विमा… सहज, सुलभ – नीलेश साठे
विम्याचा हप्ता निर्धारित करण्याचे काम करणारे सर्वच ‘अॅक्च्युअरी’ समान गृहीतकाच्या आधारावर जर विमा कोष्टके बनवतात, तर विविध कंपन्यांच्या विमा हप्त्यांचे दर वेगवेगळे कसे? एक कंपनी एक कोटीच्या विमा छत्रासाठी टर्म इन्शुरन्सचे दर वार्षिक १०,००० रुपये लावते, तर त्याच वेळी दुसरी नामांकित विमा कंपनी जवळपास १८,००० रुपये लावते. एवढी तफावत का?
विमा एजंट जेव्हा आपल्याला विम्याचे फायदे समजावतो, तेव्हा एक बाब प्रकर्षाने सांगतो आणि ती म्हणजे, कमी वयात विमा घेतला तर तो स्वस्त पडतो, म्हणून लगेच विमा घ्या. हे त्याचे म्हणणे काही चूक असते असे नाही. बाजार-संलग्न असणाऱ्या ‘युलिप’च्या योजना सोडल्या तर इतर विमा प्रकारांत मुदत संपेपर्यंत लेव्हल प्रीमियम म्हणजे समान प्रीमियम आकारला जातो. तेव्हा कमी वयात विमा घेतला तर कमी प्रीमियम भरावा लागतो.
पण वयानुसार प्रीमियमची आकारणी करायचे गणित सोपं नाही बरं! संगणकाच्या साहाय्याने याची कोष्टकं बसवणं जरा सोपं झालंय एवढंच.
मुदत विमा अर्थात टर्म इन्शुरन्सचे कोष्टक करणे त्यामानाने सोपे. कारण यांत विमेदार विम्याच्या मुदतीअंती जिवंत असला तर विमा कंपनी त्याला कुठलाच परतावा देत नसते. मात्र मुदतीअंती बोनससहित परतावा द्यायचा असेल किंवा पॉलिसी सुरू असताना दर ५/१०/१५ वर्षांनी परतावा द्यायचा असेल तर विमा कोष्टक बनवणं जिकिरीचं असतं. हे काम ‘बिमांकक’ म्हणजे ‘अॅक्च्युअरीज’ करतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे विशिष्ट वयाचा विमा हप्ता काढताना तीन प्रमुख बाबींचा अंदाज करावा लागतो.
१. मृत्युदर
२. गुंतवणुकीवर मिळणारा व्याजदर आणि
३. दरवर्षी होणारी खर्चातील वाढ
या व्यतिरिक्त पॉलिसी बंद पडण्याचे प्रमाण, सरेंडरचे प्रमाण, पॉलिसीवर कर्ज घेण्याचे प्रमाण, सॉल्व्हन्सीची तरतूद या बाबींचादेखील अंदाज घ्यावा लागतो.
शिवाय विविध कर आणि नफ्यासाठी तरतूदही करून ठेवावी लागते.
ही पूर्वतयारी झाली की प्रीमियमचे कोष्टक बनवायला सुरुवात करता येते.
समजा विशिष्ट वयाच्या एक लाख व्यक्तींनी विमा घेतला. मृत्युदराचा विचार करून यांतील किती रक्कम मृत्युदाव्यांपायी दर वर्षी द्यावी लागेल, मृत व्यक्तींकडून पुढे प्रीमियम येणार नाहीत तसेच त्यांच्या पॉलिसींवर खर्चही होणार नाही या बाबीही कोष्टकात बसवाव्या लागतात. ज्या व्यक्ती जिवंत राहतात त्या पुढे प्रीमियम भरत राहतात (लॅप्सेशन सोडून). ती जमा होणारी रक्कम दर वर्षी काय दराने गुंतवता येईल, महागाई दरवाढीचा विचार करता पॉलिसीवर सेवा खर्च बाजूला काढल्यावर पूर्ण मुदतीची आय-व्यय काढून दोन्ही बाजूंचे समायोजन करून लेव्हल प्रीमियम या एक लाख व्यक्तींसाठी विशिष्ट वयासाठी काढला जातो. असा प्रीमियम सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी व सर्व मुदतींसाठी काढला की झाले विमा कोष्टक तयार.
लेव्हल प्रीमियम आकारताना दरवर्षी वाढत जाणाऱ्या वयानुरूप प्रीमियमची आकारणी होत नसून पॉलिसीचे सुरुवातीच्या काळात जास्त प्रीमियम आकारला जातो हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
पूर्वी जेव्हा साधे कॅलक्युलेटर्सही नव्हते तेव्हा ही सगळी आकडेमोड करणे किती कष्टप्रद असेल नाही?
आता असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे की, जर सर्वच ‘अॅक्च्युअरीज’ समान गृहितकाच्या आधारावर विमा कोष्टके बनवत असतील तर विविध कंपन्यांच्या विमा हप्त्यांमध्ये एवढी तफावत का? टर्म इन्शुरन्सचे दर एक कोटीच्या विम्यासाठी एक कंपनी वार्षिक १०,००० रुपये लावते, तर त्याच वेळी दुसरी नामांकित विमा कंपनी जवळपास १८,००० रुपये लावते. एवढी तफावत का?
याचे उत्तर आहे की तुमचे विमेदार कोणत्या उत्पन्न गटांतील आहेत, कोणत्या वयोगटातील आहेत, त्यांचा जीवनस्तर काय आहे, तुमचे वैद्यकीय चाचणी अहवाल किती विश्वासार्ह आहेत, तुमचे विमेदार, एजंट किती प्रामाणिक आहेत, पुनर्विम्याचे दर काय आहेत इत्यादी. सिलेक्ट मॉरटॅलिटी म्हणजे विमेदारांचा मृत्युदर जनरल मॉरटॅलिटीहून अधिक असेल तर विमा हप्ता अधिक आकाराला जातो.
खासगी विमा कंपन्यांच्या आगमनानंतर ‘अॅक्च्युअरी’ बनण्याकडे कल वाढतो आहे. असे असले तरी आजमितीस जेमतेम चारशेच ‘अॅक्च्युअरीज’ भारतात आहेत. गणित, सांख्यिकी, अर्थशास्त्र या विषयांत रुची आणि गती असणाऱ्यांसाठी करिअरचं एक नवं दालन खुलं झालंय. युवकांनी या करिअरचा निश्चित विचार करावा.
लेखक विमा नियामक ‘इर्डा’चे माजी सदस्य आणि ‘एलआयसी’मध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते.
ई-मेल : nbsathe@gmail.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 29, 2021 12:02 am