07 December 2019

News Flash

नाव जागवणारी..

‘नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा’ अशी आपल्याकडे म्हण आहे.

|| वसंत कुलकर्णी

गुंतवणूक किंवा भांडवली बाजारात त्या ठरवून आल्या नाहीत आणि वीस वर्षे कालावधीसाठी एकाच म्युच्युअल फंडात काम करीत असल्याचे आढळून येणाऱ्याही त्या विरळाच..

‘नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा’ अशी आपल्याकडे म्हण आहे. ही म्हण नाव आणि कर्तृत्व यातील विसंगती अधोरेखित करते. गोरे आडनावाची व्यक्ती सावळी असू शकते तर काळे आडनावाची व्यक्ती लख्ख गोरी असू शकते. पण नाव आणि त्याला साजेशा कर्तृत्वातील सुसंगती दाखविणारी उदाहरणे अभावाने दिसतात. नाव आणि कामातील सुसंगती लक्ष्मी अय्यर यांच्या बाबतीत नेमकी घडून आली आहे. लक्ष्मी अय्यर या नावाला साजेसे कर्तृत्व गाजवत आहेत.

अनेकदा शेअर बाजारात महाग म्हणून विकत घेणे टाळलेला शेअर काही दिवसांनी अधिक किमतीला खरेदी करावा लागल्याच्या घटना गुंतवणूकदारांसाठी नवीन नाहीत. असेच काहीसे कोटक म्युच्युअल फंडाच्या निश्चित गुंतवणुकीच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी लक्ष्मी अय्यर यांच्या बाबतीत झाले. एमबीएच्या शेवटच्या सत्रात ‘प्लेसमेंट वीक’मध्ये कोटक समूहात नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीनंतर त्यांची नोकरीसाठी निवड झाली नाही. दरम्यानच्या काळात त्या एका दलाली पेढीत दाखल झाल्या. त्या दलाली पेढीत असताना कोटक समूह त्यांचे अशील होता. दोन वर्षांनंतर कोटक म्युच्युअल फंड सुरू होताना त्यांना म्युच्युअल फंडात दाखल होण्याची संधी मिळाली. आज गेली वीस वर्षे त्या कोटक म्युच्युअल फंडात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडत आहेत.

मध्यमवर्गातील पलक्कड अय्यर कुटुंबात जन्म झाला. दोन बहिणींतील त्या धाकटय़ा. वडील एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करून सेवानिवृत्त झाले आहेत तर आई गृहिणी आहेत. वडाळ्याच्या ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण झाले. बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण माटुंग्याच्या आर ए पोद्दार महाविद्यालयात झाले, तर पाल्र्याच्या एनएम कॉलेजमधून त्या एमबीए झाल्या.

गुंतवणूक किंवा भांडवली बाजारात त्या ठरवून आलेल्या नाहीत. त्या ज्या वेळी समभाग संशोधन करीत होत्या त्या वेळी त्यांना गुंतवणूक विद्येची आवड निर्माण झाली. त्या कोटक म्युच्युअल फंडात १९९९ मध्ये दाखल झाल्या. नोव्हेंबर १९९९ मध्ये कोटक बाँड फंडासाठी संशोधन, त्याचे यशस्वी विपणन ही त्यांनी कोटक म्युच्युअल फंडासाठी पार पाडलेली पहिली जबाबदारी.

‘‘त्या एनएफओमध्ये १०० कोटीसुद्धा मिळाले नव्हते, आज हा फंड १७०० कोटींपेक्षा अधिक निधी व्यवस्थापन असलेला फंड आहे,’’ त्या जुन्या आठवणीत रमून गेल्या होत्या. सुरुवातीच्या काळात कोटक म्युच्युअल फंडाच्या रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांसाठी त्या संशोधन करीत होत्या. कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्या व्यवसायातील विक्री कौशल्य जाणणे गरजेचे असते, हे लक्ष्मी यांचे ठाम मत असल्याने काही काळासाठी त्या गुंतवणूक खात्यातून व्यवसायविस्तार विभागात रुजू झाल्या. त्यांना २००६ ते २००८ दरम्यान गुंतवणुकीव्यतिरिक्त अन्य विभागांचे कामकाज जाणून घेता आले. २००८ मध्ये त्या पुन्हा गुंतवणूक व्यवस्थापन विभागात परत आल्या. सध्या त्यांच्याकडे कोटक म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूक, उत्पादने, ऑफशोअर (परदेशातील गुंतवणूकदारांच्या निधीचे व्यवस्थापन) या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत.

