अजय वाळिंबे

काही उद्योगसमूह आणि काही कंपन्या केवळ शेअर बाजारातच नव्हे तर सर्वच बाबतीत उत्तम कामगिरी करून आपली विश्वासार्हता जपत आल्या आहेत. यात टाटा, बिर्ला, गोदरेज, विप्रो, इन्फोसिस आणि अर्थात एचडीएफसीचा समावेश होतो. भारतातील सर्वात मोठी गृहवित्त कंपनी एचडीएफसी आणि त्या कंपनीने स्थापन केलेली एचडीएफसी बँक ही भारतातील आयसीआयसीआय बँकेपाठोपाठची दुसरी खासगी बँक. वर्ष १९९४ मध्ये स्थापना झालेल्या या बँकेने व्यवसायाला सुरुवात केली १९९५ मध्ये. त्यावेळी १९९५ मध्ये ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची केवळ १,००० रुपयांची गुंतवणूक आज २२ लाख रुपयांवर गेली असेल.

आज २५ वर्षांत एचडीएफसी बँकेच्या भारतभरात २,७४८ शहरांत ५,१३० शाखा असून सुमारे १३,३९५ एटीएम आहेत. सध्या आपल्याकडे बँकिंग उद्योगावर मंदीचे सावट आणि साशंकता असताना काही मोजक्या खासगी उत्तम बँकांमध्ये एचडीएफसी बँकेचा समावेश करता येईल. डिजिटल बँकिंग तसेच ऑनलाइन बँकिंग सेवांमध्ये आघाडीवर असणारी ही बँक बँकिंग सेवेबरोबरच वाणिज्य तसेच इन्व्हेस्टमेंट बँकिंग, क्रेडिट कार्ड अशा अन्य वित्तीय सेवाही पुरवते. बँकेच्या एकूण कर्ज वितरणापैकी ४६ टक्के रिटेल, तर ५४ टक्के होलसेल (उद्योगांना) वितरण आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत बँकेने अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी केली आहे. गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या कर्ज वाटपात १७.१ टक्के वाढ झाली असून ठेवींमध्ये १८.५ टक्के वाढ, तर मुदत ठेवींमध्ये २२.५ टक्के वाढ झाली आहे. बँकेचे नेट इंटरेस्ट मार्जनि ४.४ टक्क्यांवर गेले असून नक्त अनुत्पादित कर्ज केवळ ०.४३ टक्के आहेत. जून २०१९ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी बँकेने ३२,३६१.८४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५,५६८.१६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. बँकेची आर्थिक कामगिरी अशीच उत्तम राहील अशी अपेक्षा आहे. बँकेच्या दोन्ही उप-कंपन्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड या दोन्ही कंपन्यांची कामगिरीदेखील उत्तम असून सध्याच्या वातावरणात ही फार महत्त्वाची बाब आहे. गेल्याच महिन्यात शेअर्सचे विभाजन होऊन आता प्रति शेअर दर्शनी किंमत एक रुपया झाली आहे. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कंपनी करातील कपातीचा लाभ एचडीएफसी बँकेला नक्कीच होईल. सध्या १,२५० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर कायम पोर्टफोलिओत ठेवण्यासाठी प्रदीर्घकालीन गुंतवणूक म्हणून दसऱ्याची उत्तम खरेदी ठरू शकेल.

एचडीएफसी बँक लिमिटेड

शुक्रवारचा बंद भाव : रु. १,१८९

(बीएसई कोड – ५००१८०)

लार्ज कॅप समभाग

व्यवसाय : बँक-वित्तीय सेवा

बाजार भांडवल : रु. ६५०४४७ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :

रु. १,२८५ / ९४२

भागभांडवल : रु. ५४७.०८ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    २६.२५

परदेशी गुंतवणूकदार  ३८.६४

बँक/ म्यु. फंड/ सरकार    १७.०८

इतर/ जनता    १८.०३

पुस्तकी मूल्य : रु. २७२.७३

दर्शनी मूल्य :   रु. १/-

लाभांश :  ७५०%

प्रति समभाग उत्पन्न :    रु. ४०.३

पी/ई गुणोत्तर : २९.५

समग्र पी/ई गुणोत्तर :    २१.१

डेट इक्विटी गुणोत्तर :    ६.९७

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १.६४

रिटर्न ऑन कॅपिटल : ७.५१

बीटा :    ०.८

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.