श्रीकांत कुवळेकर

जवळपास सर्वच मालमत्तांच्या किमती सध्या नवनवीन शिखरे गाठताना दिसत आहेत. सोनेही याला अपवाद नाही. सोने असो अथवा शेअर्स.. किमतीचा नेमका तळ अथवा शिखर साधणे कुठल्याच गुंतवणूकदाराला शक्य नसते. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या १०-१२ टक्के  निधी सोन्यात टप्प्याटप्प्याने गुंतवावा, हेच श्रेयस्कर

या स्तंभातून यापूर्वी अनेकदा सोन्यावर लिहिले गेले आहे. आणि कमॉडिटी मार्केटच्या दृष्टिकोनातून २०२१ ची सुरुवात पाहता सोने-चांदीवर बरेचदा लिहावे लागेल अशी परिस्थिती आहे. सोने हा धातूच असा आहे की तो कमॉडिटी कमी आणि चलन म्हणून जास्त महत्त्वाचा आहे. सध्या करोना संकटाने डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थांना परत रुळावर आणण्यासाठी ज्यांना ज्यांना शक्य ते सर्व देश मोठमोठी मदत पॅकेजेस आणत असल्यामुळे जगात नोटा छापण्याचे कारखाने तेजीत आहेत. त्याचा दृश्य परिणाम म्हण्ोजे जवळपास सर्वच मालमत्तांच्या किमती नवनवीन शिखरे गाठताना दिसत आहेत. उदाहरणार्थ, जगातील बहुतेक शेअर बाजार दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत. तर कृषी आणि अकृषिक वस्तू, म्हणजे सोयाबीन, पामतेल, तांबे, निकेल आणि आता खनिज तेल देखील जोरदार तेजी दाखवत आहे. याचा अदृश्य परिणाम म्हणजे चलनाची क्रयक्षमता कमी होणे. अधिक सोप्या भाषेत सांगायचे तर महागाई आणि अधिक महागाई.  मागील दशक संपताना महत्त्वाचे जागतिक अन्न आणि कृषी महागाई निर्देशांक अनेक वर्षांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.

बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंचच्या भारतातील प्रमुख ककू नखाते यांच्या म्हणण्यानुसार नवीन दशकामध्ये जागतिक स्तरावर मालमत्तांच्या किमतीचा फुगवटा आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या किमती या फुगा आहेत की अजूनही बुडबुडा या अवस्थेत आहेत हे नक्की सांगता येणे कठीण आहे. ज्याप्रमाणे शेअरच्या किमतीचा तळ आणि शिखर साधणे  कुठल्याच गुंतवणूकदाराला शक्य नसते त्याचप्रमाणे फुटेपर्यंत तो बुडबुडा की फुगा आहे हे कळत नाही. नेमक्या अशाच गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये गुंतवणूदार सुरक्षित जागा शोधत असतो आणि त्यावेळी पावले आपोआप सोन्याकडे वळतात.

भारतापुरते बोलायचे झाल्यास शेअर बाजारातील सध्याची तेजी गुंतवणूकदारांना खूप झाली असे वाटूनही त्यातून पैसे काढून घेण्याचा निर्णय कठीण झाला आहे. कारण व्याजदर पडलेले असताना आणि महागाई दर व्याजदरापेक्षा जास्त असताना शेअर्समधून काढलेले पैसे कुठे ठेवायचे हे कळत नाही. सोने-चांदीव्यतिरिक्त कमॉडिटी बाजाराबद्दल अजूनही फारसे माहीत नसल्यामुळे गुंतवणूकदारांना त्यात पैसे फिरवणे जमत नाही.

आता अशी परिस्थिती म्हणजे सोन्याच्या किमती वाढण्यासाठी अत्यंत अनुकूल. याची एक झलक मागील आठवडय़ात सुरुवातीला दिसून आली. सोन्याने २,००० रुपयांची जोरदार उसळी मारून ५०,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी गाठली होती. देश-विदेशातील अनेक प्रमुख विश्लेषकांनी सोन्यात नवीन तेजी आली आहे असे सांगून किंमत या वर्षांत ५८,०००-६०,००० रुपयांपर्यंत जाईल अशी ग्वाही दिली आहे. परंतु मागील दोन दिवसांत सोने ३,००० रुपयांनी पडून ४९,००० रुपयांवर आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची पुन्हा एकदा गोची झाली आहे. म्हणून पुनश्च सोन्यावरील लेखाचा प्रपंच.

