|| किरण सहस्रबुद्धे

कुटुंबाच्या वित्तीय नियोजनाबाबत मार्गदर्शनासह परिस्थितीचे विश्लेषण करून आत्मभान देणारे नवीन पाक्षिक सदर..

नाना धोकें देहबुद्धीचे। नाना किंत संदेहाचे ।

नाना उद्वेग संसाराचे। नासती श्रवणें॥

रामदास स्वामींच्या ‘दासबोधा’च्या पहिल्या समासातील पहिल्या दशकातील ही ओवी. दासबोधाच्या श्रवणाने मानवी जीवनातील संदेह आणि प्रपंचातील धोके टाळता येतील, असे रामदास स्वामी सांगत आहेत. दासबोधातील क्रमाने रोज एका समासाचे वाचन हा अनेक पिढय़ा सुरू असलेला नित्यनेम असल्याने ही ओवी सहज आठवली. सामान्य माणूस अध्यात्मावर वरवर चर्चा करतो; परंतु अध्यात्माच्या मुळाशी जाऊन आत्मविकासाची वाट शोधणारे फारच थोडे असतात. वित्तीय उत्पादनांच्या बाबतीतसुद्धा असेच म्हणता येईल. एखाद्या विमाधारकाला ‘‘हा विमा तू का घेतलास’’ किंवा ‘‘ही ‘एसआयपी’ का सुरू केलीस?’’ हा प्रश्न विचारल्यास त्यामागची कारणे ९० टक्के विमाधारकांना किंवा एसआयपी गुंतवणूकदारांना देता येणे कठीण असते. बहुतांश मंडळी विमा विक्रेत्याने अथवा म्युच्युअल फंड वितरकाने पुढे केलेला अर्ज न वाचता किंवा प्रश्न न विचारता सही करतात.

नियोजनाची सुरुवात वित्तीय ध्येयांच्या निश्चितीने होते. जमा-खर्चाच्या आधारे या वित्तीय ध्येयांची निश्चिती करणे शक्य आहे किंवा कसे? आर्थिक स्रोत पुरेसे नसतील तर वित्तीय ध्येयपूर्तीची मुदत वाढवावी की वित्तीय ध्येय खुजे करावे? किती रकमेचा शुद्ध विमा घ्यावा आणि किती मुदतीचा घ्यावा? यांसारख्या नाना शंकांची उत्तरे देणारे हे सदर असेल. मागील वीस वर्षांच्या अनुभवातून अनेकांच्या चुका जवळून पहिल्या. या चुकांची कारणे शोधताना अनेक वर्षे गेली. पहिले कारण गुंतवणूक, आर्थिक बाबींबद्दल असलेली उदासीनता. नवीन न शिकण्याची वृत्ती. माझ्या वडिलांनी केले, जे माझा मोठा भाऊ किंवा मोठय़ा बहिणीने केले तसेच मला करायला हवे. नोकरीला लागल्यावर वित्तीय ध्येये निश्चित न करता शुद्ध विम्याआधी पीपीएफ खाते उघडणारे लाखोंनी सापडतील. वित्तीय ध्येयांची मर्यादित समज असल्याने कर देऊन शिल्लक राहिलेल्या पैशात गुंतवणूक करून संपत्तीची निर्मिती करण्यापेक्षा कर वाचवण्यासाठी गरज नसलेल्या वित्तीय खरेदीत ते धन्यता मानतात. अनेक जण दीर्घकालीन वित्तीय नियोजन करण्यापेक्षा त्या वर्षी देय असलेल्या करातून जास्तीत जास्त वजावट मिळाली की खूश असतात.

‘पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पय:। जातौ जातौ नवाचारा: नव वाणी मुखे मुखे।।’ प्रत्येक व्यक्तीची बुद्धी वेगळी असते, दोन कुंडांतील पाण्याची चव वेगळी, प्रत्येक संस्कृतीचे आचारविचार वेगळे, त्याप्रमाणे प्रत्येकाच्या वित्तीय गरजा आणि जोखीम स्वीकारण्याची क्षमताही सारखी नसते. अमुक एक गोष्ट माझ्या भावाने केली किंवा मित्राने केली म्हणून मीसुद्धा त्याच फंडात एसआयपी करतो किंवा तीच पॉलिसी घेतो. माझ्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींची संख्या किती, माझ्यावर असलेले कर्ज प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष देणी, भविष्यात नवीन कर्ज घेण्याची शक्यता, सेवानिवृत्त होण्यास शिल्लक असलेला कालावधी यावर माझ्या विम्याची निवड असायला हवी. परंतु दुर्दैवाने या गोष्टी विचारात न घेता, विमा विक्रेत्याने पुढे केलेल्या फॉर्मवर सही करून विमा खरेदी करण्याआधी या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला हवी. साधारणपणे एखादी व्यक्ती मनी बॅक किंवा एंडोंमेंट प्लान घेण्यास तयार असते, परंतु या विम्याच्या मुदतपूर्ती नंतर काहीही मिळणार नाही असे म्हटले की मग ‘टर्म प्लान’ खरेदी करायला कचरणारे कमी नाहीत. टर्म प्लान हा गुंतवणुकीसाठी नव्हे तर कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी असतो. वित्तीय उत्पादने अपरिचित असतील तर खरेदी करण्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला सुरुवातीला भीती वाटते. पुन्हा समर्थाच्या शब्दांत सांगायचे तर ‘इहलोक तरण्या कारणे। जाणत्याची संगत धरावी। परलोक तरण्या कारणे। सद्गुरूची पाहिजे।।’ या ओवीत समर्थाना अभिप्रेत असलेल्या ‘जाणत्या’च्या भूमिकेतून नेमकेपणे एखादे वित्तीय उत्पादन का खरेदी करावे आणि त्यापासून कोणते फायदे होणार आहेत. कोणत्या अन्य पर्यायी उत्पादनांचा विचार करता येईल या पर्यायी उत्पादनांचे फायद्या-तोटय़ाचे विश्लेषण या सदरातून वाचायला मिळेल.

प्राधान्याने वय वर्षे ३१ ते ४२ वयोगटातील आणि पाच ते १० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाचे वित्तीय नियोजन करणारे हे सदर असेल. वयोगट आणि उत्पन्नाची मर्यादा ही काही कायद्याची कलमे नव्हेत. हा मनात आखलेला परीघ असून परिघाच्या आत-बाहेर असलेल्या कुटुंबांचे वित्तीय नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन नक्कीच करण्यात येईल.  सोयीच्या कक्षेतून बाहेर पडून आत्मस्थितीचे विश्लेषण करून आत्मभान देणारे हे पाक्षिक सदर आहे.

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)