News Flash

स्थिर उत्पन्न योजना गुंतवणुकीसाठी निवड कशी करावी?

गेले दोन आठवडे उमदा परतावा देणाऱ्या नामांकित म्युच्युअल फंडाच्या दोन रोखे (डेट) योजनांचे मालमत्ता मूल्य कमालीचे गडगडले आणि या फंडाने गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याचा मार्गही निर्गुतवणुकीवर(रिडम्प्शन

गेले दोन आठवडे उमदा परतावा देणाऱ्या नामांकित म्युच्युअल फंडाच्या दोन रोखे (डेट) योजनांचे मालमत्ता मूल्य कमालीचे गडगडले आणि या फंडाने गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याचा मार्गही निर्गुतवणुकीवर(रिडम्प्शन मर्यादेचा र्निबध घालून बंद केला. डेट योजनेत तरलतेलाच पायबंद धक्कादायक आहे. असे अपवादानेच घडत असते. फंड घराण्याच्या चुकीच्या गुंतवणूक निर्णयांचा भूर्दंड अखेर गुंतवणूकदारांवरच येतो. दुसरीकडे ‘समृद्ध’ गुंतवणूक योजनेचे पितळ सेबीच्या कारवाईने उघडे पडले. निवडीतील अशा चुका टाळणे गुंतवणूकदारांच्या हाती नक्कीच आहे..
गुंतवणूक जगतातील सर्वात पहिले पाऊल हे नेहमीच बँकेत ठेवींसारख्या स्थिर उत्पन्न योजना अथवा ज्याला रोखे/ डेट योजना म्हटले जाते त्यापासून सुरू होत असते. अर्थात या गुंतवणुकीचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. हे प्रकार कोणते आणि त्यातील जोखीम घटक काय हे आपण समजावून घेऊ.
* गुंतवणूक उद्देश: रोख्यांमध्ये आपला पैसा टाकल्यावर भरमसाट परताव्याची अपेक्षा नसावी. परंतु काळजीपूर्वक गुंतवणूक आणि फेर आढावा घेत राहिल्यास तुलनेने सुरक्षित आणि चांगल्या परताव्याचे हे साधन निश्चितच आहे. सर्वात पहिला संकेत, जर कोणत्याही रोखे (डेट) योजनेतून प्रचलित महागाई दरापेक्षा २-३ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळत असेल, तर अशा योजनेपासून सावध राहावे.
* मानदंड: रोखे योजनांचा कस हा ‘एसएलआर’ मानदंडांनुरूप तपासला जायला हवा. हे एसएलआर काय आहे? यातील एस- सुरक्षितता, एल- तरलता (लिक्विडिटी) आणि आर- परतावा (रिटर्न) होय. अर्थात या कसोटय़ांची एक प्रक्रिया आहे. सर्वात पहिल्यांदा प्रश्न सुरक्षिततेचा. एखाद्या डेट योजनेच्या सुरक्षितेबाबत किंचितसा संशय जरी असेल तरी तिच्याकडे पाठ फिरविणे वा त्या गुंतवणुकीला पुढे चालू ठेवणे बंद केले पाहिजे.
सुरक्षेच्या कसोटीवर शिक्कामोर्तब झाले की मग तरलतेच्या मुद्दय़ावर ती योजना जोखली गेली पाहिजे. रोखे योजनेचा तरलता हा सर्वात मोठा गुणविशेष आहे, पण तरलताच नसेल तर अशा योजनेत पैसे घालणे टाळले पाहिजे. सुरक्षितता आणि तरलतेच्या पायऱ्या चढल्यानंतर, तिसरी पायरी ही परताव्याची आहे. परंतु होते नेमके उलटेच. अनेक गुंतवणूक परताव्याचे प्रमाण आधी पाहतात आणि ते जास्त असले की तडक गुंतवणूक करायला सरसावतात.
जर तुम्ही सोबतचा तक्ता पाहिला तर गुंतवणुकीच्या वेगवेगळे पर्याय तुमच्या लक्षात येतील. कुणा दोस्ताने, हटकून परिचय वाढवलेल्या दूरच्या नातेवाईकाने गळ्यात मारलेल्या ‘स्कीम्स’मध्ये पैसा टाकणे मूर्खपणाच आणि त्याचे परिणाम नेहमीच वाईटच असतात. याला गुंतवणूक न म्हणता पैसा अक्कलखाती लयाला गेला म्हणणे म्हणून अधिक समर्पक ठरेल.
