|| तृप्ती राणे

जेव्हा पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकट वापरायची वृत्ती वाढते आणि कष्ट करायची तयारी कमी होते, तेव्हा अर्थसंस्कार कुठेतरी कमी पडत आहेत असं समजावं..

गेल्या आठवडय़ात माझ्या वर्गात व्यवसायाचे नवे पर्याय आणि त्यावर होणारा तंत्रज्ञानाचा परिणाम या विषयावर एक मस्त चर्चा रंगली होती. आजच्या काळात व्यवसाय करायच्या जुन्या पद्धती कशा प्रकारे पटापट कालबाह्य़ होत आहेत आणि यामुळे उद्योगांचे नवीन प्रकार किती झपाटय़ाने उदयाला येत आहेत याबद्दल मुलं आपआपली मतं मांडत होती. तितक्यात एका मुलाने मला एका नवीन प्रकारच्या ऑनलाइन गेमबद्दल सांगितलं. कदाचित तो जुना असेल, पण मला मात्र तो तेव्हा पहिल्यांदा कळला. तर यामध्ये ‘बेटिंग’ केलं जातं आणि जो जिंकतो त्याला पैसे दिले जातात.

पैज लागते कशावर, तर काही ठरावीक लोकप्रिय खेळाडूंच्या, पुढे होणाऱ्या सामन्यांमधील कामगिरी वर. पजेची रक्कम काही शेकडा ते अगदी लाखांपर्यंत जाते आणि काही लोकांना म्हणे अगदी एक कोटींइतके पैसेसुद्धा मिळाले आहेत. हे ऐकल्यावर मी जरा विचारात पडले की, हे नक्की काय चाललंय? एक प्रकारचा जुगार सुरू झालेला आहे,  ज्यामध्ये तरुण मुलं त्यांच्या नकळत गुरफटली जात आहेत. हे पैसे घेऊन ही मुलं काय करतात? या मुलांना सुरुवातीला लागणारा पसा कोण पुरवतं? यांच्या आई-वडिलांना या प्रकाराची कल्पना आहे का? असे पैसे मिळवताना त्या मुलांच्या स्वकर्तृत्वाचं काय होतंय? यात नुसती मुलं आहेत असं नाही, नोकरी करणारे कर्मचारीही आहेत बरं का. या अशा खेळांमध्ये वेळ घालवल्याने कार्यक्षमता कमी तर नक्कीच होत असेल.

आज स्मार्टफोनमुळे पटकन भुरळ पडणारं मार्केटिंग कुणीही करतं आणि लोकांना स्वतच्या जाळ्यात ओढतं. काही सेकंदात एखादं अ‍ॅप डाऊनलोड करता येतं, त्यात मोबाइलमधूनच पैसे ट्रान्स्फर करता येतात आणि मग सुरू होतो खरा खेळ.

‘खेळा, जिंका, पुन्हा पैसे घाला, पुन्हा मोठी पैज लावा..’ आणि हे दुष्टचक्र अजून जोराने फिरवा! कशावरून हा पसा वाईट वृत्तींना प्रोत्साहन देणारा नसेल? कशावरून अशा पजेसाठी लागणारा पसा गरमार्गाने मिळवलेला नसेल? एखादी व्यक्ती किंवा मूल जेव्हा नीतिमत्तेला धरून वागत नाही तेव्हा लोकत्याच्यावर चांगले संस्कार झाले नाहीत असं म्हणतात. अगदी याचप्रमाणे जेव्हा पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकट वापरायची वृत्ती वाढते आणि कष्ट करायची तयारी कमी होते, तेव्हा अर्थसंस्कार कुठेतरी कमी पडत आहेत असं समजावं.

अर्थसंस्कार म्हणजे नक्की काय? माझ्यासाठी या अवजड शब्दांचा अर्थ हा असा – आयुष्य जगण्यासाठी नीतिमत्तेला अनुसरून, स्वतचं कौशल्य वापरून पैसे कमावणं व त्याचा गरजेनुसार वापर करणं, वेळोवेळी इतर गरजूंना मदत करणं आणि मग पुढच्या पिढीसाठी ठेवणं.

