29 October 2020

News Flash

कर बोध : घर आणि प्राप्तिकर  वजावटी  

प्राप्तिकर कायद्यातसुद्धा करदात्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करात काही सवलती दिलेल्या आहेत

प्रवीण देशपांडे

घर हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आपले स्वत:चे एक तरी घर असावे असे प्रत्येकाला वाटते. महानगरातील घराच्या किमती सर्वानाच परवडतात असे नाही. कारण घराच्या किमती उत्पन्नापेक्षा अनेक पटीत असतात. प्राप्तिकर कायद्यातसुद्धा करदात्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करात काही सवलती दिलेल्या आहेत. काही करसवलती  नवीन घर घेण्यासाठी प्रोत्साहनपर आहेत तर काही गृहकर्जावरील व्याजावर कराच्या सवलतीच्या स्वरूपात आहेत. या सवलती काय आहेत हे थोडक्यात बघू या :

* ‘कलम ८० सी’प्रमाणे दीड लाख रुपयांपर्यंतची वजावट :

या कलमानुसार करदात्याला घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी घेतलेल्या गृहकर्जावरील मुद्दल परतफेडीवर उत्पन्नातून वजावट मिळते, हे कर्ज सरकार, बँक, जीवन विमा मंडळ, गृहकर्ज देणाऱ्या सार्वजनिक कंपन्या वगैरेंकडून घेतले असले पाहिजे. नातेवाईक किंवा मित्रांकडून घेतलेल्या कर्जाच्या मुद्दल फेडीवर मात्र ही वजावट मिळत नाही. याशिवाय घर हस्तांतरण करण्यासाठी भरलेले मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क याचीसुद्धा वजावट उत्पन्नातून घेता येते. घर खरेदी करताना कंपनी किंवा सहकारी संस्थेचे घेतलेले समभाग, ठेव किंवा घराच्या दुरुस्ती किंवा नूतनीकरणासाठी (कम्प्लिशन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर) केलेला खर्च याची वजावट मात्र मिळत नाही. या कलमानुसार घराचा ताबा घेतल्यानंतरच उत्पन्नातून वजावट घेता येते. या कलमानुसार घेतल्या जाणाऱ्या वजावटी प्रत्यक्ष रक्कम खर्च केली किंवा अदा केली तरच मिळते.

* ‘कलम २४’नुसार वजावट :

या कलमानुसार दोन प्रकारच्या वजावटी घरभाडे उत्पन्नातून घेता येतात. एक, घरभाडे उत्पन्नाच्या (मालमत्ता कर वजा जाता) ३० टक्के इतकी प्रमाणित वजावट या उत्पन्नातून घेता येते. घरभाडे उत्पन्न ‘शून्य’ असेल तर मालमत्ता कराची आणि ३० टक्के प्रमाणित वजावट घेता येत नाही. दोन, गृहकर्जावरील देय असलेल्या व्याजाची वजावट घरभाडे उत्पन्नातून घेता येते. ही वजावट घरभाडे उत्पन्न ‘शून्य’ असेल तरी घेता येते. याला मर्यादा दोन लाख रुपयांची आहे (१ एप्रिल १९९९ पूर्वी घेतलेल्या किंवा बांधलेल्या घरासाठी ही मर्यादा ३०,००० रुपये इतकी आहे). जर एखाद्या करदात्याचे घरभाडे उत्पन्न ‘शून्य’ नसेल तर दोन लाख रुपयांची मर्यादा नाही. उदा. एका करदात्याकडे एकच रहाते घर आहे, त्याने ३०,००० रुपये मालमता कर भरला आहे आणि त्याने घेतलेल्या गृहकर्जावर पाच लाख रुपये व्याज देय आहे. दुसऱ्या करदात्याने आपले घर भाडय़ाने दिले आहे आणि त्यावर त्याला वार्षिक तीन लाख रुपये भाडे मिळते. या करदात्यानेसुद्धा मालमता कर ३०,००० रुपये भरला आहे आणि गृहकर्जावर व्याज पाच लाख रुपये देय असेल तर दोन्ही करदात्यांच्या वजावटींचा आणि उत्पन्नाचा तुलनात्मक कोष्टक खालीलप्रमाणे –

(खालील कोष्टक पाहावे)

मागील काही वर्षांपूर्वी केलेल्या सुधारणेनुसार फक्त दोन लाख रुपयांचा तोटा इतर उत्पन्नातून वजा होऊ शकतो, बाकीचा तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ होईल. वरील उदाहरणांत, बाकी १,११,००० रुपयांचा तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येईल.

