13 December 2019

News Flash

होम स्वीट होम

मागील लेखात स्थावर मालमत्ता खरेदी करताना सोय बघितली जाते, पण व्यवहार्यता तपासली जात नाही, असे लिहिले होते.

|| जयंत विद्वांस

मागील लेखात स्थावर मालमत्ता खरेदी करताना सोय बघितली जाते, पण व्यवहार्यता तपासली जात नाही, असे लिहिले होते. त्यावर एका वाचकांनी प्रश्न विचारला की, ‘‘आम्ही मध्यमवर्गीय ‘बुर्ज खलिफा’मध्ये किंवा लंडनमध्ये घर घ्यायला कुठे जाणार? आम्हाला मुंबईतच एक खोली जास्तीची घेणे परवडत नाही.’’ दुसऱ्या वाचकांनी विचारले आहे की, ‘‘व्यवहार्यता तपासावी तर कशी?’’

स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करताना एखादे क्षेत्र पुढे कसे विकसित (डेव्हलप) होणार आहे याचा अंदाज घ्यावा लागतो. जवळच बस स्थानक, मेट्रो स्टेशन येणार आहे का? शाळा-कॉलेज, बाजार-मॉल विकसित होण्याची शक्यता आहे का? तरच पुढील काही वर्षांत तुमच्या जागेची किंमत वाढण्याची शक्यता असते.

आज प्रत्येक मराठी माणसाला पुण्यामध्ये आपले घर असावे असे वाटते. पुण्यातील कोथरूड भाग जुन्या मुंबईकरांनी भरलेला आहे. कोथरूडमधल्या किमती परवडत नाही झाल्यावर मुंबईकर चांदणी चौक, बाणेरमाग्रे हिंजवडीपर्यंत घर घेत सुटले. प्रत्येकाचे एकच स्वप्न म्हणजे निवृत्तीनंतर पुण्यातील आपल्या घरात उर्वरित आयुष्य घालवणे.

या बहुतेकांची मुले परदेशात किंवा इतर राज्यांत स्थायिक झालेली आहेत. या सर्वानी परवडणारे घर म्हणून मुंबईऐवजी पुण्याच्या मध्यवर्ती भागापासून लांब घरे निवडली. ही त्यांची आर्थिक सोय होती. याऐवजी पुण्यातील एखाद्या ‘पंचतारांकित’ ज्येष्ठ नागरिक वसाहतीमध्ये जागा घेण्याचा विचार कोणीही करत नाही. आजच्या काळाची हीच गरज आहे. आज एकुलते एक मूल नोकरीनिमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशात स्थायिक झालेले असते. नातवंडांना खेळवणे हे कामसुद्धा कमी झालेले आहे. त्यामुळे आपला मित्रपरिवार/शेजारी हेच आपले नातेवाईक असतात. निवृत्तीनंतर आपल्या आयुर्मानानुसार आपल्या गरजा लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक वसाहतीमध्ये जागा निवृत्तीच्या आधी काही वर्षे नोंदवणे फायदेशीर आहे. अशा गृहनिर्माण संस्थांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा विचारात घेऊन बांधकाम रचना केलेली असते. आपल्या ‘सेकंड इिनग’मध्ये आपल्या आवडीनिवडी जुळणारा समवयस्क नवीन मित्रपरिवार वाढवा. या सेकंड इिनगच्या वसाहती अगदी अमेरिकेपासून, पुणे, बंगलोर, बडोद्यापासून मराठी माणूस जिथे स्थायिक झाला त्या प्रत्येक ठिकाणी स्थापित झाल्या आहेत.

पुढील काळात स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक करताना आपली गरज/आपली उद्दिष्टे विचारात घ्यावी लागतील. खूपदा मुंबईमध्ये (मोठय़ा शहरात) जागा घेताना आयुष्यातील उमेदीचा काळ कर्जाचे हप्ते फेडण्यात जातो. पहिले कर्ज फिटते तोपर्यंत पहिले घर लहान पडू लागते. मग मोठे घर घेण्यासाठी पुन्हा १५ वर्षे कर्जाचे हप्ते; तोपर्यंत वयाची पन्नाशी आलेली असते. या टप्प्यावर मुले मोठी होऊन पुढील शिक्षणासाठी बाहेर जातात किंवा नोकरी- व्यवसायात मग्न होतात. मोठे घर या परिस्थितीत दोन माणसांना रिकामे वाटते. नोकरीला लागल्यापासून घर या एका विषयात माणूस गुरफटला जातो.

मुंबईत राहणाऱ्या माणसाला एक स्टेटस कॉन्शियसनेस असतो. आपण महाराष्ट्राच्या राजधानीत राहतो, देशाच्या आर्थिक राजधानीत राहतो याचा. जग फिरून आल्यावर तो गळून पडतो. माझ्या एका गुजराती मित्राने आपला पेडर रोडचा फ्लॅट विकून बडोद्याला बंगला बांधला व तेथे स्थायिक झाला.

