म्युच्युअल फंडांची संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’कडून नियतकालिक उपलब्ध होणारी आकडेवारी ही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या वर्तनाचे जणू प्रतिबिंब असते. डिसेंबर महिन्याच्या या आकडेवारीचे विश्लेषण नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सुरू असलेल्या ‘एसआयपी’पैकी ५७ टक्के  एसआयपी या मागील पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असल्याचे   आकडेवारी सांगते. तर १५ टक्के एसआयपी मागील वर्षभरापेक्षा कमी कालावधीपासून सुरू आहेत. ३१ डिसेंबर २०१५ च्या आकडेवारीनुसार सर्वाधिक एसआयपी या तीन वर्षे किंवा अधिक कालावाधीपासून सुरू होत्या. दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून सुरू राहिलेल्या एसआयपीच्या टक्केवारीचे प्रमाण १ टक्कय़ांपेक्षा कमी आहे.

या पाश्र्वभूमीवर मागील २४ वर्षांची परंपरा लाभलेल्या एचडीएफसी कॅपिटल बिल्डर या फंडात मागील २४ वर्षे निष्ठेने एसआयपी केली असती तर १८.३१ टक्के  परतावा मिळाला असता. फंडाच्या पहिल्या दिवशी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर एका लाखाचे ३२.४८ लाख झाले असते. मागील २४ वर्षांपासून गुंतवणूकदारांसाठी सातत्याने संपत्ती निर्मिती करणाऱ्या फंडाची सुरुवात १ फेब्रुवारी १९९४ रोजी झुरिच इंडिया कॅपिटल बिल्डर म्हणून झाली. जून २००३ मध्ये झुरिच इंडिया म्युच्युअल फंडाचे एचडीएफसी म्युच्युअल फंडाने अधिग्रहण केल्यानंतर ही योजना एचडीएफसी कॅपिटल बिल्डर म्हणून ओळखली जाते.

हा मल्टी-कॅप प्रकारचा फंड आहे. २३ पैकी १८ वर्षे या फंडाने संलग्न निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा अधिक परतावा दिला आहे. मागील २३ वर्षांत आठ निधी व्यवस्थापक (एक निधी व्यवस्थापक दोन वेळा) अनुभवलेल्या फंडाचे मिथेन लाठिया हे विद्यमान निधी व्यवस्थापक आहेत. बँकिंग, तेल आणि वायू, आरोग्य निगा, अभियांत्रिकी उद्योग, तंत्रज्ञान आणि धातू या क्षेत्रात फंडाची सर्वाधिक गुंतवणूक आहे. संदर्भ निर्देशांकाइतकी गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात, तर आरोग्य निगा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संदर्भ निर्देशांकापेक्षा कमी गुंतवणूक आहे.

दीर्घ मुदतीच्या वित्तीय उद्दिष्टांसाठी एसआयपी करताना निवडीबाबत काळजी घेणे गरजेचे असते. १ फेब्रुवारी १९९४ उपलब्ध निवडक फंडाची एसआयपी कामगिरी सोबतच्या तक्त्यात दिली आहे. हा फंड कधीही वार्षिक एसआयपी परताव्यात अव्वल राहिलेला नाही, तरीही सातत्याच्या बळावर हा फंड वीस वर्षांहून अधिक कालावधीच्या एसआयपी परताव्याच्या तुलनेत अव्वल ठरला आहे. मागील वर्षभराच्या एसआयपी परताव्यावर फंडाची निवड करणे हे धोकादायक असते हे पुराव्याने शाबित करणारी ही आकडेवारी आहे.

येत्या १ फेब्रुवारी रोजी हा फंड २५व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. १ फेब्रुवारी रोजीच्या सर्व उपलब्ध फंडांच्या एसआयपी परताव्याच्या तुलनेत हा फंड पाचव्या क्रमांकावर, तर मल्टीकॅप फंडाच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला हा फंड आहे. १ जानेवारी २०१७ च्या एनएव्हीनुसार मागील एका वर्षांत सर्वाधिक एसआयपी परतावा दिलेले पहिले दहा फंड आणि १ जानेवारी २०१८ च्या एनएव्हीनुसार एका वर्षांत सर्वाधिक एसआयपी परतावा दिलेले पहिले दहा फंडा यांच्यात केवळ दोन फंड सामायिक आहेत. १९९५ ते २०१० या कालावधीत आणि २००१ ते २०१५ या कालावधीत पंधरा वर्षांच्या एसआयपी परताव्याची तुलना केल्यास दहापैकी पाच फंड सामायिक आहेत. २५ वर्षांचा इतिहास असलेले फंड संख्येने मोजके आहेत. या मोजक्या फंडांपैकी परताव्यात सातत्य राखणाऱ्या फंडांत या फंडाचा समावेश होतो. पंचविशीत प्रवेश करणाऱ्या या सुंदरीची निवड वाचकांनी आपल्या गुंतवणुकीत केली तर गुंतवणूकदारांच्या पदरात निराश न करणाऱ्या परताव्याचे आणि सातत्याचे सुख लाभेल, अशी आशा करायला नक्कीच वाव आहे.

वसंत माधव कुळकर्णी

shreeyachebaba@gmail.com