13 December 2019

News Flash

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी

समर्थ रामदासांच्या, मनोबोधातील १५ व्या श्लोकात पृथ्वीला मृत्यूलोक का म्हणतात याचे विवेचन केले आहे.

|| अनुराधा सहस्रबुद्धे

वैध नामनिर्देशन नसल्याचे परिणाम जटिल होऊ शकतात. बँकांकडे अंदाजे ८,००० कोटी रुपयांहून अधिक पडून असलेल्या ‘दावाहीन’ ठेवी ही मोठी रक्कम याचाच एक पुरावा आहे..

समर्थ रामदासांच्या, मनोबोधातील १५ व्या श्लोकात पृथ्वीला मृत्यूलोक का म्हणतात याचे विवेचन केले आहे. पृथ्वीवर आलेल्याला एक दिवस मृत्यू गाठणार हे शाश्वत असूनही जिवंत असतानाच प्रत्येकाला आपल्याला एक दिवस हे जग सोडून जायचे आहे याचा विसर पडलेला असतो. मृत्यूची हाक आल्यावर एक क्षणसुद्धा उसंत मिळत नाही. जेव्हा तुम्ही गुंतवणुकीसाठी प्रत्येक वेळी म्युच्युअल फंड किंवा बँकेत साधे बचत खाते उघडता तेव्हा भरल्या जाणाऱ्या अर्जात एक स्वतंत्र रकान्यात नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीचे नाव अर्जदाराला लिहावे लागते. अनेकदा बऱ्याच लोकांकडून जाणते-अजाणतेपणे हा रकाना रिक्त राहतो. आजच्या लेखाच्या निमित्ताने या एका दुर्लक्षित परंतु महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे पाहू या.

समर्थ म्हणतात त्याप्रमाणे एखाद्यास अनपेक्षित मृत्यू गाठतो, तेव्हा बँकांमधील पसे आणि मृताच्या नावे असलेल्या गुंतवणुकांवर मृत व्यक्तीचे कायदेशीर वारस दावा करू शकतात. सांगायला ही गोष्ट सोपी वाटत असली, तरी वास्तविक मालमत्तेचे हस्तांतरण ही एक लांबलचक प्रक्रिया आहे. आपल्याला मृत्यूचा दाखला आणि कायदेशीर प्रमाणपत्रे प्रसंगी कोर्टाच्या आदेशाची प्रत यांसारख्या कागदपत्रांची आवश्यकता असते. गुंतवणूकदाराच्या वारसांकडून या कागदपत्रांची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत मालमत्तेचे हस्तांतरण होण्याच्या प्रक्रियेस काही आठवडे, काही महिने, प्रसंगी वर्षभराचा कालावधीसुद्धा लागू शकतो. तथापि, गुंतवणूकदाराने नामनिर्देशन केले असेल तर मालमत्तेचे हस्तांतरण ही प्रक्रिया सुलभ होऊ शकते. रिझव्‍‌र्ह बँकेने या वर्षांच्या जानेवारी महिन्यात देशभरातील बँकांकडे अंदाजे ८,००० कोटी रुपयांच्या ‘दावाहीन’ ठेवी पडून असल्याचे सांगितले. ‘हक्क न सांगितलेली’ ठेव ही मूलत: मालकाशिवाय आणि वैध नामनिर्देशन (नॉमिनी) केले नसलेली ठेव असते. वैध नामनिर्देशन नसल्याचे परिणाम जटिल होऊ शकते याचा पुरावा ही मोठी रक्कम आहे.