अशा प्रकारे मिळालेली संपत्ती ही पुरून उरते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाधान देते. मेहनतीचा पसा सहसा चनीत जात नाही, पण काहीही न करता कमावलेला पसा मात्र गरमार्गाकडे जाण्याची शक्यता जास्त असते. आधीच्या काळात लोकांकडे पसा कमी पण मानसिक समाधान जास्त होतं. पण आता परिस्थिती या उलट आहे. दोन कमावणारे आणि तीन खाणारे असं समीकरण बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं. ‘मला माझ्या लहानपणी जे मिळालं नाही ते मी माझ्या पाल्याला देणार!’ ही मानसिकता जवळ जवळ सगळ्याच पालकांची असते. पण मुलांची खरी गरज आणि स्वतची ऐपत हे कुणी तपासतंय का? आणि जिथे पालकांना आर्थिक शिस्त नसेल तर मग मुलांना कोणते धडे मिळणार?

  • तर कुटुंबावर चांगले अर्थसंस्कार करण्यासाठी..
  • घरातल्या प्रत्येकाच्या खर्चावर अंकुश हवाच. खिशात आणि खात्यात जास्तं पैसे राहिले की खर्च होतात.
  • महिन्याच्या सुरुवातीला सगळी गुंतवणूक झाली पाहिजे आणि उरेल त्यात महिना भागवायचा.
  • महिन्याच्या शेवटी आणि पगाराच्या आधी राहिलेली रक्कमसुद्धा गुंतविली गेली पाहिजे.
  • प्रत्येक खर्चाचं बजेट ठरवा. घराच्या नियमित खर्चापासून अगदी पाणी-पुरीच्या नाश्त्यापर्यंत. बाहेर खाण्याचं तर नियोजन पाहिजेच.
  • मुलांच्या ‘पॉकेट मनी’लासुद्धा योग्य मर्यादा असू द्या. त्यांच्या हातून होणारे खर्च योग्य असल्याची शहानिशा वेळोवेळी करा.
  • स्मार्टफोनचा वापर स्वतच्या भल्यासाठी करा. नियमित खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी तो खूप उपयोगी पडतो.
  • गुंतवणूक करायला छोटी रक्कमसुद्धा पुरेशी असते. अगदी ५० रुपये जरी वाचवता आले, तरी ते बाजूला ठेवा आणि महिन्याअखेरीस गुंतवा.
  • घरामध्ये गुंतवणूक संवाद होऊ द्या. कशा प्रकारे पैसे गुंतवले की ते कसे वाढतात आणि आपल्या आर्थिक ध्येयात कसे कामी येतात हे मुलांच्या अंगवळणी पडलं पाहिजे.
  • जुगार, लॉटरी, मल्टी लेव्हल मार्केटिंगपासून स्वतला लांब ठेवा आणि याबाबत मुलांनासुद्धा जागरूक करा.
  • कर्ज गरजेसाठी आणि फक्त त्यासाठीच. चनीसाठी कर्जाची सवय नको.
  • मुलांना पसा पुरवतानासुद्धा त्यामागचे कष्ट आणि बरोबरची जबाबदारी या दोन्ही गोष्टींची जाणीव करून द्या.
  • खरेदीला जाताना यादी बनवा आणि त्यानुसार खरेदी करा. काहीतरी आवडलं म्हणून घेताना, डेबिट कार्ड वापरा. खात्यात पैसे कमी असतील तर अनावश्यक खर्च आपोआप टळेल.

नवीन आर्थिक वर्षांत हे संस्कार करून आपल्या कुटुंबाला एक नवीन आणि चांगली सुरुवात करून द्या!

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

सूचना :

  • जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्याची किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.
  • या सदरात गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.
  • सर्व नमूद म्युच्युअल फंड रेग्युलर ग्रोथ प्लानचे असून, यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील; परंतु त्यांचा या सदरातील पोर्टफोलिओंच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.
  • म्युच्युअल फंडांचे एक्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर यांचा विचार या सदरात केलेला नाही. कोणतीही गुंतवणूक करताना या खर्चाचा आणि कर नियमांचा आढावा घ्या.