* व्याजाच्या बाबतीत काही महत्त्वाचे मुद्दे :

(अ) व्याज देय असेल, प्रत्यक्ष अदा केले नसेल तरी या कलमानुसार वजावट मिळते. समजा एखाद्याचा गृहकर्जाचा हप्ता भरावयाचा राहिला तरी व्याजाची वजावट मिळते. परंतु मुद्दल परतफेडीची वजावट प्रत्यक्ष रक्कम अदा केली तरच मिळते. (आ) गृहकर्ज नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून घेतले असेल आणि त्यांना व्याज दिले असेल तरी या कलमानुसार घरभाडे उत्पन्नातून वजावट घेता येते. फक्त त्याच्याकडून व्याजाचे प्रमाणपत्र घेतले असले पाहिजे. (इ) घराचा ताबा घेतल्यानंतरच या कलमानुसार वजावट घेता येते. घराचा ताबा घेण्यापूर्वी करदात्याने गृहकर्जावर देय असलेल्या व्याजाची वजावट, घराचा ताबा घेतल्यानंतर पुढील पाच वर्षांमध्ये विभागून घेता येते.

* ‘कलम ८० ईईए’नुसार व्याजाची वजावट :

जे करदाते प्रथमच घर खरेदी करणार आहेत म्हणजेच गृहकर्ज घेताना ज्यांच्याकडे एकही घर नाही, ते या कलमानुसार उत्पन्नातून वजावट घेऊ शकतात. गृहकर्ज हे १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत मंजूर झाले पाहिजे. घराचे मुद्रांक शुल्काप्रमाणे मूल्य ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे. हे कर्ज बँक, वित्तीय संस्था किंवा गृहकर्ज कंपनीकडूनच घेतले असले पाहिजे. या कलमानुसार दीड लाख रुपयांपर्यंतच्या व्याजाची वजावट उत्पन्नातून घेता येते. एकाच व्याजाची ‘कलम २४’नुसार आणि या कलमानुसार वजावट घेता येत नाही. करदात्याने भरलेले व्याज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि या कलमानुसार सर्व अटींची पूर्तता होत असेल तर दीड लाख रुपयांपर्यंतच्या व्याजाची अतिरिक्त वजावट करदाता या कलमानुसार घेऊ  शकतो. करदात्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की, ‘कलम २४’नुसार वजावट ही घरभाडे उत्पन्नातून घेता येते. घरभाडे उत्पन्न या वजावटीपेक्षा कमी असेल तर इतर उत्पन्नातून वजा करता येते (मर्यादा दोन लाख रुपये) आणि हे पूर्णपणे वजा होत नसेल तर पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येते. ‘कलम ८० ईईए’नुसार वजावट ही एकूण उत्पन्नातून घेता येते. ही वजावट एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असू शकत नाही आणि ‘कॅरी फॉरवर्ड’सुद्धा करता येत नाही.