ऑगस्टच्या सुरुवातीला सोने ५६,००० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेल्यावर त्यानंतरचा प्रवास काळजीपूर्वक पाहिल्यास असे दिसून येईल की, किमतीतील घसरणीची कक्षा आणि वेग ही वाढीची कक्षा आणि वेगाहून अधिक आहे. म्हणजे सेल-ऑन-राईझ या पद्धतीने सोन्याचा प्रवास मागील चार महिन्यांत राहिला आहे. गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूकदार देखील अशाच प्रकारे आपली गुंतवणूक काढत आहेत. ‘एसपीडीआर’ या जगातील सर्वात मोठय़ा सोने आधारित ईटीएफमधील गुंतवणूक सप्टेंबरमधील १,२७८ टनांवरून १०९ टन कमी होऊन वर्षअखेर १,१६९ टनांपर्यंत आली होती. मागील आठवडय़ात ती अचानक २० टन वाढली असली तरी मागील दोन दिवसांतील आकडे अजून उपलब्ध झालेले नाहीत. ज्या करोनामुळे सोन्याला झळाळी आली तो करोना नक्की कधी जाईल याबद्दल अजून अनिश्चितता असली तरी अधिकाधिक लशी उपलब्ध होत असल्यामुळे त्याविषयीची भीती चांगलीच कमी झाली आहे. मुख्य म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील विक्रीनंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा जागतिक स्तरावर मध्यवर्ती बँकांच्या सोने खरेदीमध्ये निव्वळ वाढ झाली. तर नोव्हेंबरमध्ये परत सहा टनांहून अधिक निव्वळ विक्री झाली आहे. यावरून २०२१ मध्ये हा कल पुढे चालू राहील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर सोन्याच्या किमतीत अंतर्भूत असलेला ‘ट्रम्प प्रीमियम’देखील आता संपला आहे. वरील घटक सोन्याला नकारात्मक असले तरी सकारात्मक घटकांची यादी देखील वजनदार आहे.

उदाहरणार्थ, डॉलर निर्देशांक मागील वर्षांत सात टक्कय़ांहून अधिक पडला आहे. प्रचंड आर्थिक पॅकेजेस आणल्यामुळे अमेरिकेची एकंदर आर्थिक आणि करोनाविषयक परिस्थिती पाहता डॉलर अजूनही खाली घसरू शकतो. यामुळे सोन्याची चलनी बाजू मजबूत होत आहे. अमेरिका आणि युरोपमधील शून्य व्याजदर म्हणजे गुंतवणूकदारांना पैसे शेअर आणि कमॉडिटी मार्केटमध्ये टाकण्यावाचून पर्याय नाही. सोन्यातील तेजीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे महागाई. जी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात आपण सर्वत्र पाहतोच आहोत.  भारतातही किरकोळ महागाई दर ७.३५ टक्के तर बँक व्याज दर पाच ते साडेपाच टक्के म्हणजे बचतीच्या पैशाचे अवमूल्यन. त्यापासून वाचण्यासाठी सोने हा पर्याय बहुतेकदा यशस्वी झाला आहे.

ज्या पद्धतीने खनिज तेल वाढत आहे आणि सौदी अरेबियाने उत्पादनात कपात केली आहे ते पाहता निदान मार्चपर्यंत तरी तेल माफक तेजीत राहील असे दिसत आहे. अनेक देश टाळेबंदीमध्ये जाताना अन्न सुरक्षा जपण्यासाठी अन्नाचे साठे करीतच असल्यामुळे कृषिमाल किमती तेजीत राहिल्यास महागाईमध्ये अधिक वाढ अपेक्षित आहे. सध्याची तिमाही डॉलरसाठी मंदीचीच राहील अशी लक्षणे आहेत. तर शेअर बाजाराचा फुगा फुटण्याची भीती निदान सामान्य छोटय़ा गुंतवणूकदारांमध्ये तरी वाढत आहे. म्हणजे सोने खरेदीसाठी योग्य वेळ आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र नेमक्या कुठल्या किमतीत सोने घ्यावे हा प्रश्न आहे.

मागील दोन्ही लेखांमध्ये सोन्यातील गुंतवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. त्यात म्हटल्याप्रमाणे सोने ४८,०००-५१,५०० रुपये या कक्षेबाहेर अभावानेच गेले आहे. आता सोने परत एकदा ४९,००० रुपयांपर्यंत आले आहे. तांत्रिकदृष्टय़ा सोने ४६,२०० रुपयांपर्यंत खाली येणे शक्य आहे. वर म्हटल्याप्रमाणे तळ-शिखर साधणे शक्य नसल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ४७,००० रुपयांपासून ते ४५,५०० रुपये या कक्षेत टप्प्याटप्प्याने सोने खरेदी छोटय़ा अवधीसाठी आकर्षक ठरावी. निदान मे-जूनपर्यंत जोखीम व्यवस्थापन चांगले होईल. तर दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी या कक्षेत एकूण गुंतवणुकीच्या १०-१२ टक्के  निधी सोन्यात टप्प्याटप्प्याने गुंतवावा असे अनेक विश्लेषकांचे म्हणणे योग्य वाटते. त्यासाठी योग्य सल्लागारांकरवी योग्य ती साधने निवडणे गुंतवणुकीइतकेच महत्त्वाचे आहे. ‘एमसीएक्स’वरील बुलियन निर्देशांक हे साधन यासाठी मह्त्त्वाचे ठरावे. म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून ही खरेदी अधिक प्रभावी ठरू शकते.

अस्वीकृती : वाचकांनी लक्षात घेणे जरुरीचे आहे की सोन्यामध्ये लेखकाची कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नाही. सदर लेख गुंतवणुकीचा सल्ला न मानता त्याकडे केवळ सराफ बाजाराचे विश्लेषण म्हणूनच पाहिले जावे.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक

ksrikant10@gmail.com