहराचा सुपरिणाम स्पष्टपणे दिसेल. केवळ दागिने खरेदीच नव्हे तर महानगरांबाहेरील दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरातील लोकांचे सोने हेच आजही गुंतवणुकीचे सर्वात मोठे माध्यम आहे.

 

* सोन्याच्या मागणीत वाढीचा आणि सामान्य मान्सूनचा संबंध अधोरेखित होईल, असे खरेच काही घटक आहेत काय?

– यंदा पाऊस चांगला झाला तर ग्रामीण भागातून सोन्याची मागणी नक्कीच वाढेल. शेतकऱ्यांना बऱ्याच काळानंतर सुगी अनुभवता येईल. सुगीचा हंगाम सरल्यानंतर शेतकऱ्यांकडे हाती पीक विकून येणाऱ्या पैशातील निम्मा पैसा हा सोन्यातील गुंतवणुकीत जातो, हा भारतात दिसून येणारा सामान्य अनुभव आहे. २०१६ सालात वरुणराजाची कृपा झाल्यास हाच प्रवाह कायम राहिल्याचे दिसून येईल, किंबहुना गेल्या दोन वर्षांत राहून गेलेली कसर एकदम भरून काढणारी खरेदी छोटी शहरे व खेडय़ांमधून दिसून येईल. कृषीविषयक सरकारच्या प्रोत्साहनपर धोरणांचा परिणामही सोने उद्योगाच्या पथ्यावर पडणारा दिसून येईल.

 

*  अशा स्थितीत सोन्याच्या भावाबाबत नेमका तुमचा अंदाज काय?

– विश्लेषकांमध्ये २०१६ साल हे सोन्यातील तेजीचे असेल याबाबत सध्या एकमत आहे. तरी यंदाच्या दिवाळीत भावाबाबत निश्चित अंदाज बांधणे कठीण आहे. अर्थात सध्या दिसत असलेली मागणी ही जुलै-ऑगस्टमध्ये पावसाचा अपेक्षित जोर राहिला तर त्याला जोडून येणाऱ्या लग्नसराईत मागणीतील लक्षणीय बहराची असेल.  दिवाळीपर्यंत मागणीचा असाच जोर राहिला, तर स्वाभाविकच त्याचे किमतीतही प्रत्यंतर उमटलेले दिसेल. अर्थात गेल्या काही वर्षांत लक्षणीय रूपात वाढलेल्या आयात शुल्कात शिथिलता सरकारकडून आणली गेल्यास, किमती स्थिरावण्यास ते मदतकारकच ठरेल. एकुणात मधल्या काळातील अनेक उलटसुलट घडामोडींनंतरही सोन्याबद्दलची आस्था आणि जनमनातील त्याची मौलिकता कमी झालेली दिसून येत नाही.