अजय वाळिंबे

हिंदुजा समूहाची गल्फ ऑइल ल्युब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड ही भारतीय वंगण उद्योगातील एक प्रस्थापित आणि अग्रेसर कंपनी आहे. गल्फ ऑइल ल्युब्रिकन्ट्स ही बहुराष्ट्रीय ‘गल्फ ऑइल इंटरनॅशनलची’ उपकंपनी असून, जागतिक स्तरावर (अमेरिका, स्पेन आणि पोर्तुगाल वगळता) ‘गल्फ’ या सुप्रसिद्ध ब्रँडची मालक आहे. कंपनीची १०० हून अधिक देशांमध्ये उपस्थिती आहे.

कंपनी गेली अनेक वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करत असून सध्या भारतातील एक अग्रगण्य वंगण उत्पादक आहे. गेल्या आठ वर्षांत कंपनीने वार्षिक ११% वाढीसह इतर वंगण उद्योगाच्या वाढीच्या ३-४ पट वाढीची नोंद केली आहे. कंपनीची उत्पादने प्रामुख्याने ऑटोमोटिव्ह आणि इतर औद्योगिक क्षेत्रात वापरली जातात. आपल्या उत्तम वितरक नेटवर्कद्वारे कंपनी ओईएम तसेच इतर बी २ बी ग्राहकांना आपली उत्पादने पुरवते. कंपनीची बहुतांशी उत्पादने ऑटोमोटिव्ह, औद्योगिक आणि मरिन उद्योगात वापरली जातात. कंपनीच्या उत्पादनांना एपीआय, जेएएसओ, एसीईए आणि इतर अग्रगण्य ग्लोबल ओईएमसारख्या जागतिक स्तरावरील मान्यवर संस्थांकडून मान्यता मिळाली आहे.

कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत अशोक लेलँड, महिंद्र, स्वराज, व्हॉल्वो पेंटा, मान, भारत बेंझ, व्हिटमोर, श्विंग स्टीटर आणि बजाज यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. गल्फ ऑइल ल्युब्रिकन्ट्सचे भारतात सिल्व्हासा तसेच एन्नोर, चेन्नई येथे अद्ययावत उत्पादन प्रकल्प आहेत. आपली उत्पादने देशभरात सहज उपलब्ध होण्यासाठी कंपनीने ३२० ऑटो वितरक, ३० औद्योगिक वितरक आणि ५०,००० हून अधिक किरकोळ विक्रेत्यांचे पॅन इंडिया नेटवर्क उभारले आहे. वितरणासाठी कंपनीची ३३ वितरण आगारे तसेच पाच प्रादेशिक कार्यालये आहेत.

गेल्या आर्थिक वर्षांत करोना महामारीमुळे कंपनीच्या कामकाजावर सुरुवातीला विपरीत परिणाम झाला होता. मात्र नुकत्याच संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. यंदाच्या तिमाहीच्या उलाढालीत डिसेंबर २०१९ च्या तुलनेत कंपनीने १४.२२% वाढ नोंदवून ती ४८१.८६ कोटीवर नेली आहे, तर नक्त नफ्यात १४.५५% वाढ होऊन तो ६४ कोटी रुपयांवर नेला आहे.

कंपनीचा कारभार प्रामुख्याने वाहन उद्योगावर अवलंबून आहे. सध्या वाहन क्षेत्राला बरे दिवस आले असून साहजिकच वंगण उद्योगही तेजीत राहण्याची शक्यता आहे. या खेरीज कंपनीने नुकताच गल्फ ऑइल इंटरनॅशनल या सहयोगी कंपनीसमवेत ब्रिटनमधील क्लीन ग्रोथ फंडात इलेक्ट्रिक वाहन उद्योग तसेच चार्जिंग स्टेशनसाठी सुमारे १५,००,००० पौंड गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या या कंपनीकडून पुढेही भरीव कमगिरीची अपेक्षा आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून या अत्यल्प बिटा असलेल्या शेअरचा पोर्टफोलियोसाठी जरूर विचार करावा.

गल्फ ऑइल ल्युब्रिकन्ट्स लि.

(बीएसई कोड – ५३८५६७)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ७२१/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु.८४६/४५०

भरणा झालेले भागभांडवल रु. १०.०६ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ७२.०२

परदेशी गुंतवणूकदार      ११.४५

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ६.३६

इतर/ जनता     १०.१७

संक्षिप्त विवरण

* शेअर गट     : स्मॉल कॅप

* बाजार भांडवल        : रु. ३,६२७ कोटी

* प्रवर्तक       : हिंदुजा समूह

* व्यवसाय क्षेत्र  : वंगण, पेट्रोलियम उत्पा.

* पुस्तकी मूल्य : रु. १५३

* दर्शनी मूल्य   : रु. २/-

* लाभांश       : ७००%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. ३५.११

*  पी/ई गुणोत्तर :      २०.५

*  समग्र पी/ई गुणोत्तर : २०.६

*  डेट इक्विटी गुणोत्तर : ०.४

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    ११.२

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :२८.७

*  बीटा :      ०.३

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.