21 November 2019

News Flash

ट्रम्पचे ट्वीट अन् सोने गुंतवणूकदारांची चांदी

दिवाळीपर्यंत सोने ४०,००० रुपयांवर जाईल असेही जाणकारांचे कयास आहेत.

|| श्रीकांत कुवळेकर

जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एप्रिलनंतर अस्थिरतेचे वारे वाहू लागल्यानंतर अनेक तज्ज्ञ सोन्यात गुंतवणूक करण्याचे सल्ले देऊ लागले आहेत. दिवाळीपर्यंत सोने ४०,००० रुपयांवर जाईल असेही जाणकारांचे कयास आहेत. पण ज्यांना लग्न किंवा तत्सम कारणासाठी पुढील सहा महिन्यात सोन्याची गरज आहे अशा ग्राहकांनी या स्थितीत काय करावे..?

मागील पंधरवडय़ात सोन्याच्या भावाने जोरदार उसळी मारत हाजीर बाजारात जवळपास ३५,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा गाठून देशात नवा विक्रम प्रस्थापित केला. यावर ३ टक्के वस्तू आणि सेवा कर लावल्यास ग्राहकांसाठी सोने ३६,००० रुपयांहून अधिक झाले आहे. त्यानंतर भावात थोडी घसरण झाली असली तरी एकंदर सोन्याविषयी देशातच नव्हे तर जगभर तेजीची हवा निर्माण झाली आहे. दिवाळीपर्यंत हाच भाव ४०,००० रुपयांवर सहज जाईल असे म्हणणाऱ्या तज्ज्ञांची संख्या रोज वाढत आहे. त्यामुळे ज्यांना लग्न किंवा तत्सम कारणासाठी पुढील सहा महिन्यात सोन्याची गरज आहे अशा ग्राहकांना या भावात सोने घ्यावे की थोडे थांबून मग ठरवावे असा प्रश्न पडला आहे. अशा ग्राहकांना असा सल्ला राहील की, आंतरराष्ट्रीय भावात गेल्या महिन्याभरात १०० डॉलर प्रति औंसची वाढ झाली असल्यामुळे त्यात ४०-५० टक्के एवढी घट झाल्यावर खरेदी करायला हरकत नाही.

भारतीय चलनात बोलायचे तर सोने ३३,५०० – ३३,७०० रुपयांच्या पातळीपर्यंत खाली आल्यावर घ्यायला हरकत नाही. जाणकारांच्या म्हणण्यानुसार सोन्याची किंमत दिवाळीपर्यंत निदान ४०,००० रुपयांवर जायला हरकत नाही. सोन्याने यापूर्वीच अनेक देशांच्या चलनांमध्ये विक्रमी पातळी गाठली आहे. डॉलर या चलनामध्ये सध्याची १,४२० डॉलर प्रति औेस ही किंमत २०११ सालात स्थापित केलेल्या विक्रमी १,९२२ डॉलरपेक्षा खूपच कमी आहे. परंतु तेव्हाचा विनिमय दर एका डॉलरला ४४ रुपये होता, तर आज आपले चलन डॉलरमागे ७० रुपयांपर्यंत खाली आले आहे. या फरकामुळे सोने अमेरिकी चलनात स्वस्त असले तरी भारतात विक्रमी पातळीला पोहोचले आहे.

सोने गुंतवणुकीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अत्यल्प किंवा नकारात्मक परतावा मिळाल्याने गुंतवणूकदार अगदी मार्चपर्यंत सोन्यात पसे टाकायला फार उत्साही नव्हते. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एप्रिलनंतर अस्थिरतेचे वारे वाहू लागल्यानंतर अनेक तज्ज्ञ सोन्यात गुंतवणूक करण्याचे सल्ले देऊ लागले. मागील महिन्यात अचानक आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांमध्ये परत एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण जागतिक बाजारात सोन्याच्या भावाला झळाळी देतील असे अनेक घटक एकाचवेळी घडताना दिसत आहेत. आतापर्यंत फक्त चीन आणि अमेरिकेमधील व्यापार युद्ध बाजारामध्ये सोन्याला मागणी मिळवून देत होते. मात्र आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे करयुद्ध थेट युरोप, मेक्सिको, अगदी भारत आणि इतर देशांच्या सीमेवर नेऊन ठेवले आहे. जोडीला इराणवरील र्निबध अधिकच कडक करण्यात आले आहेत. आखाती देशांमध्ये नवनवीन समस्या निर्माण होताहेत किंवा केल्या जात आहेत.

या सर्वावर कळस म्हणजे अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या वाढीवर दोन वर्षांनंतर प्रथमच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे ट्रम्प यांनी तेथील व्याजदरात कपात करण्यासाठी फेडरल रिझव्‍‌र्हवर दबाव आणला असून उर्वरित वर्षांत दरात अर्धा टक्का कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे पुढील वर्षी ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असल्यामुळे अर्थव्यवस्थेपेक्षा निवडणूक जिंकण्यासाठी ते अशा अनेक खेळ्या खेळतील की ज्यामुळे जागतिक अशांततेत भरच पडेल ज्याचा अप्रत्यक्ष फायदा सोन्याला मिळेल.

