20 March 2019

News Flash

लाभ-गतिशीलतेचे वंगण!

गल्फ ऑइल इंटरनॅशनलच्या सहकार्याने दशकभरापूर्वी हिंदुजा समूहाने स्थापन केलेली ही कंपनी.

|| अजय वाळिंबे

गल्फ ऑइल इंटरनॅशनलच्या सहकार्याने दशकभरापूर्वी हिंदुजा समूहाने स्थापन केलेली ही कंपनी. गल्फ ऑइल इंटरनॅशनल या बहुराष्ट्रीय कंपनीचे १०० हून अधिक देशांत वास्तव्य असून ती तेल आणि वंगण व्यवसायात एक अग्रगण्य कंपनी मानली जाते. भारतामध्ये कंपनीची सिल्व्हासा आणि चेन्नई येथे दोन प्रमुख उत्पादन केंद्रे आहेत. केवळ दहा वर्षांपूर्वी भारतात व्यवसाय सुरुवात केल्यापासून कंपनीने आपला उत्तम जम बसविला आहे. वाणिज्य वाहनासाठी डिझेल इंजिन ऑइल तसेच दुचाकी वाहनासाठीचे इंजिन ऑइल कंपनी उत्पादित करते. आपल्या गुणवत्तेच्या आणि ब्रॅण्डच्या जोरावर कंपनीने आपल्या उत्पादन श्रेणीसाठी अशोक लेलॅण्ड, बजाज, भारत बेन्झ, मान, स्वराज, महिंद्र तसेच सोनालिका ट्रॅक्टर सारख्या कंपन्यांशी करार केले आहेत. वाहन उद्योगाखेरीज कंपनी औद्योगिक क्षेत्रालादेखील वंगण आणि तेलाचा पुरवठा करते. आपल्या उत्पादनांच्या वितरणासाठी कंपनीने देशांतर्गत वितरकांचे जाळे विणले आहे. वाहन क्षेत्रासाठी ३२० तर औद्योगिक क्षेत्रासाठीच्या उत्पादनांसाठी ३० वितरक नेमले असून कंपनीचे ३३ डेपो आहेत. पाच क्षेत्रीय कार्यालये असलेल्या या कंपनीचे ५०,०००हून अधिक रिटेलर्स आहेत. गेली दहा वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या या कंपनीचा गल्फ ऑइल हा ब्रॅण्ड पहिल्या तीन ब्रॅण्डमध्ये मोडतो. कंपनीचा सध्याचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा सरासरी ७.५ टक्के आहे. कंपनीचे मार्च २०१८ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. डिसेंबर २०१७ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने उत्कृष्ट निकाल जाहीर केले असून, सरलेल्या आर्थिक वर्षांसाठी कंपनी सुमारे १,३०० कोटी रुपयांच्या उलाढालीवर १५४ कोटी रुपयांचा नक्त नफा मिळवू शकेल, असा अंदाज आहे (संदर्भ : अ‍ॅक्सिस कॅपिटल). चेन्नईत उत्पादन केंद्र पूर्णपणे कार्यान्वित झाल्याचा फायदा आगामी आर्थिक वर्षांत होईल. सध्या ९०० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर पोर्टफोलिओत दीर्घावधीसाठी ठेवाच.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on May 14, 2018 12:08 am

Web Title: gulf oil lubricants india ltd