|| तृप्ती राणे

गेले काही महिने माझ्याकडे बरेच गुंतवणूकदार आपापला पोर्टफोलिओ घेऊन येत आहेत. कारण एकच या वर्षांच्या सुरुवातीपासून त्यांच्या पोर्टफोलिओचे परतावे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होत असल्यामुळे त्यांना आपला पोर्टफोलिओ योग्य आहे की नाही ही खात्री करून घ्यायची होती. या सगळ्यांचे पोर्टफोलिओ एका बाबतीत सारखे होते आणि ती म्हणजे त्यात असलेल्या स्कीम्स. निरनिराळ्या म्युच्युअल फंड योजना असाव्यात तरी किती? आकडा १५-२० पासून सुरू होऊन अगदी ६० पर्यंतसुद्धा गेलेला! हा वैयक्तिक पोर्टफोलिओ आहे की देशात चालू असणाऱ्या सगळ्या म्युच्युअल फंड योजनांची डिरेक्टरी आहे, असा प्रश्न मला पडला. अर्थात असे असल्याने माझ्यासारख्या सल्लागारांचा फायदा होतो, परंतु गुंतवणूकदाराचं काय?

बऱ्याचदा वेगवेगळ्या लोकांच्या सल्ल्यांमुळे अनेक तऱ्हेच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक होत राहते. अशी गुंतवणूक दीर्घ काळ केल्यामुळे गुंतवणूकदाराकडे एक मोठा संग्रह तयार होतो. मग जास्त योजनांवर लक्ष ठेवणे आणि वेळोवेळी योग्य निर्णय घेणे कठीण होते. शिवाय खूप योजना असल्या तर पोर्टफोलिओची जोखीम कमी होते हे समीकरण चुकीचे आहे. तर आजचा हा लेख खास म्युच्युअल फंड संग्रह करणाऱ्यांसाठी..

  • सर्वसाधारणपणे प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये खालील प्रकार असावेत:

आपत्कालीन निधी : लिक्विड फंड, आर्ब्रिटाज फंड

नजीकच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी : आर्ब्रिटाज फंड, डेट फंड

कर नियोजनासाठी :  ईएलएसएस

दीर्घावधीसाठी :  बॅलन्स फंड, लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड, सेक्टर फंड

  • तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एकाच प्रकारच्या योजना का आहेत याचा शोध घ्या आणि जर योजनांची गुंतवणूक एकसारखीच असेल तर परतावे आणि जोखीम तपासून मग एकच योजना ठरवा. वेगवेगळे म्युच्युअल फंड जर एकाच योजनेअंतर्गत वेगळी गुंतवणूक करत असतील तर अधिक योजना असल्या तरी चालतील.
  • जर लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड पोर्टफोलिओमध्ये असतील तर मग मल्टी कॅपची गरज तपासा.
  • तुमच्या योजना तुमच्या आर्थिक ध्येयांशी निगडित असाव्यात. स्टार रेटिंग आणि जाहिरातींना भुलून गुंतवणूक करू नका.
  • योजनेची जोखीम तुमच्या जोखीम क्षमतेनुसार आहे का हे बघा. फक्त मागील परतावे जास्त दिसतात म्हणून गुंतवणूक करू नका.
  • आकर्षक नाव आणि वेगळी योजना म्हणून गुंतवणूक करू नका. योजनेचे उद्दिष्ट काय, कशात गुंतवणूक आहे किंवा करणार, एग्झिट लोड किती आणि कधी, खर्च किती हे सगळे समजून घ्या.
  • योजनांचे एकत्रीकरण करताना कर नियमांचा आढावा घ्या.
  • योजना तोटय़ात आहे म्हणून फायदा होण्यापर्यंत थांबू नका. कदाचित तोटा सहन करून मग विचारपूर्वक केलेली गुंतवणूक जास्त फायद्याची ठरेल.

सूचना :

  • जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्या किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.
  • या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युचुअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युचुअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे नाहीये.
  • यातील काही म्युचुअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.

trupti_vrane@yahoo.com