02 March 2021

News Flash

आरोग्यं धनसंपदा

नूतनीकरणाच्या वेळी ग्राहकांस किमान १०% ते कमाल ६०% नो क्लेम बोनस मिळविण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

आरोग्य विमा करार केवळ एका वर्षांचा करार असून केवळ त्याच वर्षांच्या वयानुसार आणि प्रकृतीमानानुसार नूतनीकरणास तो पात्र ठरतो. पण नूतनीकरणाच्या वेळी ग्राहकांस किमान १०% ते कमाल ६०% नो क्लेम बोनस मिळविण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

आरोग्य विम्याविषयी पहिल्या लेखात मुख्य तीन तांत्रिक बाबींचा उल्लेख झाला आहे. आता थोडक्यात उर्वरित महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊ या –

१) नो क्लेम बोनस (एनसीबी):

आरोग्य विम्याची निवड करताना जर चलनवाढीचा दर आणि वाढते आजारविषयक खर्च यांचा विचार केला तर आयुर्वम्यिाची राशी निवडणे आणि त्याबरोबर आजीवन प्रीमिअम भरता येईल याची खात्री असणे गरजेचे आहे.  सर्वसाधारणपणे बाजारात उपलब्ध असणाऱ्या आरोग्य विमा पॉलीसींवर नो क्लेम बोनस असतो. एनसीबी म्हणजे मागील एका वर्षांत जर वैद्यकीय खर्चाविषयी दावा नोंदविला नसेल तर मिळणारा नफा होय. हा फायदा ग्राहकास विमीत राशीत कुठलाही वाढीव हप्ता न भरता वाढीव आरोग्य विमा राशीद्वारे दिला जातो. वाढते वैद्यकीय खर्च आणि ग्राहकांची हप्ता भरण्याची क्षमता यांचे गुणोत्तर मांडताना नो क्लेम बोनस म्हणजेच एनसीबी फार महत्त्वाचा घटक ठरतो.

गेल्या दोन वर्षांत कमाल २०% वैद्यकीय खर्चाची चलनवाढ लक्षात घेतली तर आजीवन आरोग्य विम्याचे नूतनीकरण करताना नो क्लेम बोनस हा निर्णायक मुद्दा ठरतो.

सध्या केवळ आरोग्य विमा वितरण करणाऱ्या निव्वळ पाच आरोग्य विमा कंपन्या कार्यरत आहेत. किमान १०% ते ६०% नो क्लेम बोनस नूतनीकरणाच्या वेळी ग्राहकांस विनामूल्य वाढवून घेता येईल असे आरोग्य विम्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

बऱ्याचदा इंटरनेटच्या अतिरिक्त वापरामुळे किंवा विनासायास उपलब्धतेमुळे फक्त किमतीशी तुलना करून आरोग्य विमा राशी ठरवली जाते. इतर घटकांशी तुलना न करता केवळ प्रीमिअमची रक्कम विचारात घेतली जाते. काही ग्राहक आरोग्य विमा दरवर्षी वेगवेगळ्या कंपन्यांमधून काढतात आणि कमवलेला बोनसही गमवतात. या चतुराईने ते केवळ स्वत:चे नुकसान करतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. २०१३ नंतर आरोग्य विम्याविषयी काही महत्त्वाची धोरणे निश्चित झाली आहेत. त्यानुसार आरोग्य विमा कंपनी दाव्यानंतर कमवलेला बोनस कधीही शून्य किंवा आरोग्य विम्याच्या मूळ राशीपर्यंत कमी करू शकत नाही तर केवळ मागील वर्षांचा फायदा टप्प्याटप्प्याने वजा होऊ शकतो. उदाहरणार्थ जर एखाद्या ३५ वर्षांच्या सुदृढ ग्राहकाने २०१४ साली रु. ५,००,०००/- आरोग्य विमा राशी ठरवली आणि कमाल ६०% दराने २०१५ साली  ३,००,०००/- रुपये आरोग्य विम्याचा बोनस कमवला नंतर अधिक ३,००,००० रुपये २०१६ साली कमवला तर एकूण ११,००,००० विमा राशी वय वष्रे ३७ असताना खात्यावर जमा होईल. याचा अर्थ मूळ आरोग्य विमा ५,००,००० असून ६,००,००० नो क्लेम बोनस!

हा वाढीव बोनस नूतनीकरणाच्या वेळी कोणताही अधिभार न भरता ग्राहकास उपलब्ध आहे.  जर पुढील नूतनीकरणाआधी २०१६ साली जर वैद्यकीय खर्चाद्वारे ग्राहकाने दावा नोंदवला तर टप्प्याटप्प्याने म्हणजेच दरवर्षी ६०% आरोग्य विमा कमी कमी होत मूळ विमा राशी म्हणजेच पाच लाखांपर्यंत पोहोचेल. पण तोच जर दावा नोंदवला गेला नाही तर पुन्हा मिळवताही येईल. कारण आरोग्य विमा करार केवळ एका वर्षांचा करार असून केवळ त्याच वर्षांच्या वयानुसार आणि प्रकृतीमानानुसार नूतनीकरणास योग्य होतो. भारतीय बाजारात कमाल १५०% टक्के बोनस देणारे पर्याय आज उपलब्ध आहेत. ते अभ्यासून निवडणे काळाची गरज आहे.

