18 July 2019

News Flash

मधुरा खरे

अर्थ वल्लभ

|| वसंत कुलकर्णी

रत्नागिरीच्या ‘अंतूशेट’च्या पिढय़ा याच मातीत उगवल्या आणि विस्तारल्या. अंतूच्या वंशातली एक शाखा गुहागरात समृद्धीत नांदत आहे. अंतूच्या पणतीला गुहागरातल्या वरल्या पाटातल्या खऱ्यांकडे दिली आहे. पाच फुटांच्या आतबाहेर उंची, तांबूस गोरा वर्ण आणि घारे डोळे सानुनासिक पण सुस्पष्ट आवाजाच्या मधुराची आणि माझी ओळख एका कार्यक्रमानिमित्ताने झाली. पणजोबांच्या नशिबात जरी अश्वत्थामाच्या दुधाची वाटी असली तरी पणती मात्र सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली. अंतूला दसरा-दिवाळीला मनीऑर्डरीतून पितृप्रेमाचे पोस्त मिळाले, की अंतू मिशीला कोकम लावून तूप, तूप म्हणून सांगत फिरायचा आणि चार दिवस खिशातील खुर्दा खुळखुळवत असायचा. पणती मात्र ‘कॅशलेस’ संस्कृतीची प्रतिनिधी असल्याने दिखाव्यासाठी तिला नाणी वाजवावी लागत नाहीत. पर्समध्ये असलेल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डामुळे चार-पाच लाखांची खरेदी ती सहज करू शकते. मधुरा चित्तपावनकुलोत्पन्न असल्याने आणि डोक्यावर पिढय़ान्पिढय़ा थापलेल्या खोबरेल तेलामुळे परंपरेने मिळालेल्या तैलबुद्धीला तिने व्यवहारकुशलतेची जोड दिली आहे. ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’ नियमित वाचनाची सवय असल्याने व्यवहारकुशलतेला अर्थसाक्षरतेचे कोंदण लाभले आहे. तिने पंचक्रोशीतील एकाही विमा विक्रेत्याला आपल्या घराचा उंबरठा ओलांडून दिलेला नाही. मनी बॅक किंवा एन्डोमेंट पॉलिसी खरेदी करणे म्हणजे त्या पैशाचा ‘अण्णू गोगटय़ा करणे’ असे तिचे ठाम मत आहे. घरातल्या कमावत्या व्यक्तींचा शुद्ध विमा हवाच, अशी तिची आग्रही भूमिका आहे.

मधुराचा जन्म रत्नागिरीत झाल्याने तिथल्या लाल चिऱ्याचे, खाजऱ्या अळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण तिच्यात ओतप्रोत भरलेले आहेत. गुहागरला एका वर्षी महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने झालेल्या वित्तीय नियोजनावरील कार्यक्रमाला गेलो असताना मधुराचा परिचय झाला.

मधुराने केलेले आदरातिथ्य वाखाणण्याजोगे होते. कोकणातल्या ओल्या काजूची उसळ, फणसाची भाजी आणि गोडीत साखरेला मागे सारणाऱ्या गुहागरच्या नारळापासून केलेले उकडीचे मोदक असा जेवणाचा फक्कड घाट मधुराने घातला होता. अन्नपूर्णेचा तिच्यावर वरदहस्त होता. मधुरा मुंबईत आली असल्याने कालच तिची भेट झाली. घरात प्रवेश करताच तिने विचारले, ‘‘काका, रिटायरमेंट फंडात गुंतवणूक करावी का? काल आंजल्र्याहून प्रमोद नित्सुरे आले होते. त्यांनी आदित्य बिर्लाचा एनएफओ सुरू असलेला रिटायरमेंट फंड सुचविला आहे. या फंडात ‘एसआयपी’ करा असे म्हणत होते.’’

‘‘तुझ्या खरे आडनावाला शोभेल असेच तू बोलतेस म्हणून मीसुद्धा तुझ्या खऱ्या प्रश्नांना खरी उत्तरे देतो.’’

