22 April 2019

News Flash

नियोजन ते निश्चिंती!

साधारण मध्यमवर्गीय कुटुंबांतलं हे ब्रीदवाक्य.. ‘खूप काम करा, भरपूर कमवा’!

साधारण मध्यमवर्गीय कुटुंबांतलं हे ब्रीदवाक्य.. ‘खूप काम करा, भरपूर कमवा’! अशा वातावरणातच लहानाचा मोठा झालो (वयाने). स्वत:चे घर झाले, गाडी आली, मुलांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. प्रामाणिक कष्ट, योग्य लोकांचा सहवास, यामुळे जगणं मजेत चाललं होतं आणि एक दिवस अचानक मनात आलं – माझं शिक्षण अवघ्या काही हजारांत झालं; पण सध्याच्या परिस्थितीप्रमाणे पुढे मुलांच्या शिक्षणाचं काय? या एका प्रश्नावरून पुढे अनेक प्रश्न मनात आले. याच दरम्यान एका आर्थिक सल्लागार दाम्पत्याशी ओळख झाली. त्यांचा मला पहिला प्रश्न होता तो म्हणजे – ‘सुख म्हणजे नक्की काय?’ मला उत्तर देता येईना. त्यांना माझ्यातला संभ्रम कळला व त्यांनीच उत्तर दिले – ‘पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढा पैसा मिळणे म्हणजे सुख!’ मला पटले.

मी व माझ्या बायकोने त्यांच्यासमोर आमची त्या वेळची सर्व आर्थिक परिस्थिती कागदावर लिहून दिली. आर्थिक सल्लागार हा आपल्यासाठी सर्वागीण विचार करू शकतो हे पहिल्यांदाच अनुभवले. जबाबदाऱ्या आणि महत्त्वाकांक्षा यांची चर्चा करून, कालानुरूप प्राधान्यक्रम ठरविला. बायकोबरोबर अत्यंत प्रामाणिकपणे आर्थिक उद्दिष्टांची निश्चिती केली. नंतर त्या वेळी येणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग/खर्च कसा होता तेही कागदावर उतरवले.

पैसा येतो आणि पैसा जातो, कारण आपण त्याचे नियोजन फक्त त्या वेळेपुरते करतो. असं लक्षात आलं की, आयुर्विमा व गुंतवणूक हे भिन्न आहेत. मेडिक्लेम हा भविष्यातील आरोग्याच्या अनिश्चिततेसाठी थोडासा का होईना पण आधार आहे. आणखी एक बाब लक्षात आली की, आर्थिक नियोजन हे सरसकट करून चालत नाही; त्यात दुसऱ्याचे अनुकरण करायचे नसते; किंबहुना तसे करणे हितावह नाही. स्वत:चा स्वतंत्र आराखडा तयार करणे व त्याबरहुकूम अंमलबजावणी मात्र खूप महत्त्वाची. खर्चाबाबत स्व-नियंत्रण आणि गुंतवणुकीचे सातत्य हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.

पैशानेच पैसा वाढतो हे नक्की. त्यासाठी मुदत ठेव, आवर्त ठेवी, म्युच्युअल फंड, सोने, घर-जमीन मालमत्ता असे गुंतवणुकीचे अनेकविध पर्याय आहेत. आपल्याला साजेशा पर्यायाचा प्रत्येकाने साकल्याने विचार करणे आवश्यक असते. योग्य सल्लागार निवडणेही जरुरीचे ठरते. तो कुणा एका कंपनीसाठी काम करणारा सल्लागार मात्र नसावा. फी घेणारा सल्लागार असणे जास्त योग्य. आम्हाला तसा सल्लागार मिळाला. ‘आर्थिक निश्चिंती योजना’ ही संकल्पना डोक्यात पक्की बसली. मला असे वाटते की, आर्थिक नियोजन केल्यानंतर आपण वेळेचे, मौज-विरंगुळ्याचे प्रसंग, आपले छंद यांच्या नियोजनाचाही विचार करू लागतो. या आधी, किती पैसे जमवल्यावर माझी स्वप्नं, जबाबदाऱ्या पूर्ण होऊ शकतील हे मी लक्षातच घेतलं नव्हतं.

एवढेच सांगेन, आज चार र्वष झाली. अजून बरेच अंतर पार करावयाचे आहे; पण आर्थिक शिस्त आणि नियोजन पाळत आल्यामुळे गरजप्रसंगी पैशाची भीती उरली नाही. ठरवलेल्या मार्गावरून चालत राहायचे, पैसा त्याचे काम करीत राहील. जेवढय़ा लवकर आर्थिक नियोजन करून गुंतवणूक सुरू कराल तेवढय़ा लवकर तुम्ही आर्थिक निश्चिंती मिळवून सुखाचा जीवनप्रवास सुरूकरू शकाल!  – हर्षल मधुकर कवडीकर, मुंबई

तज्ज्ञ टिप्पणी : जीवनातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कष्टाने मिळविलेल्या पैशाचं योग्य गुंतवणूक नियोजनही तितकंच महत्त्वाचं! कवडीकर कुटुंबीयांनी योग्य वेळी मार्गदर्शन मिळवून मुलांची शिक्षणं, आपली रिटायरमेंट इत्यादीसाठी आर्थिक तजवीज सुनिश्चित केली. त्यामुळे  चिंता कमी झाल्याचे ते सांगतातही. यापुढे त्यांनी वर्षांतून एकदा संपूर्ण नियोजनाचा फेरआढावा घेणे आणि गरजेनुसार त्यात सुधारणा करणे मात्र आवश्यक आहे.    – प्राजक्ता कशेळकर (गुंतवणूक सल्लागार)

First Published on January 21, 2019 12:06 am

Web Title: guidance for financial planning 3