|| अनुराधा सहस्रबुद्धे

श्वेता मराठे (२६) एका अभियांत्रिकी कंपनीत मागील दोन वर्षे नोकरी करीत आहेत. त्यांना १.२५ लाख मासिक वेतन आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या श्वेता सध्या त्यांच्या कंपनीचा प्रकल्प नागपूर येथे सुरू असल्याने नागपूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी पुण्यात एक घर विकत घेतले आहे. हे घर विकत घेण्यासाठी श्वेताने ७५ लाखांचे कर्ज घेतले आहे. या गृहकर्जाची मासिक ५५ हजारांची परतफेड सुरू आहे. या व्यतिरिक्त दरमहा २५ हजाराच्या एसआयपी सुरू आहेत. त्या दरमहा ५ हजार पीपीएफ खात्यात भारतात. या व्यतिरिक्त वाहन कर्ज असून त्याचा दरमहा ८ हजारांचा हप्ता सुरू आहे. त्यांनी १ कोटीचा मुदतीचा विमा खरेदी केला आहे. त्यांच्या आई, वर्षां मराठे या एका राष्ट्रीयीकृत बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक तर वडील संदीप पुण्यातील अभियांत्रिकी कंपनीत वरिष्ठ अधिकारी आहेत. वडील दोन वर्षांत सेवानिवृत्त होतील. वर्षां यांना सेवानिवृत्त होण्यास चार वर्षे अद्याप शिल्लक असली तरी त्या वर्ष-दोन वर्षांत ऐच्छिक सेवानिवृत्ती घेण्याच्या विचारात आहेत.

ईमेलवर प्राथमिक माहिती घेतल्यानंतर फोनवर बोलणे केले. वर्षां मराठे यांनी पुण्यात ‘लोकसत्ता’च्या कोथरूडमधील तसेच सदाशिव पेठेतील टिळक स्मारक येथे झालेल्या आर्थिक साक्षरता कार्यक्रमांना हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील केवळ श्रवणाने त्यांच्या मुलीचे वित्तीय नियोजन केले असून हे नियोजन कितपत बरोबर हे त्यांना जाणून घ्यायचे होते.

वित्तीय नियोजकाचा सल्ला : नुसत्या श्रवणाने सुद्धा आयुष्यातील इप्सित साध्य करता येतात. समर्थानी दासबोधात नानाविध भक्तींपैकी श्रवणभक्तीचे माहात्म्य सांगितले आहे. समर्थ रामदास, दासबोधात श्रवणभक्ती विवेचन करताना म्हणतात,

ऐसें श्रवण सगुणाचें। अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें।

विभक्ती सांडून भक्तीचें। मूळ शोधावें।।

वर्षां मराठे यांनी ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’ वाचून आणि ‘लोकसत्ता’च्या आर्थिक साक्षरता उपक्रमांना हजेरी लावून नियोजन केले असले तरी त्यात काही चुका झालेल्या आहेत. वॉरेन बफे यांच्या ‘‘तुम्ही अनावश्यक वस्तूंची खरेदी केलीत तर गरजेच्या वस्तू विकायला लागतात’’ या वाक्याची अनुभूती यावी, असे वर्षां मराठे यांनी केलेल्या नियोजनाचे झाले आहे. तुमच्या स्वत:च्या पैशावर सर्वात कमी परतावा स्थावर मालमत्ता देतात. मागील दहा वर्षे श्वेता आपल्या आईवडिलांपासून दूर राहात आहे. श्वेता नक्की कोणत्या शहरांत राहणार, लग्न कोणाशी होणार या गोष्टीची खात्री देता येत नाही. नागपूरला जाण्यापूर्वी श्वेता दुसऱ्या कंपनीसाठी हैदराबाद येथे नोकरी करीत होत्या. त्यांनी खरेदी केलेले वाहन पुणे येथेच आहे. वडिलांची गाडी असल्याने वडिलांनाच दोन्ही मोटारी एक दिवस आड वापराव्या लागतात.

