News Flash

माझा पोर्टफोलियो : पडझडीत सुरक्षित!

एचएएल आपली उत्पादने राज्य सरकार, पॅरा-मिलिटरी फोर्सेस आणि अनेक कंपन्यांना विकतात तसेच सेवादेखील देतात.

(संग्रहित छायाचित्र)

अजय वाळिंबे

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.

(बीएसई कोड  – ५४११५४)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १,०८७

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.१,४२३/४७०

बाजार भांडवल : रु. ३६,३६१ कोटी

१९६३ मध्ये स्थापन झालेली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी कंपनी असून ती भारतीय संरक्षण दलांसाठी हेलिकॉप्टर निर्मिती आणि दुरुस्ती, विमान व हेलिकॉप्टरची देखभाल या व्यवसायात आहे. जून २००७ मध्ये कंपनीचा नवरत्न कंपन्यांत समावेश झाला. कंपनीचे भारतभरात २० उत्पादन विभाग आणि ११ संशोधन व विकास केंद्र आहेत. भारतीय संरक्षण दल ही एचएएलची मुख्य ग्राहक असून तिचा एकूण उलाढालीच्या ९०% पेक्षांहून अधिक हिस्सा आहे.

एचएएल आपली उत्पादने राज्य सरकार, पॅरा-मिलिटरी फोर्सेस आणि अनेक कंपन्यांना विकतात तसेच सेवादेखील देतात. कंपनी मिग-२१, मिग-२७, आव्रो, जग्वार, डोर्निअर २२८, एसयू-३० एमकेआय आणि हॉक एमके १३२ आणि चीता आणि चेतक अशी हेलिकॉप्टर तसेच या परवान्यांतर्गत विमानांची निर्मितीदेखील करते. याव्यतिरिक्त कंपनी स्वदेशी आणि परवाना निर्मित विमान आणि हेलिकॉप्टर तसेच थेट भारतीय संरक्षण सेवांकडून खरेदी केलेल्या विमान आणि हेलिकॉप्टरसाठी देखभाल, परिचलन आदी (एमआरओ) सेवादेखील प्रदान करते.

कंपनीकडे सुमारे ५३,००० कोटींची उत्पादन मागणी प्रलंबित असून ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत ती वाढण्याची शक्यता आहे.

संरक्षण मार्ग/क्षेत्राची स्थापना आणि भारत सरकारच्या संरक्षण खरेदीसाठी अनिवार्य ‘ऑफसेट पॉलिसी’ या कंपनीच्या भविष्यकाळातील विकासासाठी भारत सरकारने स्वदेशीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. अर्थात आगामी काळात खासगी क्षेत्राकडून होणारी स्पर्धा तीव्र होण्याची शक्यतादेखील आहे. कंपनीने डिसेंबर २०२१ साठी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल नुकतेच जाहीर केले असून कंपनीने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. यंदाच्या तिमाहीत कंपनीने ५,४२५.५८ कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली असून ती गेल्या तिमाहीच्या तुलनेत २१.७८%ने अधिक आहे. तर नक्त नफ्यात तब्बल १००.६% वाढ होऊन तो ८५३.२७ कोटींवर गेला आहे. उत्तम कामगिरीमुळे सध्या कंपनीच्या समभाग मूल्यात थोडी वाढ झाली आहे. परंतु तीन वर्षांपूर्वी कंपनीचा १,२४० रुपये प्रति समभाग दराने प्रारंभिक खुली भागविक्री (आयपीओ) झाली होती. त्यामुळे आयपीओपेक्षा बाजारभाव तूर्त कमीच आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पाचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या कामकाजावर होईल, अशी अपेक्षा आहे. अत्यल्प कर्ज असलेल्या आणि केवळ ४.८४% भांडवल जनतेकडे असलेल्या या राष्ट्रीय कंपनीकडून नजीकच्या भविष्यात भरीव अपेक्षा आहेत. कंपनीने नुकताच १५०% दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. सध्या भांडवली बाजारात पडझड सुरू झाली आहे. त्यामुळे हे मूल्य १,००० रुपयांच्या खाली येण्याची शक्यता आहे.

तेव्हा संधी मिळताच तुमच्या पोर्टफोलियोसाठी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी या समभागाबाबत खरेदीचे धोरण ठेवावे.

भरणा झालेले भागभांडवल रु. ३३४.३९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ७५.१५

परदेशी गुंतवणूकदार  ०.३०

बँक/ म्यु. फंड/ सरकार   १९.७१

इतर/ जनता ४.८४

संक्षिप्त विवरण

* शेअर गट : लार्ज कॅप

* प्रवर्तक   : भारत सरकार

* व्यवसाय क्षेत्र  : हेलिकॉप्टर / विमाननिर्मिती, दुरुस्ती आणि देखभाल

* पुस्तकी मूल्य : रु. ४१८

* दर्शनी मूल्य   : रु. १०/-

* लाभांश   : ३३३%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :   रु. ८५.३२

*  पी/ई गुणोत्तर : १२.८

*  समग्र पी/ई गुणोत्तर :   २१.१

* डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.३

* इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    १३.५

* रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : २३.९

* बीटा :   ०.४

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 12:34 am

Web Title: hindustan aeronautics ltd portfolio abn 97
Next Stories
1 फंडाचा फंडा’.. : स्नेहशील अस्थिरता
2 विमा.. सहज, सुलभ : ‘एलआयसी’चे खासगीकरण का? किती? कसे? केव्हा?
3 रपेट बाजाराची : विक्रीवाल्यांचे वर्चस्व
Just Now!
X