‘‘माझी दोन लग्नं झाली आहेत. पहिलं लग्न कोटक म्युच्युअल फंडाबरोबर १९९९ मध्ये आणि दुसरं लग्न २००२ मध्ये माझ्या पतीसोबत’’, त्या गमतीने म्हणतात.

गुंतवणूक करण्यापूर्वी भरपूर ‘डय़ू डिलिजन्स’ (खरेदीपूर्व खातरजमा) करणाऱ्या लक्ष्मी यांनी पितर परिवारातील परिचिताकडून लग्नासाठी विचारणा झाल्यावर लगेचच होकार कळविला. ‘‘बीड ऑफर मॅच हो गया और डील पक्का हो गया’’.. बाँड मार्केटच्या परिभाषेत त्यांनी आपल्या लग्नाची कथा सांगितली. कदाचित लक्ष्मी यांनी सर्वात कमी वेळात ‘क्लोज’ केलेले हे डील असेल. ‘‘लाईफ में और करिअर में उपर-नीचे चलता रहता है’’, त्यांनी सहजपणे सांगितले.

फार कमी कर्मचारी वीस वर्षे एकाच म्युच्युअल फंडात काम करीत असल्याचे आढळून येते. याबाबत त्या सांगतात, ‘‘कोटक समूहात काम करताना तुम्हाला एक चौकट आखून दिली जाते. तुम्ही त्या चौकटीत काम करणे अपेक्षित असते. त्या चौकटीत इतर कोणी ढवळाढवळ करीत नाही. तुम्ही एक उद्यमशील असल्यासारखे तुम्हाला स्वातंत्र्य असते.’’

त्यांच्या आयुष्यात तीन ‘एफ’ना त्या महत्त्व देतात. पहिला ‘एफ’ फायनान्स, दुसरा ‘एफ’ फूड आणि तिसरा ‘एफ’ म्हणजे फिल्म. त्या स्वत:ला हार्डकोअर मुंबईकर समजतात. इडली-डोशापेक्षा वडापाव, मिसळ, थालीपीठ हे त्यांच्या आवडीचे पदार्थ आहेत. सोलापूरची शेंगदाण्याची चटणी, कोल्हापूरची झणझणीत मिसळ त्या आवडीने खातात. कधी काळी त्या ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ चुकवीत नसत. व्यस्त जीवनशैलीमुळे फर्स्ट शोला जाणे जमतेच असे नाही. पण सिनेमा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. कधी काळी त्या माटुंग्याच्या रस्त्यावर गल्ली क्रिकेट खेळत असत. आता रस्त्यावर वाढलेल्या वाहनांमुळे मुलांना खेळता येत नसल्याची त्यांना खंतदेखील वाटते.

कु ठल्याही म्युच्युअल फंड वितरकासाठी त्या नेहमीच उपलब्ध असतात. एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर वेळ ठरवून त्यांच्याशी संवाद साधता येतो.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीत एक दिवसाच्या गुंतवणुकीपासून ते दीर्घकालीन गुंतवणूक करून संपत्तीनिर्मितीसाठी पर्याय उपलब्ध आहेत याचा त्यांना अभिमान वाटतो. तर म्युच्युअल फंड विकताना वितरक गुंतवणुकीतील धोके गुंतवणूकदाराला समजावत नाहीत याची खंत त्या अनेकदा बोलून दाखवतात. त्यांचा वितरकांशी असलेला दांडगा संपर्क हे कोटक म्युच्युअल फंडासाठी बलस्थान आहे. जेथे व्यवसायविस्ताराची संधी आहे तिथे त्या म्युच्युअल फंड वितरकाला भेटायला तयार असतात. म्हणूनच असेल कदाचित पण अनेक वितरकांच्या मनात कोटक म्युच्युअल फंड म्हणजे लक्ष्मी अय्यर आणि लक्ष्मी अय्यर म्हणजे कोटक म्युच्युअल फंड हे समीकरण पक्के बसले आहे.

shreeyachebaba@gmail.com

First Published on February 11, 2019 12:06 am

Web Title: guidance for financial planning 7
Just Now!
X