श्रीकांत कुवळेकर

मागील चार-पाच महिन्यांतील करोनाकाळामध्ये देशाच्या विविध भागांतील टाळेबंदीचा आणि त्या अनुषंगाने सामाजिक वावरामध्ये आलेल्या अनेक बंधनांमुळे कमॉडिटी बाजारामध्ये मोठे चढ-उतार अनुभवले. विशेषत: सुरुवातीच्या काळात बहुतेक कृषिमालाच्या किमतीत मोठी पडझड झाली. केवळ नाशवंत फळभाज्याच नव्हे तर कडधान्यांच्या किमतीदेखील नरम राहिल्या. परंतु मागील एक-दोन महिन्यांमध्ये जसजशी टाळेबंदी शिथिल होत आहे तसतशा बहुतेक कृषी जिनसांच्या किमती सतत सुधारताना दिसत आहेत. ही परिस्थिती अन्नपदार्थाच्या वाढलेल्या किरकोळ महागाई दरामध्ये प्रतिबिंबित झाली आहे.

किरकोळ बाजारातील महागाई ही बऱ्याच प्रमाणात ग्राहकांच्या बदललेल्या सवयींमुळे झाली असेही म्हणता येईल. करोना येण्यापूर्वी ज्या घरात १०-१२ दिवसांपेक्षा अधिक अन्नसाठा नसे त्या घरांमध्ये आता दोन-दोन महिन्यांचा साठा केला जात आहे. तसेच ग्राहक बाजारात न जाता विविध संकेतस्थळांवरून बहुतांश ऑनलाइन खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळेदेखील स्थानिक किरकोळ बाजारातील दुकानांच्या गर्दीमुळे असलेल्या स्पर्धात्मक किमती ही गोष्ट सध्या जवळपास नामशेष झाल्याने किमती वाढल्या आहेत.

बाजाराचे हे चित्र असले तरी या स्तंभामध्ये आपण ज्या बाजाराचा विचार करतो त्या घाऊक बाजारामध्ये किमती एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या नाहीत.

आज आपण हरभरा किंवा चणा या देशातील प्रमुख कडधान्य बाजाराबद्दल माहिती घेऊ. देशातील साधारण २४० लक्ष टन एकूण कडधान्य उत्पादनापैकी सुमारे ३५-४० टक्के वाटा एकटय़ा हरभऱ्याचा आहे. या वर्षी हरभऱ्याचे देशांतर्गत उत्पादन अंदाजे १०० लाख टन एवढे झाले असून काढणीनंतरचा पहिला हंगाम जवळपास संपला आहे. सरकारी आकडेवारीनुसार नाफेड या सरकारी कंपनीजवळील गेल्या वर्षीचा सुमारे १५ लाख टन आणि बाजारातील चार-पाच लाख टन जमेस धरता एकूण पुरवठा १२ दशलक्ष टन एवढा होता. परंतु व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या चणा उत्पादक राज्यांमध्ये काढणीच्या वेळी आलेल्या अवेळी पावसामुळे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. तर इतर काही राज्यांमध्ये उत्पादकता कमी असल्यामुळे बाजारात विकण्यायोग्य पुरवठा ९०-१०० लाख टनांपेक्षा अधिक असणे शक्य नाही. यापैकी नाफेडचा १५ लाख टन चणादेखील आला.

करोनाकाळात प्रोटिन-सुरक्षेमुळे हरभऱ्याच्या घरगुती मागणीमध्ये चांगलीच वाढ झाली असली तरी हॉटेल्स- रेस्टॉरंट्स- कॅटरिंग (किंवा होरेका) या सेवा आजही प्रामुख्याने बंद असल्यामुळे एकंदर मागणी कमीच आहे. तसेच लग्नसमारंभ, मोठाली देवस्थाने आणि सामाजिक कार्यक्रम बंद असल्यामुळेदेखील बेसनयुक्त मिठाई, फरसाण यांची मागणी कमी झाली आहे. प्रमुख शहरांमध्ये नाक्यानाक्यांवर असलेले खाद्यपदार्थाचे स्टॉल्सदेखील बंदच असल्याने चण्याच्या मागणीमध्ये चांगलीच घट झालेली आहे.

