जून महिन्याच्या अतिथी विश्लेषक ज्योती भावे या भांडवली वस्तू आणि पायाभूत सुविधा विश्लेषक असून, त्या टाटा टीडी, डॉनिडे सिक्युरिटीज्, एम्के ग्लोबल या दलाल पेढय़ात कार्यरत राहिल्या आहेत. मागील तीन वर्षांपासून त्या एमबी इक्विटीज् या दलाल पेढीत सह-उपाध्यक्ष समभाग संशोधन विभागात कार्यरत आहेत.
प्रवासी वाहनांचा व्यवसाय हा प्रति वाहन नफ्याचे कमी प्रमाण असलेला स्पर्धात्मक व्यवसाय आहे. तर व्यापारी वाहनांचा व्यवसाय प्रति वाहन नफ्याचे प्रमाण जास्त असलेला आहे. टाटा मोटर्सचा दोन्ही वाहन प्रकारांत व्यवसाय आहे. अर्थव्यवस्थेच्या गतीशी व्यापारी वाहनांची विक्री थेट निगडीत असते.  देशाची अर्थव्यवस्था वाढीच्या दराने तळ गाठला असून चालू आíथक वर्षांत विकास दर पाच टक्क्य़ांपुढे तर पुढील आíथक वर्षांत सहा टक्के वाढीचा असेल. हा बदल व्यापारी वाहनाच्या विक्रीवर सकारात्मक परिणाम करेल म्हणून ’मोदी विजयाचे लाभार्थी’ म्हणून टाटा मोटर्सची निवड सार्थ वाटते.
टाटा मोटर्स ही भारतातील प्रमुख वाहन निर्माती कंपनी आहे. मागील आर्थिक वर्षांत जागतिक स्तरावरील विक्री २,३२,८२४ कोटी रुपये होती. कंपनीने पहिले वाहन १९५४ मध्ये आपल्या  जमशेदपूर येथील कारखान्यात तयार केले. भारतात कंपनीचे कारखाने झारखंड राज्यात जमशेदपूर, महाराष्ट्रात  पुणे, उत्तराखंड राज्यात पंतनगर, उत्तर प्रदेशात लखनऊ, गुजराथ राज्यात साणंद व कर्नाटकात धारवाड येथे आहेत. कंपनी जगातील पाचव्या क्रमांकांची ट्रक निर्माती, तर चौथ्या क्रमांकाची बस निर्माती आहे.   
टाटा मोटर्सच्या व्यापारी वाहन उत्पादनात दीड टन वजन वाहून नेणाऱ्या टाटा एस (छोटा हाथी) पासून चाळीस टनी टाटा प्रायमा (मल्टीअ‍ॅक्सल कमíशयल व्हेइकल) यांचा समावेश होतो. व्यापारी वाहनांच्या मूल्य साखळीतील इतकी विस्तृत उत्पादन शृंखला असलेली टाटा मोटर्स ही जगातील एकमेव कंपनी आहे. आíथक वर्ष  २०१३-१४ च्या चौथ्या तिमाहीत टाटा मोटर्सने १,३२,३०८ वाहने विकली. ही सख्या मागील वर्षांच्या चौथ्या तिमाहीतील वाहन विक्रीच्या ३३ टक्के कमी आहे. ही घट मुख्यत्वे अर्थव्यवस्थेतील मंदीचा परिणाम आहे. व्यापारी वाहनांच्या विकलेल्या वाहनांची संख्या व अर्थव्यवस्थेची वाढ यांच्या समप्रमाणात असते. ज्या ज्या वेळी अर्थव्यवस्था मंदावते तेव्हा वाहनांच्या विक्रीवर त्याचा परिणाम होतो. आगामी वर्षभरात अर्थव्यवस्था पाच टक्के वाढीचा वेग गाठेल असा अंदाज आहे. हा अंदाज ग्राह्य मानला तर या अर्थव्यवस्था वाढीच्या वेगाचा लाभार्थी देशातील वाहन उद्योग व त्यातही टाटा मोटार्स असेल
टाटा मोटर्सचा देशांतर्गत व्यवसाय बाधीत होण्यास प्रामुख्याने दोन घटक कारणीभूत आहेत. व्यापारी वाहने ही उद्योग जगतातील मंदीमुळे तर प्रवासी वाहन क्षेत्रात  टाटा मोटर्सचा हिस्सा दोन टक्क्यांनी घटला. २०१६ मध्ये प्रवासी व व्यापारी वाहनाच्या विक्रीत मोठी वाढ शक्य आहे. व्यापारी वाहने नेहमीच कंपनीच्या नफ्याचा मोठा हिस्सा असतात. त्यातही व्यापारी वाहनांच्या २० ते ४० टन क्षमतेच्या वाहनांची सख्या २०-२५ टक्क्यांनी वाढेल जेणेकरून ‘जग्वार लँड रोव्हर- जेएलआर’वगळता टाटा मोटर्सचा देशांतर्गत व्यवसाय नफ्यात येईल.
एकूण टाटा मोटर्सच्या नफ्यात ‘जेएलआर’च्या विक्रीचा वाटा वाढत आहे. नवीन विकसित केलेली वाहने व सुधारत असलेली जगाची अर्थव्यवस्था या व्यवसायाच्या पथ्यावर पडत आहे. जगाच्या चनीच्या वाहनांच्या बाजारपेठेत ‘जेएलआर’चा हिस्सा नव्याने विकसित केलेल्या (’जेग एक्सई’ ‘डिस्कव्हरी स्पोर्ट्स’ इत्यादी) वाहनांवर ग्राहकांच्या पसंतीची मुद्रा उमटली आहे. चीन व  ब्राझील येथील इंजिन जुळणी सुविधा या व्यवसायाचे नफ्याचे प्रमाण वाढते  ठेवेल.
 पुढील वर्षी कंपनीने ३.५ अब्ज पौंड खर्चाची योजना आखली असून या खर्चापकी ५० टक्के खर्च नवीन जेएलआरची मॉडेल विकसित करण्यावर खर्च होणार आहे. उर्वरित ५० टक्के खर्च कारखान्याच्या आधुनिकीकरणावर (पेंट शॉप, सीएनसी मशििनग) खर्च होणार आहे. चीनमधून पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत पहिली जेएलआर मोटार तयार होइल व वर्षअखेरपर्यत १३०,००० गाडय़ा करण्याइतपत क्षमता वापरली जाईल, असा विश्वास व्यवस्थापनाने वार्षकि निकालानंतर झालेल्या विश्लेषकांशी साधलेल्या संवादात बोलून दाखविला.