* ‘कलम ५४’नुसार नवीन घरातील गुंतवणुकीवर वजावट :

जसे कुटुंब वाढते किंवा करदात्याची पत वाढते तशी मोठय़ा घराची गरज भासते. एक घर विकून दुसरे मोठे घर खरेदी करण्याचा कल बऱ्याच जणांचा असतो. हे घर वडिलोपार्जित असल्यास किंवा खूप वर्षांपूर्वी खरेदी केले असल्यास त्याची खरेदी किंमत खूपच कमी असते. सध्याच्या वाढत्या किमती बघता होणारा नफादेखील जास्तच असतो आणि पर्यायाने करसुद्धा जास्तच असतो. जे करदाते अशा प्रकारे नवीन घर विकत घेतात किंवा बांधतात त्याना काही अटींची पूर्तता केल्यास जुन्या घराच्या विक्रीवर झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही. या कलमानुसार मिळणारी कर सवलत ही फक्त वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभाज्य कुटुंब (एचयूएफ) यांनाच मिळते. या कलमानुसार मिळणारी सवलत ही फक्त घराच्या विक्रीतून झालेल्या भांडवली नफ्यासाठी आहे. घर हे दोन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी धारण केले असले पाहिजे. म्हणजेच घर खरेदी केल्या तारखेपासून दोन वर्षांनंतर (दीर्घ मुदतीत) विकले पाहिजे. लघू मुदतीच्या भांडवली संपत्तीसाठी कर सवलत मिळत नाही. घराची विक्री केल्याच्या तारखेपासून नवीन घर एक वर्ष आधी खरेदी किंवा बांधले पाहिजे किंवा दोन वर्षांच्या आत खरेदी केले पाहिजे किंवा तीन वर्षांच्या आत बांधले पाहिजे. ही नवीन घरातील गुंतवणूक फक्त एकाच घरात असली पाहिजे आणि हे घर भारतातच असले पाहिजे. काही अपरिहार्य कारणांमुळे किंवा कुटुंबाच्या रचनेमुळे करदात्यांना एकापेक्षा दोन घरात गुंतवणूक करावी लागते, मागील वर्षांपासून करदाता एकाऐवजी दोन घरात गुंतवणूक करू शकतो. ही संधी करदात्याला त्याच्या जीवनकाळात फक्त एकदाच मिळते. जुन्या घराच्या विक्रीचा भांडवली नफा दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास दोन घरांमध्ये गुंतवणुकीचा लाभ करदात्याला घेता येत नाही.

* ‘कलम ५४ एफ’नुसार नवीन घरातील गुंतवणुकीवर वजावट :

घराव्यतिरिक्त कोणतीही संपत्ती विकली आणि त्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला आणि त्या संपत्तीच्या विक्रीची संपूर्ण रक्कम नवीन घरात गुंतविली तर कर भरावा लागत नाही. करदाता नवीन घर घेण्यासाठी सोने, जमीन किंवा इतर संपत्ती विकतो आणि पैसे जमा करतो. त्याला नवीन घर घेता यावे म्हणून इतर संपत्तीच्या विक्रीवर होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर ही कर सवलत देण्यात आलेली आहे. हे कलमसुद्धा ‘कलम ५४’ प्रमाणेच आहे. ‘कलम ५४’ प्रमाणे फक्त भांडवली नफ्याएवढी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम नवीन घरात गुंतविली तर कर भरावा लागत नाही. परंतु ‘कलम ५४ एफ’प्रमाणे संपूर्ण विक्री रक्कम (विक्री खर्च वजा जाता) किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम नवीन घरात गुंतविली तर कर भरावा लागत नाही. करदात्याकडे नवीन घर सोडून एकापेक्षा जास्त घरे असली तर ‘कलम ५४ एफ’नुसार वजावट घेता येत नाही.

नवीन घर घेताना किंवा गृहकर्ज घेताना वरील तरतुदी विचारात घेतल्यास कर वाचविण्यास मदत होईल आणि कायद्याचे पालन योग्य रीतीने करता येऊ शकेल.

लेखक सनदी लेखाकार व कर सल्लागार

pravin3966@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 1:37 am

Web Title: home and income tax zws 70
Next Stories
1 बंदा रुपया : ‘अनंत’ ध्येयासक्ती!
2 माझा पोर्टफोलियो : ‘बाधा’मुक्त वृद्धीप्रवण गुंतवणूक
3 बाजाराचा तंत्र कल : बाजारालाही ‘आयपीएल’ची रंजकता!
Just Now!
X