कष्टाने कमावलेल्या पैशाचा योग्य विनियोग होण्यासाठी वित्तीय नियोजन करणे गरजेचे असते. वित्तीय ध्येयनिश्चिती करून त्यानुसार नियोजन करण्याऐवजी गरज नसलेल्या घराची तेही कर्ज काढून खरेदी केली गेली. गरज नसताना घेतलेले घर, गाडी आणि श्वेताचा पगार ज्या बँक खात्यात जमा होतो त्या बँकेने विकलेली एक ‘युलिप पॉलिसी’ या अनावश्यक गोष्टींची श्वेताने खरेदी केली आहे. यापैकी घर आणि गाडीसाठी काढलेले कर्ज फेडताना अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या असे वाटणे साहजिक आहे.

आयुर्विमा : श्वेता किमान ३४ वर्षे कमावती राहणार आहे. दुसऱ्या बाजूला विवाहपश्चात कौटुंबिक आर्थिक जबाबदाऱ्यासुद्धा वाढतील. त्यामुळे प्रत्येकी दीड कोटीच्या दोन शुद्ध विमा पॉलिसी प्रस्तावित करीत आहे. युलिपचा पुढील दोन वर्षांचे हप्ते भरून २०२२ मध्ये युलिपमधील जमा रक्कम काढून घ्यावी.

आरोग्य विमा : श्वेताच्या घरातील सर्वच व्यक्ती नोकरदार असल्याने कुटुंबातील प्रत्येकाला नोकरीच्या ठिकाणाहून आरोग्य विमा छत्र लाभलेले आहे. सध्या हे आरोग्य विमा छत्र पुरेसे आहे.

गुंतवणूक : सध्याची श्वेता यांची जीवनशैली पाहता एका माणसाचा महिन्याचा खर्च २५ हजार रुपये गृहीत धरला आहे. सोबत दिलेल्या तपशिलानुसार श्वेता यांच्या वयाच्या ६०व्या वर्षी हाच खर्च महिन्याला ३.५० लाख रुपये असेल. पुढील ३४ वर्षांत व्याजाचे आणि महागाईचा दरसुद्धा कमी होईल.

  • सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे
  • आजपर्यंतची बचत ५ लाख
  • बचतीवर सद्य परतावा ८%
  • भविष्यातील परताव्याचा दर ९%
  • अपेक्षित महागाईचा दर ७%
  • सध्याचा मासिक खर्च २५ हजार
  • ३४ वर्षांनंतर मासिक खर्च ३.५  लाख
  • निवृत्तीसमयी आवश्यक ८.५ कोटी
  • दरमहा आवश्यक गुंतवणूक ४५ हजार

भविष्यात लग्नानंतर कुटुंबविस्तार होईल. खर्चही वाढतील, उत्पन्नसुद्धा वाढेल. कुटुंबाचा दरमहा खर्च वाढण्यास महागाई आणि मानवी महत्त्वाकांक्षा कारण असतात. आजची चैन उद्या कधी गरज बनते हे सांगता येत नाही. कधी मोठे घर, आणखी मोठे घर, सुट्टीतील परदेश प्रवास, बाळंतपणानंतर नोकरीत काही कालावधीसाठी पडलेला खंड इत्यादींसाठी तरतूद करणे गरजेचे असते.

मुलीचे वित्तीय व्यवस्थापन आईने करणे आणि एखाद्या व्यावसायिक वित्तीय सल्ला गारकडून करून घेणे यामध्ये हाच फरक आहे. वर उल्लेख केलेल्या कारणांसाठी तरतूद केल्याशिवाय नियोजन पूर्णत्वाला जात नाही. आवश्यक खरेदी आणि अनवधानाने केलेली खरेदी यातील भेद जाणून उज्ज्वल भविष्यासाठी या त्रुटींचे निराकरण केले जाईल ही आशा.

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)