25 April 2019

News Flash

व्यवहार समतोल बॅलन्स ऑफ पेमेंट

व्यापार खात्यावरील शेष म्हणजेच आपल्या देशाने केलेली वस्तूंची आयात आणि निर्यात यातील फरक.

|| कौस्तुभ जोशी

कोणत्याही देशाने परदेशाशी केलेला व्यापार किंवा परदेशी संस्था, कंपन्या यांनी केलेली दुसऱ्या देशातील गुंतवणूक समजून घेणे महत्त्वाचे असते; पण त्यासाठी आपल्याला हे सगळे व्यवहार ज्या खात्यात नोंदवले जातात त्याची माहिती करून घ्यावयास हवी. यालाच व्यवहार समतोल म्हणतात. एक प्रकारे आपल्या देशाच्या जागतिक उलाढालींचा हा ताळेबंद म्हणू या! आता हा तक्ता सोप्या भाषेत समजून घेऊ या.

व्यापार खात्यावरील शेष म्हणजेच आपल्या देशाने केलेली वस्तूंची आयात आणि निर्यात यातील फरक. भारताच्या बाबतीत वस्तूंची आयात ही निर्यातीपेक्षा बहुतांश वेळा अधिक असल्याने हा आकडा ऋण असतो (Trade Account Deficit). २०१७-१८ या वर्षांसाठी एकूण वस्तूंची आयात ही निर्यातीपेक्षा १६० अब्ज अमेरिकन डॉलरएवढी अधिक होती.

  • चालू खाते (Current Account): यात समावेश होतो आपल्या देशाने निर्यात केलेल्या सेवा आणि आपल्या देशाने आयात केलेल्या सेवा यांचा. त्याचबरोबर जेव्हा आपण केलेल्या गुंतवणुकीवर आपल्याला व्याज मिळते, भारतीय कंपन्यांनी परदेशात कमावलेल्या उत्पन्नातील लाभांश, कमावलेला नफा हे एका बाजूला आणि आपण घेतलेल्या कर्जावरील व्याजाची परतफेड, परकीय कंपन्यांनी त्यांच्या देशात पाठवलेला नफा/लाभांश खर्चाच्या बाजूला नोंदवला जातो. उदाहरणार्थ, जर परदेशी काम करत असलेल्या भारतीय मुलाने आपल्या घरच्यांना पैसे पाठवले तर ते या खात्यात जमा बाजूला नोंदविले जातील आणि परदेशी नागरिक जर भारतात काम करून पैसे कमावत असेल आणि त्याने ते पैसे त्याच्या देशात नेले तर ते या खात्याच्या खर्चाच्या बाजूला नोंदवले जातील. गेल्या तीस वर्षांत आपल्याकडे सेवा क्षेत्राचा भरभरून विस्तार झाला आणि त्यामुळे या खात्यावर शिल्लक अधिक दिसते. मात्र व्यापार खात्यावरील तूट यात गणली गेली की ती शिल्लक रोडावते! प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक गेल्या आर्थिक वर्षांसाठी ६१ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी होती. याच कालावधीत पोर्टफोलिओ गुंतवणूक २२ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी होती.
  • भांडवली खाते (Current Account): भारतात परदेशातून आलेली गुंतवणूक, घेतलेली कर्जे आणि भारताने विदेशात केलेली गुंतवणूक आणि काढलेली कर्जे यांचा या खात्यात समावेश होतो. म्हणजे परदेशी गुंतवणूकदार भारतात शेअर्समध्ये गुंतवणूक करतात किंवा थेट विदेशी गुंतवणूक करून नवनवे प्रकल्प आखले जातात ते जमा बाजूला आणि भारतातून परदेशात गुंतवणूक झाली तर ती खर्चाच्या बाजूला नोंदवली जाते. भारताने काढलेली अल्प-मध्यम-दीर्घकालीन कर्जे एका बाजूला आणि दुसऱ्या देशांना केलेला कर्जपुरवठा दुसऱ्या बाजूला नोंदवलेला असतो. भारताच्या बाबतीत गेल्या दोन दशकांत विदेशी गुंतवणुकीचा ओघ सतत कायम असल्याने भांडवली खाते शिलकीचे दिसते!

चालू आणि भांडवली खाते मिळून देशाचा एकूण व्यापार समतोल मिळतो. एका आर्थिक वर्षांत समजा, एकूण जमा परकीय चलन खर्चापेक्षा अधिक असेल तर व्यवहार शिलकीचा झाला आणि तेवढे परकीय चलन रिझव्‍‌र्ह बँकेकडे जमा झाले, असे म्हणता येईल. जसे २०१७-१८ मध्ये भारताच्या परकीय चलन साठय़ात ४३ अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली!           (स्रोत : रिझव्‍‌र्ह बँक वार्षिक अहवाल)

joshikd28@gmail.com

(लेखक वित्तीय नियोजनकार आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक)

First Published on February 11, 2019 12:01 am

Web Title: guidance for financial planning 4