दुसरे म्हणजे सरकारी उपक्रमांच्या मुदत ठेवी/ रोखे (बाँड्स) किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केवीपी), पोस्टाच्या योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) या अत्यंत सुरक्षित स्थिर उत्पन्न योजना आहेत. या प्रकारच्या गुंतवणुकांमध्ये तरलता/ रोकड सुलभता ठीकठाक आहे, पण परतावा कमी आहे. तिसरा प्रकार कंपनी ठेवींचा आहे. काही अपवाद वगळता ही एक जोखीमयुक्त गुंतवणूक आहे. प्रत्येक ५-७ वर्षांत काही कंपन्या आणि त्यांच्या प्रवर्तकांनी गुंतवणूकदारांकडून उभ्या केलेल्या ठेवी ठरलेल्या मुदतीत परत न केल्याची प्रकरणे आढळून आली आहेत. तरी अशा ठेवीत पैसा घालायचा झालाच तर ‘एएए’ मानांकन धारण केलेल्या कंपन्यांचाच गुंतवणुकीसाठी विचार केला जावा.
चौथा वर्ग आहे डेट म्युच्युअल फंडाचा. वर उल्लेख केलेल्या एसएलआर कसोटीवर या योजना कसदार असल्याचे तुमच्या लक्षात येईल. तरलतेच्या बाबत म्युच्युअल फंडांच्या डेट योजना अगदी एक दिवसापासून ते तीन-पाच वर्षे मुदतीपर्यंतचा पर्याय गुंतवणूकदारांना देतात. तुम्हाला एक दिवस, एक आठवडा, १५ दिवस या कालावधीसाठीही पैसा गुंतविता येईल. बँकांच्या बचत खात्यात ठेवण्यापेक्षा या योजनांमध्ये गुंतवणुकीचा पर्याय निश्चितच लाभकारक म्हणता येईल.
सुरक्षिततेच्या बाबतही म्युच्युअल फंडांच्या डेट योजनांचा पोर्टफोलियो अनेकांगाने वैविध्यपूर्ण असतो. त्यामुळे विशिष्ट कंपनी अथवा उद्योगक्षेत्रात गुंतवणूक एकवटल्याचा धोका आपोआपच टळतो.
पारदर्शकता हा आणखी एक गुण होय. म्युच्युअल फंडाच्या योजनेने कुठे, कुठे पैसा गुंतविला आहे याचा इत्थंभूत तपशील दर महिन्याला गुंतवणूकदारांपुढे मिळत असते. अशी सोय अन्य कोणत्याही गुंतवणूक पर्यायांमध्ये नाही. या बाबीचा सजग गुंतवणूकदारांनी पुरेपूर दखल आणि वापर मात्र करायला हवा. त्यामुळे स्थिर उत्पन्न योजनांमध्ये म्युच्युअल फंडांच्या डेट योजनाच सर्वोत्तम पर्याय आहेत.
या सर्व प्रकारांच्या तुलनेत समभागसंलग्न (इक्विटी) गुंतवणूक हा पर्याय जरूर आहे, पण तेथे बाजारात होणारे आकस्मिक चढ-उतार हा एक मोठा धोका आहे. अर्थात या जोखीमेचे व्यवस्थापन व बंदोबस्त करता येण्यासारखा आहे, चित्त स्थिर ठेवणारा धीर व संयम गुंतवणूकदारांकडे असायला हवा. त्या उलट स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणुकीतही अशीच जोखीम आहे. पण त्या जोखीमेवरील नियंत्रण मात्र आपल्या हाती नसते. त्यामुळे स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीचा तुमचे उद्दिष्ट हे निवाऱ्यासाठी छत किंवा धंदा-व्यवसायासाठी सुयोग्य जागा इतकेच असायला हवे. इक्विटी आणि स्थावर मालमत्ता गुंतवणुकीची तुलना केल्यास, स्थावर मालमत्तेत दीर्घावधीची गुंतवणूक ही कायम तापदायकच ठरताना दिसली आहे, तर समभागांमध्ये दीर्घ मुदतीत झालेली गुंतवणूक ही उत्तम लाभाची ठरली आहे. निवड कशाची करायची हे आपल्या हाती आहेच!
(लेखक हे निर्मल बंग सिक्युरिटीज या गुंतवणूक पेढीचे सल्लागार आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2015 1:01 am

Web Title: how to decide the investment plan
टॅग : Arthvrutant,Investment
Next Stories
1 कालाय तस्मै नम:
2 रिव्हर्स मॉग्रेज योजना
3 ‘रिटायरमेंट अ‍ॅडव्हायझर’ स्वागत निवृत्ती नियोजनकारांचे!