याव्यतिरिक्त कंपनी मुदत ठेवी, पोस्टाच्या ठेवी, समभाग गुंतवणूक, रोखे, योग्य हस्तांतरण न झालेल्या सदनिका, यांचा विचार केल्यास या सर्व मालमत्तेचे मूल्य एक लाख कोटींच्या पलीकडे जाणारे असेल. यासाठी गुंतवणूक करताना नामनिर्देशन आणि नामनिर्देशित व्यक्तीचाच मृत्यू झाल्यास त्वरित नामनिर्देशन बदलणे आवश्यक आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी ‘संयुक्त खाते आणि दोन पकी कोणीही किंवा हयात’ अर्थात जॉइंट होल्डर्स पद्धतीची मालकी आणि व्यवहार ‘एनी वन ऑर सरव्हायव्हल’ पद्धतीने सोयीचे असते. नामनिर्देशनाअंतर्गत, गुंतवणूकदार केवळ एखाद्यास नामनिर्देशित करतात. एकाच्या नावे गुंतवणुका असतील आणि नामनिर्देशन असेल तर धारकाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीला गुंतवणुकीची मालकी मिळू शकते. भांडवल बाजाराचे नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) नियमांनुसार डीमॅट, म्युच्युअल फंड इत्यादी गुंतवणुकांत आपल्या पसंतीच्या तीन जणांना नामनिर्देशित करू शकता. या तीन जणांना गुंतवणुकीतील वेगवेगळा हिस्सा देणे शक्य आहे. संयुक्त खातेधारक आपल्या गुंतवणुकीचे भाग-मालक आहेत. परंतु ‘नॉमिनी’ हा तुमच्या गुंतवणुकीवर विश्वस्त असतो तो मालक नसतो. पदानुक्रम क्रमवारीत, जर प्राथमिक धारकाचा मृत्यू झाल्यास संयुक्त खातेधारक-विशेषत दुसरा खातेधारक-गुंतवणुकीचा मालक बनतो. जेव्हा सर्व संयुक्त खातेदारांचा मृत्यू होतो तेव्हाच नामनिर्देशित व्यक्ती (नॉमिनी) गुंतवणुकीची मालक बनते. प्राथमिक धारकाचा मृत्यू झाल्यास युनिटचे हस्तांतरण – हयात असलेल्या युनिट धारकांकडे (जसे क्रमवारीत आहेत तसे,) किंवा नामनिर्देशित (जर कोणतेही संयुक्तधारक नसल्यास) याव्यतिरिक्त, नामनिर्देशित व्यक्तीच्या नावे गुंतवणूक हस्तांतरित करायची असेल आणि गुंतवणुकीचे मूल्य एका लाखाहून अधिक असल्यास नामनिर्देशित व्यक्तीने बंधनपत्र देणे आवश्यक आहे. संयुक्त मालकीबाबत काही गरसमज आहेत. संयुक्त मालकी ही एक गुंतवणुकीचे नियमन करण्याची सोय आहे. गुंतवणुकीचे संयुक्त खाते म्हणजे ५० टक्के मालकी नव्हे. प्राथमिक गुंतवणूकदार हयात असताना सर्व हक्क आणि १०० टक्के मालकी ही प्राथमिक धारकाचीच असते. संयुक्त खातेधारकाची मालकी पहिल्या खातेधारकाच्या मृत्यूनंतरच अस्तित्वात येते. एकच नावावर असलेल्या बँक खात्यात आपल्या पसंतीच्या दुसऱ्या खातेधारकाचे नाव जोडता येते. परंतु म्युच्युअल फंड खात्यात किंवा डीमॅट खात्यात नाव जोडण्याची किंवा मृत्यूव्यतिरिक्त कारणांनी कमी करण्याची सोय नाही, अशा परिस्थितीत विद्यमान खाते बंद करून दुसरे म्युच्युअल फंड खाते किंवा दुसरे डीमॅट खाते उघडावे लागते. या सगळ्यामागील कल्पना ही आहे की संपत्तीचे लाभ व्यवस्थापन आणि मालकी हक्क सहजपणे कोणत्याही अस्पष्टते किंवा गोंधळाशिवाय हस्तांतरित होण्यासाठी संयुक्त लाभधारक आणि नामनिर्देशित व्यक्तीकडे अंतिम वारसा मिळेल. मात्र नामनिर्देशन असूनदेखील गुंतवणूकदाराने वैध इच्छापत्र तयार केले असेल आणि नामनिर्देशित व्यक्ती वेगवेगळी असेल तर भारतीय उत्तराधिकार कायद्यानुसार कायदेशीर मालकी ही इच्छापत्रात नमूद केलेल्या व्यक्तीकडे किंवा कायदेशीर वारसांकडे जाते.

‘सेबी’च्या आदेशाने सात वष्रे लाभांशाचे धनादेश न वठवल्यास, हे समभाग ‘दावाहीन’ (अनक्लेम्ड) समजून हे समभाग गुंतवणूकदाराच्या डीमॅट खात्यातून ‘आयईपीएफ’ (गुंतवणूक शिक्षण व संरक्षण निधी) खात्यात जमा होतात. या खात्यात्यून समभाग परत आणणे केवळ अशक्यच. तुमचे समभाग आणि म्युच्युअल फंड आदी गुंतवणुका/मालमत्ता आपल्या पश्चात ‘दावाहीन’ पडून राहू नये हे या लेखाचे प्रयोजन आहे. समर्थाच्या सांगण्याप्रमाणे अकस्मात बोलावणे येते आणि असेल त्या स्थितीत जावे लागते. परंतु बोलावणे नेमके कधी येईल याचा नेम सांगता येत नाही. जिवंत असताना मृत्यूचे भान नसते. एखादी गोष्ट अकल्पितपणे घडून गेल्यावर भोगण्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसतो. म्हणून आजच सर्व गुंतवणुका या संयुक्त नावे आणि नामनिर्देशित कराव्यात.

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत,akswealth@gmail.comई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)

First Published on August 12, 2019 12:19 am

Web Title: how to invest money in india mpg 94
Just Now!
X