|| अजय वाळिंबे

ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड ही आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी आहे. १९४७ मध्ये भारतात वस्त्रोद्योग क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर आज ग्रासिम इंडस्ट्रीज विविध क्षेत्रांत अग्रगण्य आहे. आदित्य बिर्ला समूहाची ग्रासिम म्हणजे व्हीएसएफमध्ये आघाडीचे उत्पादक (क्लोअर-अल्काली-एस), सर्वात मोठे सिमेंट उत्पादक आणि वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा (एनबीएफसी, मालमत्ता व्यवस्थापन आणि जीवन विमा) अशी ओळख करून द्यावी लागेल.

गेल्या काही वर्षांपासून, कंपनीने पॉवर आणि स्टीममध्ये बॅकवर्ड इंटीग्रेशन मजबूत केले आहे. व्हीएसएफ निर्माण करण्यासाठी आणि या इंटिग्रेशनसाठी ही रासायनिक उद्योगाची स्थापना झाली. गेल्या काही वर्षांत कॉस्टिक सोडा व्यवसायामध्ये सेंद्रिय आणि अकार्बनिक मार्गाद्वारे पुष्कळदा वाढ झाली आहे. आज ग्रासिम भारतातील सर्वात मोठी कॉस्टिक सोडा उत्पादक कंपनी आहे.

वर्ष १९८५ मध्ये सिमेंट व्यवसायात पदार्पण केल्यावर आज ही कंपनी भारतातील एक सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. ग्रासिमची उपकंपनी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड भारतातील एक मोठी जागतिक सिमेंट उत्पादक असून कंपनीचे भारताखेरीज परदेशात उत्पादन प्रकल्प आहेत.

जून २०१७ मध्ये अल्ट्राटेकने जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड आणि जेपी सिमेंट कॉर्पोरेशन्स लिमिटेडकडून सिमेंटचे अधिग्रहण पूर्ण केले. या अधिग्रहणानंतर, कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता ९६.५ मेट्रिक टनांपर्यंत वाढली आहे.

कंपनीचे डिसेंबर २०१८ पर्यंतचे नवमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे कंपनीने गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत भरीव कामगिरी करून दाखवली आहे. यंदाच्या तिमाहीत कंपनीने उलाढालीत २०.४५ टक्के वाढ साध्य करून ती १८,४५८.५१ कोटींवर गेली आहे, तर नक्त नफादेखील २१.७४ टक्क्य़ांनी वाढून ९५७.९२ कोटींवर गेला आहे. येत्या दोन वर्षांत कंपनी व्हीएसएफ तसेच केमिकल विभागांची उत्पादन क्षमता वाढवत असून त्यासाठी सुमारे ७,६२७ कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. सध्या वार्षिक नीचांकावर आणि पुस्तकी मूल्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेला हा शेअर एक आकर्षक गुंतवणूक ठरू शकेल. काही कंपन्या एव्हरग्रीन असतात. आज सुचविलेली ग्रासिम इंडस्ट्रीज ही अशीच एक कंपनी. जास्त अभ्यास न करता काही उत्तम शेअर्स आपल्या पोर्टफोलियोमध्ये असावेत असे वाटत असेल तर ग्रासिम एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पोर्टफोलियोत ठेवून द्या.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.