अमूल बटर व मॉडर्न ब्रेड हे एकाच दुकानात मिळतात. परंतु या दोहोच्या विक्रीतून दुकानदारांना होणाऱ्या नफ्याची टक्केवारी वेगवेगळी आहे. मुदतीचा विमा व अन्य विमा उत्पादने यांच्या विक्रीतून होणाऱ्या नफ्याचे प्रमाण व पारंपारिक अर्थात ‘एन्डोमेंट’ प्रकारच्या पॉलिसी विक्रीतून होणाऱ्या नफ्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. विमा विक्रेत्यांना मुदतीचा विमा (ब्रेड) विकण्यात रस नसून अन्य उत्पादने (बटर) विकण्यात रस असतो. विमा इच्छुकांनाही खासगी कंपन्यांवर विश्वास नसेल तर एलआयसीचा ‘ई-टर्म’ हा ऑनलाईन पद्धतीचा मुदतीचा विमा (टर्म प्लान) खरेदी करावा. परंतु मुदतीचा विमा कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी हवाच..
ठाण्याच्या विद्या गुप्ते यांची एकुलती एक मुलगी सिद्धी (२८) हिचे लग्न कुर्ला येथील समीर ताम्हाणे (२८) यांच्याशी एप्रिल २०१५ मध्ये झाले. या नवविवाहित दांपत्याचे वैवाहिक जीवन सुरु होतानाच त्यांचे आíथक नियोजन व्हावे अशी विद्या गुप्ते यांनी ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’ला विनंती केली होती. समीर हे मध्यपूर्वेत एका बांधकाम कंपनीत स्थापत्य अभियंता आहेत. तर सिद्धी या वास्तुरचनाकार आहेत. सिद्धी यांनाही समीर यांच्या देशात नोकरी मिळाली आहे. समीर हे गणपतीसाठी भारतात येणार असून सिद्धी त्यांच्या सोबतच परदेशी नवीन नोकरीवर रुजू होण्यासाठी जाणार आहेत. एकेदिवशी आगाऊ वेळ ठरवून समीर व सिद्धी यांच्याशी स्काइप व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून संपर्क झाला. सध्या समीर यांची मासिक बचत अंदाजे एक लाखांपर्यंत होते. सिद्धी या सुरुवातीच्या सहा महिन्यानंतर साधारण एक लाख रुपये बचत करू शकतील.समीर यांनी २०१३मध्ये टू बीएचके सदनिका त्यांच्या आईवडिलांच्या सध्याच्या घराजवळ खरेदी केली आहे. या घरासाठी त्यांनी ४० लाख गृहकर्ज घेतले आहे. या सदनिकेचा ताबा दिवाळीपर्यंत मिळेल. समीर यांच्याकडे चार लाखाचे विमा छत्र देणारी मनीबॅक पॉलिसी आहे. बँकेच्या चार लाखाच्या मुदत ठेवी आहेत. पोस्टाच्या आवर्ती बचत योजनेत ते मासिक दहा हजार गुंतवत आहेत. सिद्धी या मुंबईतील एका स्थावर मालमत्ता विकासकाकडे नोकरी करीत होत्या. त्यांना कर व अन्य वजावटींपश्चात मासिक ४५ हजार वेतन मिळते. त्यांच्याकडे चार पारंपारिक प्रकारच्या विमा योजना असून या योजना त्यांना आठ लाखाचे विमाछत्र देतात. त्यांच्याकडे तीन लाखाच्या बँकांच्या आयकर वजावट पात्र मुदत ठेवी आहेत.  त्यांनी घेतलेल्या वाहन कर्जापकी तीन लाख फेडणे अद्याप शिल्लक आहे. त्या परदेशी जाण्यापूर्वी हे कर्ज फेडतील.समीर व सिद्धी यांना आरोग्य विम्याची सुविधा ते नोकरी करीत असलेल्या कंपनीने दिली आहे. त्यामुळे या नियोजनात आरोग्यविम्याचा विचार केलेला नाही. समीर यांचे उत्पन्न करमुक्त असल्याने मागील तीन वष्रे आपले आयकराचे विवरण पत्र (रिटर्न) सादर केलेले नाही. सरकारला आयकर विवरण पत्र सादर करणे म्हणजे आपले उत्पन्न व कर दायित्व यावर सरकारची पसंतीची मोहोर उमटविणे. अनेक अनिवासी भारतीय आपले उत्पन्न करपात्र नसल्याने आपले आयकर विवरण पत्र सादर करीत नाहीत. मुदतीचा विमा गृहकर्ज व अन्य गोष्टींसाठी उत्पन्नाचा दाखला असणे जरुरीचे असते अशा प्रत्येक ठिकाणी आयकर विवरण पत्राची मागणी होत असते. म्हणून करदायित्व शून्य असले तरी एक सरकारी मान्यताप्राप्त उत्पन्नाचा दाखला म्हणून