सुधीर जोशी

sudhirjoshi23@gmail.com

बाजार निर्देशांक हे अर्थव्यवस्थेचे भविष्यवादी मूल्यमापन करतात हे परत एकदा सरलेल्या सप्ताहअखेरच्या व्यवहारात सिद्ध झाले. तथापि बाजाराला मिळालेली ही शाश्वत दिशा समजण्याची गल्लत केली जाऊ नये..

सरकारच्या एका घोषणेमुळे, बाजाराचा नूर कसा पालटला जातो, हे शुक्रवारी आपण पुन्हा अनुभवले. अर्थमंत्र्यांनी कंपन्यांवरील करांमध्ये मोठी कपात करून बाजाराला सुखद धक्का दिला आणि एकाच दिवशी निर्देशांकांनी ५ टक्क्यांहून जास्त वाढीचा पराक्रम नोंदवला.

गेल्या आठवडय़ाच्या उत्तरार्धात पल्लवित झालेल्या आशा या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी मावळल्या. सौदी अरेबियाच्या अरामको या जगातील सर्वात मोठय़ा कंपनीवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने तेल दरवाढीचे संकेत दिले व बाजाराने त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. पहिल्या चार दिवसांत निर्देशांक तीन टक्क्यांहून जास्त खाली आले. आठवडय़ाची अखेर मात्र अर्थमंत्र्यांनी दिवाळीपूर्वीच दिलेल्या ऐतिहासिक कर-दिलासा नजराण्याने स्वप्नवत तेजीत परावर्तित झाली. परिणामी सेन्सेक्सने ६३०, तर निफ्टीने २०० अंशांची साप्ताहिक वाढ साधता आली.

भारताची अफाट लोकसंख्या ही मागणीच्या दृष्टीने भारताच्या फायद्याची आहे. जगात काही घडामोडी झाल्या तरी भारतातील उद्योग स्थानिक मागणीवर जगू शकतील अशी परिस्थिती असली तरी इंधन तेलाच्या पुरवठय़ाबाबत आपण ८० टक्क्यांहून जास्त परदेशांवर अवलंबून आहोत. त्यामुळे इंधन तेलामधील दरवाढीमुळे अनेक उद्योगांच्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होते, वाहतुकीचा खर्च वाढतो, महागाई वाढते व अधिक परदेशी चलन खर्च झाल्यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडतो. सरकारच्या विकासकामाच्या खर्चात कपात करावी लागते. पर्यायाने त्याचा रोजगार निर्मिती व मागणीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे आधीच मंदीतून वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील या अनपेक्षित संकटाची बाजाराने पहिल्या दोन दिवसांत त्वरित दखल घेतली, तर शेवटच्या दिवशी नवीन उद्योगांना चालना मिळण्याच्या आशेवर निर्देशांकांनी उसळी घेतली. बाजाराचे निर्देशांक हे अर्थव्यवस्थेचे भविष्यवादी मूल्यमापन करतात हे परत एकदा सिद्ध झाले.

सध्याच्या काळात जसे अनेकांचे पोर्टफोलियो संकटात आहेत तसे काही अपवाद वगळता बहुतांश इक्विटी म्युच्युअल फंडही समाधानकारक परतावा देऊ  शकलेले नाहीत. निवडक मल्टिकॅप फंडांच्या काही योजनांसारखे जे काही अपवाद आहेत ते त्यांच्या निधी व्यवस्थापन कौशल्यामुळे मुद्दल अद्याप तरी शाबूत राखण्यात यशस्वी झाले आहेत. यामधून सामान्य गुंतवणूकदारांनी शिकायची गोष्ट म्हणजे बाजार वर असताना नियमित नफावसुली करून रोकड एखाद्या लिक्विड फंडात गुंतवून ठेवणे. त्यामुळे नवीन उद्योग उदयाला येऊन रोजगारनिर्मिती होण्यासाठी बराच काळ जावा लागेल. सामान्य गुंतवणूकदारांना आपला पोर्टफोलियो स्वच्छ करण्याची ही संधी आहे. बाजारात मोठी तेजी असताना आपल्या जवळचे जे समभाग वर गेले नाही ते विकून योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकेल. शुक्रवारी जाहीर झालेल्या कर सवलतींमुळे जास्त कर भरणाऱ्या अनेक कंपन्यांचे मूल्यमापन नव्याने केले जाईल. वस्तू व सेवा कर समितीच्या बैठकीतील निर्णयांकडेही बाजाराचे लक्ष राहील; पण बाजाराला शाश्वत दिशा मिळण्यासाठी येणारा सणासुदीचा काळ व पहिल्या सहामाहीतील निकालांची वाट पाहावी लागेल.