|| अजय वाळिंबे

आपल्याकडे जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण धोरण राबवायला सुरवात झाल्यापासून काही भारतीय उद्योजकांनी परदेशी कंपन्यांशी करार करून त्यांच्या सहयोगाने भारतात नवीन उत्पादनांना सुवत केली. हीरो होंडा ही त्या पैकीच एक यशस्वी कंपनी. मुंजाल उद्योग समूह दुचाकी वाहन उद्योगात होताच. होंडाचे पाठबळ मिळाल्यावर त्यांनी संधीचे सोने केले.

सुमारे वर्षांनंतर होंडाने भारतामध्ये स्वत:चे उत्पादन सुरू केले असले तरीही हीरो होंडाची, हीरो मोटोकोर्प झाल्यावर दुचाकी वाहन उद्योगातील ती आज भारतातीलच नव्हे तर जगातील पहिल्या क्रमांकाची मोठी कंपनी आहे. कंपनीचे मोटरसायकल आणि स्कूटर उत्पादनाचे भारतात चार अत्याधुनिक कारखाने असून त्यातील दोन हरयाणामध्ये तर एक हरिद्वार आणि नुकताच सुरू झालेला चौथा कारखाना राजस्थानमधील निरमाना येथे आहे. कंपनीचा एक उत्पादन कारखाना कोलंबियामध्ये देखील आहे. येत्या आर्थिक वर्षांत कंपनी गुजरात आणि बांगलादेश येथे देखील आपले नवीन प्रकल्प सुरू करीत आहे.

गेल्या बारा वर्षांत आपली उलाढाल ८७१४ कोटी रुपयांवरून ३२,२१२ कोटी रुपयांवर नेणाऱ्या या कंपनीची विक्री आणि वितरण सेवा आता ६,००० सेवा केंद्रांतून होते. भारतीय दुचाकी बाजारपेठेतील ५१% हून अधिक हिस्सा हिरो मोटोकॉर्पचा आहे. नोटबंदीनंतर आलेली मरगळ संपूर्ण झटकून कंपनी आगामी आर्थिक वर्षांत सुमारे २,५०० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करेल. मार्च २०१८ संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने ३२,२३०.५० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३,६९७.४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमवला आहे.

कुठलेही कर्ज नसलेल्या या कंपनीने मार्च २०१८ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी एकूण ४,७५०% लाभांश दिला आहे. जाणकार प्रवर्तक, उत्तम व्यवस्थापन आणि उत्कृष्ट गुणवत्तेवर आधारित कामगिरीतील सातत्य यामुळे हिरो मोटोकॉर्प ही दुचाकी कंपन्यातील एक हिरो कंपनी आहे. केवळ ३९.९४ कोटी भाग भांडवल असलेल्या या कंपनीकडून बक्षीस समभागांची अपेक्षादेखील आहे. सध्या ३,५०० च्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर तुमच्या पोर्टफोलियोची शान वाढवेल यान शंकाच नाही.

सूचना :

  • प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
  • लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.