‘‘म्युच्युअल फंडांचे ‘सेबी’ने १ एप्रिल २०१८ पासून वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणात ‘सोल्युशन ओरिएंटेड फंड्स’ असा एक नवीन फंड प्रकार निर्माण केला. व्यवसायवृद्धीसाठी नवीन फंड उपलब्ध करून देणे ही फंड घराण्यांची गरज आहे. ज्या फंड घराण्याकडे जो फंड प्रकार नाही तो फंड प्रकार ‘एनएफओ’च्या माध्यमातून फंड घराणी उपलब्ध करून देत आहेत.’’

‘‘काका, रिटायरमेंट फंड आणि अन्य इक्विटी फंड यामध्ये नेमका काय फरक आहे आणि सेवानिवृत्तीनंतरच्या उदरनिर्वाहासाठी अन्य फंड प्रकार असताना रिटायरमेंट फंडच का निवडावा?’’

‘‘काही वर्षांपूर्वी ‘सेबी’ने गुंतवणूकदारांचा एक सव्‍‌र्हे केला होता. या सव्‍‌र्हेच्या निष्कर्षांनुसार मुलांचे शिक्षण आणि उतारवयातील उदरनिर्वाह ही बचत करण्यामागील सर्वाधिक पसंतीची कारणे आहेत. मुलांचे शिक्षण आणि उतारवयातील उदरनिर्वाह हे साध्य आहे, तर म्युच्युअल फंडातील नियोजनबद्ध गुंतवणूक हे साधन आहे. सामान्य माणसाच्या या वित्तीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी गुंतवणूकदारांना ‘एसआयपी’ ही गुरुकिल्ली वाटू लागल्याने म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’मार्फत गुंतविल्या जाणाऱ्या रकमेने जानेवारी महिन्यात ८ हजारांचा टप्पा पार केला. हे आर्थिक वर्ष संपेल तेव्हा या रकमेने साडेआठ हजार कोटींचा टप्पा गाठला असेल.’’

‘‘बारमाही वाहत्या गंगेत हात धुवायला कोणाला आवडत नाही? मालमत्ता व्यवस्थापन हासुद्धा एक व्यवसाय आहे आणि कोणत्याही व्यवसायाचा हेतू हा नफा कमविणे हा असतो. आंजल्र्याहून प्रमोद नित्सुरे तुझी सेवानिवृत्तीनंतरच्या उदरनिर्वाहासाठी सोय व्हावी म्हणून नक्कीच आले नव्हते. तू केलेल्या गुंतवणुकीवर चार पैसे मिळाले तर कमवावे या उद्देशाने ते आले होते. रत्नागिरीत जन्मलेल्या आणि गुहागरमध्ये वास्तव्यास असलेल्या तुझ्यासारख्या सुज्ञास हे सांगणे न लगे.’’

‘‘फंड घराण्यांची मालमत्ता जितकी अधिक तितका नफा अधिक हे गणित असते. ‘सोल्युशन ओरिएंटेड फंड्स’ हे लोकांच्या वेगवेगळ्या गरजांवर उपाय सुचविणारे असल्याने हा नवीन फंड गुंतवणूकदारांच्या उतारवयातील उदरनिर्वाहाच्या गरजेवर उपाय सुचविणारा फंड आहे.’’

‘‘जसे की, ‘ईएलएसएस’ फंडांचा परतावा हा अन्य फंडांपेक्षा अधिक असतो, कारण या फंडातून तीन वर्षे पैसे काढता येत नाहीत. रिटायरमेंट फंडात वयाच्या साठीपर्यंत किंवा गुंतवणूक केल्यापासून किमान पाच वर्षे रक्कम काढता येत नाही.’’

‘‘एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी, ‘टाइम इन द मार्केट इज ऑल्वेज बेटर दॅन टायमिंग द मार्केट’ हे लक्षात ठेवायला हवे. रिटायरमेंट फंड नेमक्या याच तत्त्वावर आधारलेले आहेत. या फंडात गुंतविलेले पैसे पाच वर्षे किंवा वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत काढता येणार नसल्याने या फंडाच्या गुंतवणुकीवर अधिक नफा मिळेल. टाटा म्युच्युअल फंडाचा एकही फंड दखल घ्यावा इतका नफा देत नसताना त्यांचा रिटायरमेंट फंड लक्षवेधी परतावा देतो याचे कारण गुंतवणूकदार दीर्घकाल या फंडात गुंतवणूक करतो हे आहे.’’

