|| अनुराधा किरण सहस्रबुद्धे

डॉक्टर हे गेल्या सात-आठ वर्षांपासूनचे माझे अशील आहेत. एका आर्थिक साक्षरता उपक्रमात ते आले होते. त्यांनी आर्थिक साक्षरता कार्यशाळेनंतर भेट घेऊन आपले नियोजन करून घेतले होते. वर्षांतून एकदा डॉक्टर आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी चर्चा करून गुंतवणूक नियोजनात थोडे फार बदलसुद्धा करीत असत. डॉक्टरांनी ६७ लाख कर्ज घेऊन स्वत:चे खासगी रुग्णालय सुरू केले. त्याच दरम्यान आमची ओळख झाली होती. वेगवेगळी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी डॉक्टरांनी वेळोवेळी आपल्या कर्ज टॉप केले होते. डॉक्टरांच्या सुरुवातीच्या काळात कर वजावटीसाठी आवश्यक तितकीच गुंतवणूक करावी. बँकेचे कर्ज प्रथम फेडावे या मताची असल्याने मोठय़ा रकमेची एसआयपी सुश्रु केली नव्हती. महिन्याभरापूर्वी डॉक्टरीणबाईंचा फोन आला आणि रविवारी सकाळी चहाला या, असे त्या म्हणाल्या. दरम्यानच्या काळात डॉक्टरांच्या रुग्णालयात दाखल झालेला एक रुग्ण वित्तीय नियोजक असल्याने उपचारानंतर बरे झाल्यावर त्याने डॉक्टरांच्या भेटीची वेळ मागितली आणि डॉक्टरांच्या १.५ लाखांच्या ‘एसआयपी’ सुरू केल्या. मागील १९ महिन्यांपासून सुरू असलेल्या एसआयपीच्या माध्यमातून डॉक्टरांनी २८.५ लाखांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीचे आम्ही भेटलो त्या दिवशी बाजार मूल्य २७.७३ लाख रुपये होते. मूळ गुंतविलेल्या भांडवलापेक्षा कमी झालेले बाजारमूल्य डॉक्टरांना खुपत असल्याने डॉक्टरांना माझ्याकडून ‘सेकंड ओपिनियन’ हवा होता. डॉक्टरांच्या सध्याच्या रुग्णालयाच्या शेजारचा प्लॉट विक्रीकरिता उपलब्ध झाल्याने त्यांनी तो १.२५ कोटी रक्कम देऊन खरेदी केला होता. ही माझ्यासाठी मोठी बातमी होती. सध्याच्या डॉक्टरांच्या आर्थिक पार्श्वभूमी वर त्यांना माझा सल्ला हवा होता.

वित्तीय नियोजकाचा सल्ला:

गुळाला ज्याप्रमाणे मुंग्या चिकटतात त्यासारखे डॉक्टरांसारख्या धनिक मंडळींना अनेक जण गुंतवणूकविषयक प्रस्ताव घेऊन भेटायला येत असतात. शेजारचा भूखंड खरेदी करा, असा प्रस्ताव घेऊन आलेली व्यक्ती आणि डॉक्टरांच्या रुग्णालयात दाखल झालेला वित्तीय नियोजक असलेला रुग्ण यांनी डॉक्टरांशी संपर्क साधणे याच प्रकारातले. डॉक्टरांनी जे वित्तीय नियोजन करून घेतले त्यानुसार पाच वर्षांत डॉक्टरांनी कर्जमुक्त होणे हे वित्तीय ध्येय होते; परंतु डॉक्टरांनी स्वत:चा निश्चय स्वत:च मोडला. डॉक्टरांच्या मूळ कर्जापैकी २ लाखांचे कर्ज शिल्लक असले तरी नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांनी कर्ज घेतल्याने आज डॉक्टरांवर २७ लाखांचे कर्ज शिल्लक आहे. आधी केलेल्या वित्तीय नियोजनानुसार डॉक्टरांनी कर्ज फेडणे आवश्यक होते. त्याऐवजी डॉक्टरांच्या कर्जात वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त रुग्णालयाच्या विस्तारासाठी लगतचा भूखंड उपलब्ध झाल्याने, तो खरेदी करण्यासाठी डॉक्टरांनी सग्यासोयऱ्यांकडून १ कोटीचे कर्ज घेतले आहे. आजच्या तारखेला डॉक्टरांचा ताळेबंद मांडला तर तो असा दिसेल. (खालील तक्ता)

वाढीव विमा छत्र गरजेचे..

आजच्या घडीला डॉक्टरांवर १.३१ कोटींचे कर्ज असून डॉक्टरांची मालमत्ता २.१९ कोटींची आहे. डॉक्टरांनी ५० लाखांचा मुदतीचा विमा खरेदी केला आहे. कर्ज वजा जाता डॉक्टरांकडे ८८ लाखांची मालमत्ता आहे. ही मालमत्ता रोकडसुलभ नाही. काही अपरिहार्य कारणांनी ही मालमत्ता विकावी लागली तर ८८ लाखांपेक्षा कमी रक्कम मिळेल. अनेकदा महत्त्वाकांक्षेपायी किंवा आहे त्यापेक्षा अधिक चांगले जीवन जगण्यासाठी कर्ज काढले जाते. त्यात काहीही गैर नाही. जोपर्यंत कर्ज फेडण्याची क्षमता आहे तोपर्यंत कर्ज गरज असल्यास जरूर घ्यावे; परंतु अकस्मात मृत्यू आल्यास कर्ज फेडण्याची क्षमता संपुष्टात येते. मृत्यूवर कोणाचीच सत्ता चालत नसूनदेखील कर्ज फिटेपर्यंत मला मृत्यू येणार नाही, अशी अनेकांची भावना असते; परंतु मृत्यूइतकी अनिश्चित घटना कोणतीही नाही. म्हणूनच सध्या डॉक्टरांवर कर्ज असल्याने आणि हे कर्ज फेडण्यास पुरेशी मालमत्ता नसल्याने डॉक्टरांनी किमान १ कोटीचे विमा छत्र तातडीने घेणे गरजेचे आहे.

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)