प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com

आता वाचकांकडून आलेल्या प्रश्नांच्या समाधानाकडे वळू या.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती हा एक संस्कृतीचा भाग होता. शिक्षण, नोकरी-धंदा वगैरे कारणांमुळे कुटुंब आपले गाव सोडून शहराकडे किंवा परदेशात स्थलांतरित झाली. हळूहळू ही संस्कृती लोप पावत चालली आहे. आता कुटुंब हे छोटे होत चालले आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार ‘हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ)’ हे वेगळी ‘व्यक्ती’ समजली जाते. कर नियोजनाच्या दृष्टीने ‘एचयूएफ’ हे खूप महत्त्वाचे आहे. हे एचयूएफ म्हणजे काय? हे कसे स्थापन होते? त्याचे काय फायदे आहेत? असे अनेक प्रश्न करदात्यांना पडतात.

पुरुषाला वारसा हक्काने मिळालेली संपत्ती कुटुंबाची (एचयूएफ) समजली जाते. तीन पिढय़ांकडून म्हणजे पणजोबा, आजोबा किंवा वडील याच्याकडून मिळालेली संपत्ती ही वारसाहक्काने मिळालेली संपत्ती असते. अशा संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे कुटुंबाला करपात्र असते. स्त्रीला तिच्या माहेरच्या कुटुंबातून संपत्ती मिळाल्यास ती संपत्ती ही स्त्रीची वैयक्तिक संपत्ती समजली जाते आणि त्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे त्या स्त्रीच्या वैयक्तिक उत्पन्नात गणले जाते. प्राप्तिकर कायद्यानुसार एचयूएफ ही स्वतंत्र व्यक्ती आहे आणि त्याचे उत्पन्न करदात्याच्या वैयक्तिक उत्पन्नापेक्षा वेगळे समजले जाते. कुटुंबाच्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे कुटुंबाला करपात्र असते. अशा कुटुंबाच्या उत्पन्नासाठी एचयूएफच्या नावाने विवरणपत्र दाखल करता येते. हिंदू पुरुषाचे लग्न झाल्यानंतर एचयूएफ आपोआप स्थापन होते. मुले जन्मल्यावर ते आपोआप कुटुंबाचे सदस्य होतात. मुलीचे लग्न झाल्यावर ती वडिलांच्या ‘एचयूएफ’मध्ये सदस्य राहात नाही, परंतु ती को-पार्टनर म्हणून राहते. बौद्ध, शीख, जैन कुटुंबसुद्धा ‘एचयूएफ’ स्थापन करू शकतात. ‘एचयूएफ’चे स्वतंत्र पर्मनंट अकाउंट नंबर (पॅन) काढून वेगळे बँक खाते उघडता येते. एकटा हिंदू पुरुष एचयूएफ स्थापन करू शकत नाही.

कर नियोजन करताना या बाबींचा विचार करदात्याने केला पाहिजे जेणेकरून कुटुंबाच्या उत्पन्नावर करदात्याला वैयक्तिकरीत्या कर भरावा लागणार नाही. उदा. करदात्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे, करदात्याचे पगारापासून १५ लाख रुपयांचे उत्पन्न आहे आणि त्याला वडिलोपार्जित संपत्तीमधून ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हे उत्पन्न त्याने स्वत:च्या उत्पन्नात दाखविल्यास त्याला या ४ लाख रुपयांवर त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्यानुसार ३० टक्के म्हणजे १,२०,००० रुपये इतका कर भरावा लागेल. हेच उत्पन्न त्याने ‘एचयूएफ’च्या नावाने दाखविल्यास प्रथम २,५०,००० रुपयांवर कर भरावा लागणार नाही आणि बाकी १,५०,००० रुपयांवर ५ टक्के इतका कर भरावा लागेल. ‘एचयूएफ’मध्ये ‘कलम ८० सी’ नुसार १,५०,००० रुपयांपर्यंतची गुंतवणूक केल्यास ‘एचयूएफ’ला कर भरावा लागणार नाही (विवरणपत्र मात्र भरावे लागेल).

एचयूएफ ‘कलम ८० सी’नुसार गुंतवणूक करू शकतो. कुटुंबाच्या सदस्याचा विमा हप्ता भरू शकतो, इक्विटी लिंक्ड बचत योजना, मुदत ठेव वगैरेमध्ये या कलमानुसार गुंतवणूक करू शकतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) मध्ये मात्र एचयूएफ गुंतवणूक करू शकत नाही.