‘‘तथाकथित गुंतवणूक सल्लागारांनी कधी आपल्या अशिलांना कधी ‘एनपीएस’चा आग्रह धरल्याचे ऐकलेस काय? अनेक बँका पेन्शनसाठी ‘एनपीएस’ऐवजी ‘विमा उत्पादने’ विकणे का पसंत करतात याचा शोध तू घे. ‘एनपीएस’मध्ये वयाच्या साठीपर्यंत एक नवा पैसा काढता येत नाही. ‘एनपीएस’मध्ये करबचत आणि उतारवयातील उदरनिर्वाहाची तरतूद हे दोन्ही हेतू साध्य होत असल्याने मी कायम ‘एनपीएस’चा पुरस्कर्ता राहिलो आहे.’’

‘‘बिर्लाच्या रिटायरमेंट फंडाची आणखी एक गमंत आहे. ती अशी की, साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा पाच वर्षे या फंडातून रक्कम काढता येणार नाही. समजा, जानेवारी २०२२ मध्ये मी साठ वर्षे पूर्ण केली तर डिसेंबर २०२१ पर्यंत गुंतविलेली सर्व रक्कम जानेवारी २०२२ मध्ये मिळेल. माझ्यासारख्या साठ वर्षे पूर्ण होण्यास सहा-सात वर्षे शिल्लक असलेल्यांसाठी हा फंड गुंतवणुकीचे एक आदर्श साधन आहे.’’

‘‘रिटायरमेंट फंडात गुंतवणूक केली म्हणजे निश्चिंत व्हावे अशी परिस्थिती आज नाही. तू किती वर्षे जगणार हे त्या देव व्याडेश्वराशिवाय कोणालाही छातीठोकपणे सांगता येणार नाही. सेवानिवृत्तीनंतर अधिक वर्षे जगल्यास पुरेसा पैसा गाठीला असणे गरजेचे आहे. मुदलाची सुरक्षितता आणि विमा पॉलिसीची मुदत संपल्यावर मिळणारी निश्चित रक्कम यापेक्षा महागाईमुळे साठवलेल्या पैशाची क्रयशक्ती गमावण्याचा धोका अधिक आहे. सेवानिवृत्त होताना माझ्याकडे पुरेसा पैसा आहे, हा भ्रम आहे. ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स’चा अजिबात विचार न करणे, ही रिटायरमेंट प्लानिंग निष्फळ होण्याची मुख्य कारणे आहेत. रिटायरमेंट फंडांचा एक्स्पेन्स रेशो आणि ‘एनपीएस’चा एक्स्पेन्स रेशो विचारात घेतल्यास ‘एनपीएस’मध्ये १०० टक्के इक्विटी गुंतवणुकीचा पर्याय नाही आणि सक्तीची पेन्शन घ्यावी लागणे हे दोन दोष गृहीत धरूनदेखील माझ्या नियोजनात मी ‘एनपीएस’ला प्राथमिकता देतो. ‘एनपीएस’मधील गुंतवणूक करून पैसे उरले तर रिटायरमेंट फंडांचा गुंतवणुकीसाठी विचार करेन. माझ्या नियोजनात ‘एनपीएस’नंतर रिटायरमेंट फंडांना स्थान असते.’’

मागील पिढीतील भारतीय, रिटायरमेंट प्लानिंगपेक्षा मुलांवर अधिक निर्भर होते. आर्थिक साक्षरतेमुळे भारतीयांच्या मानसिकतेत बदल होताना दिसत असल्याने बाजारात रिटायरमेंट फंडांचा सुकाळ झालेला दिसतो. बिर्लाचा रिटायरमेंट फंडाचा एनएफओ याचेच फलित आहे.

‘‘रिटायरमेंट फंड तुझ्या वित्तीय ध्येयांशी सांगड घालणारे असतील तर तू या फंडात जरूर ‘एसआयपी’ कर.’’

shreeyachebaba@gmail.com

First Published on March 4, 2019 12:05 am

Web Title: guidance for mutual funds