इतर अन्नपदार्थाच्या आणि कडधान्यांच्या घाऊक किमती वाढत असतानादेखील प्रोटिनसमृद्ध चणा मागणी-पुरवठय़ातील या तफावतीमुळे गेल्या काही दिवसांत घाऊक बाजारात अनेक प्रयत्न करूनही मंदीतून बाहेर येत नव्हता. याचे सर्वात मोठे कारण होते नाफेडकडे असलेला मोठा साठा. नाफेड सातत्याने करत असलेल्या लिलाव, विक्रीमुळे व्यापारी आपला पैसा चण्याच्या व्यापारात लावायला तयार नसत. जोपर्यंत व्यापाऱ्यांची गुंतवणूक येत नाही तोपर्यंत त्या वस्तूमध्ये तेजी येत नाही हा सर्वसाधारण नियम आहे. परंतु अलीकडेच पंतप्रधानांनी गरिबांसाठी मोफत गहू-तांदूळ आणि चणाडाळ योजना नोव्हेंबपर्यंत वाढवल्यामुळे नाफेडकडील साठा तिकडे वर्ग होणार आहे, हे प्रत्यक्ष नाफेडच्याच अधिकाऱ्यांनी अलीकडील एका वेबिनारमध्ये सांगून टाकले आहे. त्यामुळे कडधान्य व्यापाऱ्यांमध्ये चैतन्य आले आहे. याचाच परिणाम म्हणून याची आगाऊ माहिती व्यापाऱ्यांमध्ये असल्यामुळे गेल्या १५ दिवसांत बऱ्याच हाजीर-घाऊक बाजारांमध्ये चण्याच्या किमती प्रति क्विंटल २००-२५० रुपये वाढून ४,३००-४,३५० रुपयांवर गेल्या आहेत.

बऱ्याच व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही तेजीची नुकतीच सुरुवात आहे आणि दिवाळीपर्यंत चणा ४,७००-४,८०० रुपये किंवा होरेकाची मागणी वाढली तर ५,००० रुपयांवरदेखील जाण्याची शक्यता वर्तवू लागले आहेत. याचे कारण नुकताच देशांमध्ये सणासुदीचा हंगाम सुरू होत असून तो नोव्हेंबपर्यंत चालेल. त्यानंतर हिवाळा चालू होऊन तळलेल्या बेसनयुक्त पदार्थाच्या मागणीत होणारी वाढ आणि हंगामाच्या अखेरील दोन महिन्यांत आटलेला पुरवठा हे घटक तेजीला पूरक आहेत. किरकोळ खपाचा विचार केल्यास उत्तर भारतातील आंब्याचा हंगाम आता संपल्यामुळे आणि देशाच्या बहुतेक भागांत कांदे सोडून इतर बहुतेक भाज्यांचे भाव कडाडल्यामुळे देखील चण्याच्या खपात वाढ होऊन किमतीना आधार मिळेल. अर्थात ही भाववाढ शक्य झाली तरी त्याला तेजी म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. कारण चण्याचा हमीभावच मुळी ४,८७५ रुपये प्रति क्विंटल आहे.

पुढील काळात किमतीत नेमकी तेजी किती येईल, या दिशेने दोन घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतील. येत्या काळातील करोनाचा प्रसार आणि त्यामुळे पुरवठा व मूल्य साखळ्यांवर होणारे परिणाम, त्याचप्रमाणे नोव्हेंबरअखेर होणारी हरभरा-पेरणीची आकडेवारी.

यापुढील काळात नेमकी तेजी किती येईल यात दोन घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतील. येत्या काळातील करोनाचा प्रसार आणि त्यामुळे पुरवठा आणि मूल्य साखळ्यांवर होणारे परिणाम त्याचप्रमाणे नोव्हेंबरअखेर होणारी हरभरा-पेरणीची आकडेवारी. तर चण्याच्या हमीभावाकडील जाऊ लागलेल्या झेपेचा तिसरा मोठा शत्रू प्रत्यक्ष सरकारच असणे अशक्य नाही. आताच अन्नपदार्थाची महागाई रिझव्‍‌र्ह बँकेच्या अंदाजापेक्षा खूपच अधिक असून त्याची चिंता त्यांना आहे. या पार्श्वभूमीवर जर अन्न मंत्रालयाने ग्राहकधार्जिणा निर्णय घेण्याचे ठरवले आणि नाफेडने या वर्षीच्या साठय़ांमधून लिलाव विक्री सुरू केली तर भाव ४,५०० रुपयांच्या देखील खाली येऊ शकतो हे आपण अनेकदा अनुभवले आहे.

सध्या एनसीडीईएक्स या वायदे बाजारात ऑक्टोबर महिन्याचे चणा कॉन्ट्रॅक्ट ४,२७७ रुपयांवर असून त्यात ४,२००-४,२२० या कक्षेत खरेदी केल्यास चार-सहा आठवडय़ांत निदान ४,३५०-४,३८० रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. मात्र कमॉडिटी बाजारामध्ये दर महिन्याच्या १५-२० तारखेला वायदा-कालावधी समाप्तीच्या काळात मोठे चढ-उतार होत असतात हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपले गुंतवणूक निर्णय नियंत्रित करणे गरजेचे आहे.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक.

ksrikant10@gmail.com