आयकर विवरण पत्र सादर करणे जरुरीचे आहे. समीर व सिद्धी यांचे तरुण वय भविष्यात वाढणाऱ्या जबाबदाऱ्या याचा विचार करता, लहान वयात मोठे विमाछत्र घेणे फायद्याचे ठरते. लहान वयात विम्याचा हप्ता कमी पडतो व विमा खरेदीइच्छुकाच्या वय वष्रे ७० पर्यंत किंवा ३०-३५ वष्रे मुदत (प्रत्येक विमा कंपनीचे या बाबतीत नियम वेगवेगळे आहेत) यापकी जी अधिक मुदत असेल तोपर्यंत विमा मिळू शकतो. समीर व सिद्धी हे दोघेही कमावते असल्याने या दोघांनी ही प्रत्येकी तीन कोटी विमा छत्र असलेला व ३० वष्रे मुदत असलेल्या विम्याची शिफारस करीत आहे. समीर यांनी लगेच तर सिद्धी यांनी नवीन नोकरीत सहा महिने पूर्ण झाल्यावर विमा खरेदी करावा. सिद्धी यांच्या सध्याच्या उत्पन्नावर इतक्या मोठय़ा रकमेचा विमा आज मिळणार नाही. एका शिफारसप्राप्त विमा कंपनीच्या या प्रकारच्या विम्यासाठी सेवाकरासहित समीर यांचा ३४,७८२  रु. व सिद्धी यांचा २७,१५४ रु. वार्षकि हप्ता पडेल.
समीर हे मुदतीचा विमा खरेदी करण्यास उत्सुक नव्हते. विमा विक्रेत्यांच्या अपप्रचाराचा पगडा त्यांच्यावर होता. या विम्यात भरलेल्या हप्त्यांपकी काहीही परत मिळत नाही हा एक प्रमुख अप्रचार आहे. परंतु अत्यंत कमी हप्त्यात मोठे विमाछत्र असलेला विमा केवळ मुदतीच्या विमा प्रकारात उपलब्ध आहे हे विमा खरेदीइच्छुकांनी लक्षात घेणे जरूरीचे आहे. काही कंपन्या मुदतीच्या विम्यासोबत मर्यादित रकमेचे (३० ते ५० लाखांदरम्यान) अतिरिक्त अपघाती विमाछत्र देतात. हे वगळता मुदतीच्या विम्यासोबत कुठलीही अतिरिक्त सेवा मिळत नाही. मुदतीच्या विम्याचा उद्देश केवळ कुटुंबीयांना संरक्षण इतपतच मर्यादित आहे.कुटुंबाला आíथक संरक्षण या उद्देशाची १०० टक्के पूर्तता हा विमा प्रकार करीत असल्याने हा विमा खरेदी करण्यात काहीही गर नाही. जी उत्पादने विमा इच्छुकाची गरज भागवू शकत नाहीत, अशा ज्यादा कमिशन असलेल्या विमा उत्पादनांची विक्री करण्यातच विमा विक्रेते मग्न असतात.  ग्राहकाच्या गरजा जाणून घेण्यापेक्षा आपला खिसा भरण्यात त्यांना जास्त रस असतो. म्हणूनच विमा नियंत्रकांना ‘युलिप’ उत्पादनांचे फेरनियमन करणे जरुरीचे वाटले.मुदतीचा विमा सर्व विमा उत्पादनांची जननी आहे. अन्य पारंपरिक विमा उत्पादनांत अधिकचे अतिरिक्त फायदे दिले जातात. व जास्तीचा विमा हप्ता या अतिरिक्त सेवांसाठी दिला जातो. या अतिरिक्त सेवांमध्ये (गुंतवणूक, अपघाती मृत्यू, विमा खरेदीदाराचा मृत्यू झाल्यास भविष्यातील विमा हप्ता भरण्यापासून मुभा वैगरे) अन्य पर्याय माफक दरांत उपलब्ध आहेत. कोणतीही विमा कंपनी विमा विक्रेत्यांच्या प्रारंभिक प्रशिक्षणात मुदतीचा विमा विकण्याचे प्रशिक्षण देत नाही. अन्य विमा उत्पादने विकण्याचेच प्रशिक्षण देते. खासगी कंपन्यांवर विश्वास नसेल तर एलआयसीचा ‘ई टर्म’ हा ऑनलाईन पद्धतीचा मुदतीचा विमा खरेदी करावा. अमूल बटर व मॉडर्न ब्रेड हे एकाच दुकानात मिळतात. परंतु या दोहोच्या विक्रीतून दुकानदारांना होणाऱ्या नफ्याची टक्केवारी वेगवेगळी आहे. मुदतीचा विमा व अन्य विमा उत्पादने यांच्या विक्रीतून होणाऱ्या नफ्याचे प्रमाण व पारंपारिक अर्थात ‘एन्डोमेंट’ प्रकारच्या पॉलिसी विक्रीतून होणाऱ्या नफ्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. विमा विक्रेत्यांना मुदतीचा विमा (ब्रेड) विकण्यात रस नसून अन्य उत्पादने (बटर) विकण्यात रस असतो. कोणताही सुजाण विमा विक्रेता मुदतीचा विमा आपणहून विकत नाही.