एचयूएफमध्ये उत्पन्न दाखविताना करदात्याने विशेष काळजी घेतली पाहिजे. सल्ल्याचे उत्पन्न, पगाराचे उत्पन्न एचयूएफमध्ये दाखवता येत नाही, ते वैयक्तिक उत्पन्न म्हणून समजले जाते आणि करदात्याच्या वैयक्तिक उत्पन्नात गणले जाते. एचयूएफच्या व्यवहारांचे नियोजन करताना या तरतुदींचा विचार करणे गरजेचे आहे. करदात्याने असे व्यवहार करताना कर सल्लागाराची मदत घेणे हितावह आहे.

’ प्रश्न : माझी एचयूएफ आहे. मी वैयक्तिकरीत्या कमावलेले पैसे एचयूएफला देऊ शकतो का?

    – सुरेंद्र राणे

उत्तर : कुटुंबातील सदस्याने स्वत: कमावलेली संपत्ती मोबदल्याशिवाय एचयूएफमध्ये हस्तांतरित केल्यास त्यावर मिळणारे उत्पन्न करदात्यालाच करपात्र असते. आपण एचयूएफला पैसे देऊ शकता, परंतु त्यावर मिळणारे उत्पन्न आपल्यालाच करपात्र असेल ते एचयूएफचे उत्पन्न म्हणून गणले जाणार नाही.

’ प्रश्न : मी नवीन घर विकत घेण्यासाठी माझ्या मित्राकडून व्याजावर कर्ज घेतले आहे. मला या कर्जाच्या मुद्दल परतफेड आणि व्याजाची वजावट उत्पन्नातून घेता येईल काय?

      – एक वाचक

उत्तर : घर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची वजावट ‘कलम २४’नुसार घेता येते. यासाठी ज्या व्यक्तीकडून कर्ज घेतले आहे त्याच्याकडून व्याजाचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. ‘कलम ८० सी’नुसार फक्त ठरावीक बँक किंवा संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या मुद्दल परतफेडीची वजावट उत्पन्नातून घेता येते. त्यामुळे मुद्दल परतफेडीची वजावट आपल्याला घेता येणार नाही.

’ प्रश्न : मी एका कंपनीत नोकरी करतो. मी जुलै २००७ मध्ये एक दुकान १४ लाख रुपयांना खरेदी केले होते. आता मला नवीन घर खरेदी करावयाचे आहे. हे दुकान ६० लाख रुपयांना विकून हे पैसे मला नवीन घर खरेदी करण्यासाठी वापरावयाचे आहेत. मला दुकानाच्या विक्रीवर झालेल्या भांडवली नफ्यावर कर वाचविता येईल काय?

एक वाचक

उत्तर : आपल्याला दुकानाच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असल्यामुळे आपल्याला ‘कलम ५४ एफ’नुसार नवीन घरातील गुंतवणुकीवर वजावट घेता येईल. या कलमानुसार आपल्याला दुकानाच्या निव्वळ विक्री किमतीएवढी (विक्री खर्च वजा जाता) गुंतवणूक नवीन घरात केल्यास भांडवली नफ्यावर कर भरावा लागणार नाही. नवीन घरातील गुंतवणूक निव्वळ विक्री किमतीपेक्षा कमी असल्यास वजावट कमी मिळेल. ही वजावट घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागेल.

’ प्रश्न : माझ्या नावाने डीमॅट खाते आहे. या खात्यामध्ये काही समभाग आहेत. मला हे समभाग माझ्या आईला तिच्या डीमॅट खात्यात भेट म्हणून द्यावयाचे आहेत. असे केल्यास मला किंवा आईला कर भरावा लागेल का?

एक वाचक

उत्तर : आपण आपल्या आईला समभाग भेट म्हणून दिल्यास आपल्याला किंवा आईला कर भरावा लागणार नाही. कलम ५६ नुसार ‘आई’ ही ठरावीक नातेवाईक असल्यामुळे हा व्यवहार उत्पन्नाच्या कक्षेत येत नाही. परंतु आईने त्या समभागाची विक्री केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा आईला करपात्र असेल.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.