२) पोर्टेबिलिटी :

पोर्टेबिलिटी म्हणजेच एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे सर्व सुविधांसकट उदा. (प्री एक्झिस्टिंग डीसीज्) आधीपासून असलेल्या आजारांच्या प्रतीक्षा काळासकट करार हस्तांतरित करणे हे करणे नूतनीकरणाच्या टप्प्यावर शक्य आहे.  नूतनीकरणाच्या आधी ४५ दिवसांच्या कालावधीत लाभांशासकट कमीत कमी मूळ आरोग्य विमा राशी नवीन आरोग्य विमा कंपनीस हस्तांतरित करण्याचा अधिकार ग्राहकांस उपभोगता येतो. आपला चालू आरोग्य विमा बंद करून परत नव्याने आरोग्य विमा घेणे हा पर्याय नेहमीच व्यावहारिकदृष्टय़ा सूज्ञपणाचे ठरत नाही. मानवी शरीर वयोमानाने बऱ्याचदा माहीत नसणाऱ्या आजाराने त्रस्त असते. ग्राहकाला हे माहीत नसते किंवा अशा शक्यतांचा त्याला विचारही नकोसा असतो. पिढीजात संक्रमित आजार, वाढत्या शहरीकरणामुळे ताणांमुळे होणारे लक्षात न येणारे अस्वास्थ्य हे बऱ्याचदा तंत्रज्ञानाने नोंदताही येत नाही.  अशा परिस्थितीत दावे उभे ठाकले तर आरोग्य विमा कंपनीत आणि ग्राहकांत वाद सुरू होतो.  विमा करार हा परस्पर विश्वासावर अवलंबून असला तरीही दोन्ही पक्ष नेहमीच एकमेकांवर साशंकतेची दृष्टी ठेवून असतात. दावा अमान्य करताना निरंतर नूतनीकरणाचा अवधी फार महत्त्वाचा घटक ठरतो. जर हस्तांतरित आरोग्य विमा एका कंपनीद्वारे दुसऱ्या कंपनीकडे अर्जाद्वारे आला तरीही तो ग्राह्य़ करावा की नाही हे नवीन कंपनीच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळे निरंतर नूतनीकरण करण्यासाठी हस्तांतरण म्हणजेच पोर्टबिलिटी हा राजमार्ग आहे. हस्तांतरण प्रक्रियेत ३० दिवसांचा वाढीव कालावधी उपलब्ध आहे.

थोडक्यात महत्त्वाचे..

  • आरोग्य विमा नूतनीकरण करताना नो क्लेम बोनस म्हणजेच लाभांश विचारात घ्यावा.
  • केवळ हप्त्यांची तुलना करून विमा राशी ठरवू नये.
  • आधी झालेल्या आजारांच्या प्रतीक्षाकाळास महत्त्व आहे. दाव्याच्या टप्प्यावर हा निर्णायक घटक ठरतो.
  • इंटरनेट हे माहितीचे महाजाल आहे, परंतु ती माहिती नेहमीच खरी किंवा खोटी नसते. निर्णय नेहमी तारतम्याने घेतला जावा.
  • आरोग्य विम्याची निवड करताना र्सवकश घटकांचा विचार करावा.
  • हस्तांतरण केवळ एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे न करता त्याच कंपनीतील नवीन आरोग्य विमा पर्यायातही करता येते.
  • जर हस्तांतरण करण्याचा विनंती अर्ज नवीन आरोग्य विमा कंपनीच्या विचाराधीन असेल आणि ग्राहकास नवीन कंपनीने १५ दिवस मुदतकालावधीत कोणताही संपर्क केला नाही तर नवीन आरोग्य विमा कंपनी ग्राहकास विमा अमान्य करू शकत नाही.
  • व्यक्तिगत तसेच कौटुंबिक आरोग्य विमा हस्तांतरित करता येतो.
  • हस्तांतरण प्रक्रियेत एका आरोग्य विमा कंपनीद्वारे दुसऱ्या आरोग्य विमा कंपनीस दाव्यांविषयी माहिती मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यातील दाव्यांविषयीचा इतिहास ग्राहकास लपवणे शक्य नाही.
  • तीन दिवसांच्या मुदतीत नवीन आरोग्य विमा कंपनीने ग्राहकास विनंती अर्जाची पोचपावती देणे गरजेचे आहे.

fplanner2016@gmail.com

लेखिका ‘सीएफपी’ पात्रताधारक असून, ‘इन्श्युरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या सहयोगी सदस्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2016 2:15 am

Web Title: health insurance 2
Next Stories
1 घोटाळा..कमीत कमी ५०,००० कोटींचा!
2 योजनेतून ‘उदय’ आश्वासक!
3 संधी की सापळा?
Just Now!
X