|| तृप्ती राणे

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीने सकाळी सकाळी फोन केला. हेलो वगैरे काहीही न म्हणता सरळ प्रश्न – मला १८ ते २० टक्के परतावा मिळतील अशी गुंतवणूक सांग!!!

मी तिला म्हटलं, अगं अशा प्रकारचा परतावा तुला म्युचुअल फंडातून किंवा शेअर्समधून मिळेल.

त्यावर तिचा परत प्रश्न – नक्की मिळतील ना? आणि कधी मिळतील? मला ना पुढच्या वर्षी युरोप टूरवर जायचंय. मग मी आज अंदाजित खर्चाच्या ८० टक्के गुंतवते आणि मला पुढल्या वर्षी १०० टक्के मिळतील, बरोबर की नाही!

क्षणभर मला तिच्या आवाजातला उत्साह फोनवरून माझ्यावर सळसळल्यासारखा वाटला, आणि मी तिच्याबरोबर युरोपला पोहोचले. तितक्यात माझ्यातला आर्थिक सल्लागार खाडकन जागा झाला आणि तिला भानावर आण, असं खुणावू लागला. बिचारीच्या उत्साहाला विरजण लावायचं ठरवून मी तिला सांगितलं की, एका वर्षांच्या कमी अवधीत एवढा परतावा आणि परत त्यात खात्रीशीर असं समीकरण नसतं!

त्यावर ती नाराज होत आणि थोडीशी चिडत म्हणाली, अरे देवा! तू असं का सांगतेस? मला तर आमच्या शेजारच्या काकांनी सांगितलं की, त्यांच्याकडे असे काही गुंतवणूक पर्याय आहेत ज्यामधून इतका परतावा मिळू शकतो! मग ते खोटं सांगताहेत का?

त्यावर तिला मी शांत केलं आणि गुंतवणूक पर्याय निवडताना नक्की काय काय तपासायचं हे समजावलं. प्रत्येक गुंतवणूक पर्याय सारखा नसतो. परतावा, गुंतवणूक कालावधी, रोकड सुलभता, जोखीम आणि कर – या पाच मापदंडांवर प्रत्येक पर्याय तपासायला हवा.

  • परतावा : गुंतवणुकीचं मूळ उद्दिष्ट हे परतावा मिळवणं असतं. म्हणून किती परतावा मिळणार हे माहीत असणं गरजेचं आहे. हे प्रश्न विचारा – आपण गुंतवणूक करताना ती किती वाढणार आणि कोणत्या कारणामुळे वाढणार हे समजायलाच हवं. परतावा जास्तीत जास्त किती आणि कमीत कमी किती होऊ शकेल (Mean/Average Returns)? सरासरी परतावा किती (टींल्ल/अ५ी१ंॠी फी३४१ल्ल२)? कोणत्या संकेतस्थळांवर ही माहिती मिळेल?
  • गुंतवणूक कालावधी : कमी वेळेतील गुंतवणूक (मुदत ठेव, डेट म्युचुअल फंड) पर्याय दीर्घ काळासाठी वापरू नका. तसेच दीर्घ काळासाठी (इक्विटी म्युचुअल फंड, शेअर्स) असलेले पर्याय कमी वेळेतील गुंतवणुकीसाठी घातक ठरू शकतात.
  • जोखीम : आपली गुंतवणूक किती सुरक्षित आहे हे समजण्यासाठी त्यातली जोखीम (म्युचुअल फंड आणि शेअर्सच्या बाबतीत त्यांचा बीटा) कळणं आणि ती जोखीम आपल्याला पेलता येणं ही दक्षता महत्त्वाची! भरपूर परताव्याची हौस बाळगताना जोखीम घ्यायची क्षमतासुद्धा वाढवावी लागते. थेट प्रश्न विचारा – या गुंतवणुकीमध्ये का, किती आणि किती काळ नुकसान होऊ शकतं? गुंतवणूक करायच्या आधी स्वत:ची जोखीम क्षमता (Risk Profiling) तपासून घ्या.
  • रोकड सुलभता : गरजेनुसार आणि लागेल तेव्हा पैसा मिळविताना आपली गुंतवणूक आपल्या हाताशी असेल का? गुंतवणुकीतून पैसे काढताना काही खर्च (एग्झिट लोड/ पेनल्टी) किंवा परताव्यामध्ये नुकसान होईल का? या प्रश्नांची उत्तरं मिळवा.
  • कर नियोजन : गुंतवणूक करायच्या पूर्वी कर नियमांचा आढावा घ्या. कर किती आणि कधी भरावा लागेल हे समजल्यावर आधी आकर्षक वाटणारी गुंतवणूकसुद्धा मग पटत नाही. प्रत्येक वेळी कर वाचवायला जाऊ नका. दीर्घकालीन संपत्ती हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवा आणि गरज असल्यास थोडा कर भरा. उदाहरणार्थ, पाच टक्के कर वाचवताना जर पुढच्या वर्षी लागणारी रक्कम अडकून बसत असेल, तर कर भरून पैसे हाताशी ठेवा.

तर वाचकांनो, नुसता परतावा पाहून गुंतवणूक करू नका. सगळ्या मापदंडांवर मोजल्यानंतरच ठरवा की तुमचे कष्टाचे पैसे कुठे गुंतवायचे! मदतीला तुमचा आर्थिक सल्लागार असेलच.

सूचना :

  • जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्या किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.
  • या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युचुअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युचुअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे नाहीये.
  • यातील काही म्युचुअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका मुंबईस्थित सनदी लेखाकार)