या नियोजनाच्या निमित्ताने वाचकांना असे सांगावेसे वाटते की, पुढील वेळी विमा विक्रेता जेव्हा एखाद्या विमा उत्पादनाची शिफारस करेल तेव्हा मुदतीच्या विम्याचा आग्रह धरा. त्यातून विमा विक्रेत्याचा एक तर तुमच्या मागे लागलेला तगादा खात्रीने बंद होईल, किंवा चुकीच्या विमा उत्पादनाची शिफारस त्यापुढे तो तुम्हाला करणार नाही.सिद्धी व समीर यांचे वय, त्यांचे उत्पन्न करमुक्त असणे व त्यांच्याजवळ असलेली रोकड सुलभता या तीन गोष्टींचा विचार करता त्यांनी कर्जफेडीला प्राधान्य द्यायला हवे. अनेक अनिवासी भारतीयांच्या उत्पन्नावर कर नसूनही ते कर्जफेड करण्यास राजी नसतात. हे वित्तीय व्यवस्थापनाच्या दृष्टीने योग्य नसते. हे कर्ज केवळ समीर यांनीच फेडायचे असल्याने समीर यांची प्राथमिकता कर्ज फेडण्याला हवी. या मताशी सर्व सहमती असल्याने सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी- पीपीएफव्यतिरिक्त समीर यांना कुठलाही अन्य गुंतवणूक पर्याय सुचविण्यात आलेला नाही. तीन वर्षांनी तत्कालीन परिस्थितीचा विचार करून गुंतवणूक करावी असे ठरले.सिद्धी यांनी समभाग किंवा म्युच्युअल फंड यांचा या आधी गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार केलेला नाही. पोस्टाच्या योजना, राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुदत ठेवी या त्यांच्या परिघातील गुंतवणुकीतून त्या बाहेर पडलेल्या नाहीत. त्यांनी आपल्या गुंतवणुकीची सुरुवात रोखे गुंतवणूक करणारे फंड व बॅलेन्स्ड  फंड यापासून आपल्या परिघाबाहेरच्या पर्यायांतून करावी. ‘फिनामेट्रिका’ चाचणीत त्या सामान्य जोखीम स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदार असल्याचे उघड झाल्याने गुंतवणुकीपकी ६० टक्के गुंतवणूक रोख्यांमध्ये व ४० टक्के गुंतवणूक समभागात करावी असे ठरले. या गुंतवणुकीतील नफ्याचा फायदा अनुभवल्यानंतर त्याची जोखीम स्वीकारण्याची क्षमता वाढू शकेल दोन वर्षांनी पुन्हा फिनामेट्रिका चाचणी करून आपली जोखीम स्वीकारण्याची क्षमता तपासून आवश्यकता भासल्यास त्यांच्या गुंतवणुकीतील रोखे व समभाग गुंतवणुकीच्या प्रमाणाचा त्यांनी फेरआढावा घ्यावा. सामान्य नियमानुसार एकूण गुंतवणुकीच्या ७५ टक्के समभागात व २५ टक्के रोख्यांत असावयास हवी होती. वार्षकि दीड लाख त्यांनी पीपीफमध्ये गुंतवावे. उर्वरित गुंतवणुकीसाठी दोन रोखे गुंतवणूक करणारे फंड व चार बॅलेन्स्ड फंड सुचवीत आहे. दर वर्षी नियोजनाचा आढावा व तीन वर्षांनी समीर यांच्या गुंतवणुकीचे फेरनियोजन करणे जरुरी आहे.
shreeyachebaba@gmail.com

अर्थ वृत्तान्त’संबंधी अभिप्राय/प्रतिक्रिया कळवा: arthmanas@expressindia.com