मात्र सोन्यातील तेजी हे खूपच चढ-उतारांची असेल. याचे कारण ट्रम्प यांच्या ट्विटरवरील चार शब्दांवर जागतिक चलन आणि वस्तू बाजारांमध्ये मोठी उलथापालथ होत राहणार आणि त्याचा सोन्याच्या किंमतींवर परिणाम होत राहणार.

गुंतवणूकदारांसाठी अजून एक सल्ला राहील तो असा की, ५ जुलला संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत गुंतवणूक टाळणे इष्ट राहील. कारण त्यात भारतीय सराफा बाजारासंदर्भात एक र्सवकष धोरण जाहीर होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम येथील किंमतींवर होईल. तसेच वस्तू आणि सेवा कर आणि आयात शुल्क यामध्ये बदल झाल्यास त्यामुळे देखील किंमती कमी अधिक होतील. काहीही झाले तरी ज्यांना गुंतवणूकच करायची आहे त्यांनी राष्ट्रीय शेअर बाजारामधून सुवर्ण रोखे किंवा मल्टि कमॉडिटी एक्सचेंजवर १ ग्रॅम, 8 ग्रॅम किंवा १०० ग्रॅमच्या वायदा व्यवहारांमार्फत सोन्याची डिलिव्हरी घेऊन व्यवहार केल्यास सोन्याच्या शुद्धता, सुरक्षितता आणि रोख तरलता या गोष्टींची काळजी घेतली जाईल.

मका-कापसाकडे वळण अपरिहार्य

आता थोडेसे कृषी क्षेत्राविषयी. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत महाराष्ट्रात आणि देशामध्ये पावसाचे सर्वदूर खरेखुरे आगमन झालेले असेल. खरिप हंगामाच्या पेरण्या वेग घेताना दिसत आहेत. सरकार मात्र अजूनही हमीभाव घोषित करत नसले तरी जागतिक बाजारातील परिस्थिती आणि सरकारची मन:स्थिती पाहता कडधान्यांवर जास्त भर देण्यापेक्षा शेतकऱ्यांनी परत एकदा कापूस, मका, ज्वारी आणि भुईमूगावर भर द्यावा. मुख्यत कापूस आणि सोयाबीन यात समतोल राखणे योग्य होईल.

मूगामध्ये जगात प्रथमच वायदा व्यवहार करण्यास ‘सेबी’ने मान्यता दिली आहे आणि जुलमध्ये प्रत्यक्ष व्यवहार सुरू होण्याची शक्यता असली तरी त्यामुळे कडधान्य उत्पादकांना फार मोठा फायदा लगेचच होण्याची शक्यता नाही. परंतु त्यांना आपला माल विकण्यास एक अजून पर्याय मिळाला आहे हे नक्की.

लष्करी अळीचा धोका वाढताना दिसत असून मक्याला त्याचा फटका बसू शकेल. भारतात गेले एक महिना कापूस आयातीचा वेग मंदावला असल्यामुळे, तसेच स्थानिक लागवड सुमारे २० दिवसांनी लांबली असल्यामुळे  भाव ऐन हंगामामध्ये देखील २०,००० रुपये प्रति गाठ या पातळी  खाली जाण्याची शक्यता नाही. गेलाच तर तो फार काळ टिकणार नाही असे वाटते. मात्र हमीभाव यापेक्षा खूप वर असल्यामुळे सरकारी खरेदी शेतकऱ्याला फायद्याची ठरेल.

मसाला पिकांमध्ये गेली काही वष्रे हळद पिकाखालील क्षेत्र राज्यात आणि राज्याबाहेर देखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे निर्यात वाढून देखील त्याच्या किमतींमध्ये वायदे बाजारातील सट्टा सोडल्यास  गेल्या दोन तीन वर्षांत म्हणावी तशी टिकाऊ तेजी आलेली नाही आणि या वर्षीदेखील शक्यता नाही. गेली तीन वष्रे मंदीच्या फेऱ्यात अडकलेले काळी मिरी मात्र पुढील वर्षी तेजीत येऊ शकेल.

या स्तंभामध्ये वेलचीमध्ये येऊ घातलेल्या तेजीबद्दल सर्वप्रथम ऑगस्ट २०१८ मध्ये लिहिले होते. त्यानंतरच्या ११ महिन्यात किरकोळ बाजारात वेलचीचे भाव दुप्पट होऊन ते ४,००० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर मागील जूनमध्ये हाच भाव १,४००-१,५०० रुपये होता. प्रथम ओला दुष्काळ आणि नंतर सुका, अशा चक्रात सापडल्यामुळे वेलची रोपांचे केरळमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या वर्षांत त्याचे उत्पादन दोन दशकानंतर प्रथमच सात-आठ हजार टनांवर येणार आहे. दोन वर्षांपूर्वी ते १८,००० टन तर मागील वर्षी सुमारे १४,००० टन इतके होते.

ksrikant10@gmail.com

(लेखक वस्तू बाजार विश्लेषक)

First Published on July 1, 2019 12:25 am

Web Title: gold investment in india
Just Now!
X