भारतासारख्या प्रगतिशील देशात सध्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या काही क्षेत्रांपैकी विमा हे एक उत्तम क्षेत्र ठरू शकते. प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील लोकसंख्येच्या तुलनेत जीवन विम्याचे कवच असलेली संख्या नगण्य आहे. पूर्वी केवळ एलआयसी या सरकारी कंपनीची मक्तेदारी असलेले हे क्षेत्र खासगी क्षेत्राला खुले केल्यापासून अनेक समूहांनी या क्षेत्रात उडी मारली आहे. अर्थात बहुतेक सर्वच खासगी कंपन्यांनी परदेशी कंपन्यांशी भागीदारी केलेली आहे. सध्या खासगी विमा क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कंपन्यांत एचडीएफसीचे नाव प्रकर्षांने घ्यावे लागेल. गृहवित्त आणि बँकिंग व्यवसायात अग्रणी असलेल्या एचडीएफसी समूहाने स्टँडर्ड लाइफ अबर्डिन या कंपनीच्या सहयोगाने २,००० मध्ये भारतात या व्यवसायाला सुरुवात केली. गेल्या १७ वर्षांत कंपनीने जीवन विमा, युलिप तसेच इतर अनेक गुंतवणूक योजना बाजारात आणून यशस्वीपणे राबविल्या आहेत. खासगी विमा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या या कंपनीच्या आज भारतभरात ४१४ शाखा असून १५ बँकांबरोबर बँकअश्युरन्स भागीदारीतून सुमारे ११,२०० शाखांतून ती आपली विविध विमासंलग्न उत्पादने विकत आहे. ५८,००० हून अधिक विमा एजंट असलेल्या या कंपनीची कामगिरी कायमच सरस राहिली आहे.

विमा अथवा बँकिंग क्षेत्रात स्थिर होण्यास प्रदीर्घ काळ लागतो तसेच उत्तम कंपन्यांतील गुंतवणूक ही प्रदीर्घ काळासाठी करायची असते. त्यामुळे या कंपनीचे आर्थिक निष्कर्ष सध्या तपासायची गरज नाही. एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्स या कंपनीचा ‘आयपीओ’ चार महिन्यांपूर्वीच आला होता. त्याला विशेष प्रतिसादही मिळाला नव्हता. मात्र शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून या शेअरने एचडीएफसी समूहाची परंपरा कायम राखत गुंतवणूकदारांना भरपूर फायदा मिळवून दिला आहे. आयपीओच्या वेळी २९० रुपयांना दिलेला हा शेअर सध्या ४३० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. कंपनीचे प्राइस अर्निग गुणोत्तर (पीई) जास्त वाटत असले तरीही अनुभवी प्रवर्तक, उत्तम ब्रॅण्ड, आश्वासक व्यवसाय, विश्वासार्हता यामुळे प्रदीर्घ काळासाठी गुंतवणूक म्हणून हा शेअर तुमच्या पोर्टफोलियोत हवाच.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.