मराठी माणसाला भाडय़ाच्या घरात रहाणे पसंत नसते. स्वत:ची लहान जागा असेल तरी हरकत नाही, पण भाडय़ाची मोठी जागा नको, ही वृत्ती असते. यामुळे लोक विरारला राहून मुलुंडला नोकरीला जातात किंवा कल्याणला राहून गोरेगावला नोकरीला येतात; परंतु आपले राहते घर भाडय़ाने देऊन नोकरीच्या ठिकाणाजवळ घर भाडय़ाने घेण्याचा विचार करीत नाही. समजा, आपल्या मुलांची बदली दिल्ली किंवा बंगलोरला झाली तर आपण नातवंडांसाठी म्हणून आनंदाने तेथे जातो. आपली मुलं तिथे भाडय़ाने राहात असतात. ते आपण जुळवून घेतो; परंतु आपल्याच शहरात मोठय़ा जागेत भाडय़ाने राहणे नको वाटते.

अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजांपकी अन्न आणि वस्त्र या गरजा मध्यमवर्गीयांना सहज साध्य आहेत. म्हणून त्याबाबत आपण बेफिकीर राहतो; पण निवारा याबाबत अतिरेकी दक्ष असतो. सर्व गोष्टींचा तटस्थपणे विचार करण्याची गरज आहे. आपले गणित कोठे चुकते हे कळले तर पुढील पायऱ्या सुधारता येतील. याबाबत पुढची पिढी फार जागरूक आहे. ज्येष्ठांनी चाकोरीबाहेर विचार करण्याची गरज आहे.

काही वाचकांनी डेरिव्हेटिव्हजचा वापर गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी कसा करता येईल ते स्पष्ट करण्यास सुचविले आहे. डेरिव्हेटिव्हजमध्ये दोन प्रकार आहेत. फ्युचर्स आणि ऑप्शन्स. समजा, आपल्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर्स आहेत. शेअर्स चांगल्या कंपनीचे आहेत; परंतु बाजार कोसळला तर आपल्या गुंतवणुकीचे मूल्य खाली जाणार. आपले नुकसान टाळण्यासाठी आपण त्या कंपनीचे शेअर्स ऑप्शन किंवा फ्युचर्सच्या वायदा स्वरूपात विकू शकतो. बाजार खाली गेल्यास डेरिव्हेटिव्हजचे भाव खाली जातात. खालच्या भावात व्यवहार संपवून फायदा पदरात पाडून आपले शेअर्स न विकल्यामुळे होणारे नुकसान कमी करता येते. काही वेळेस टाटा स्टील, लार्सन, सेंच्युरीसारखे जुन्या कंपन्यांचे शेअर्स वारसा हक्काने मिळालेले असतात म्हणून ते विकण्याची इच्छा होत नाही. अशा वेळेस हा मार्ग चांगला.

अनेकांना आलेला हा अनुभव असेल. एक फोन येतो, ‘साहेब, तुमचे शेअर बाजारात कामकाज कसे चालू आहे. तुम्ही शेअर बाजारांत गुंतवणूक करता त्याचा अनुभव कसा आहे?’ वेळ जाण्यासाठी फोनवर चर्चा लांबवली जाते. फोन इंदूरवरून असतो (किंवा सांगितले जाते) आम्ही शेअर बाजारात रोज तुम्हाला दोन टिप्स देऊ. डे ट्रेडिंग करा किंवा आज घेऊन दोन दिवसांनी विका. तुम्हाला सहज ३-४ टक्के फायदा होईल. तुम्हाला बँकेत वर्षभरासाठी सात टक्के व्याज मिळणार तर इथे महिन्याला २५-३० टक्के सहज मिळतील किंवा आमच्याकडे दोन लाख रुपये द्या. आम्ही तुमच्या नावावर गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा ७७ टक्के मिळवून देऊ. निवृत्त झाल्यावर हातात मोठी रक्कम आलेली असते आणि वेळ भरपूर असतो. वेळ जायचे साधन म्हणून याकडे बघितले जाते. काही शेअर दलाल दोन दिवसांचे वर्कशॉप्स घेतात. त्यामध्ये ‘टेक्निकल अ‍ॅनालिसिस’चे जुजबी ज्ञान दिले जाते. मोबाइल अ‍ॅपवर तुमचे तुम्ही व्यवहार कसे करू शकता हे दाखवले जाते.

अशा पद्धतीत जर प्रचंड फायदा होत असता तर भारतात गरिबी राहिली नसती. यासाठी फक्त ‘टेक्निकल अ‍ॅनालिसिस’ उपयोगाचे नाही तर फंडामेंटल अ‍ॅनालिसिसचासुद्धा अभ्यास करावा लागतो आणि शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी दोन-दोन वर्षे द्यावी लागतात. फक्त ‘स्टॉप लॉस’ टेक्निक शिकून आपण थोडा-थोडा नियमित लॉस कसा करावा हे शिकतो.

याच पद्धतीत फोन करून इन्शुरन्स कंपन्यांचे प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यात ‘युलिप’ पॉलिसी ही गुंतवणूक योजना म्हणून मारतात. यासाठी ज्येष्ठांनी अतिसावधानता बाळगणे गरजेचे आहे.

सेबी, इर्डा, आर्थिक गुन्हे विभाग या सर्वानी विशेष दक्षता कार्यालये इंदूर आणि दिल्लीत उघडणे गरजेचे आहे.

sebiregisteredadvisor@gmail.com

(लेखक सेबीद्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत.)

First Published on August 4, 2019 11:53 pm

Web Title: home sweet home mpg 94
Just Now!
X