13 December 2019

News Flash

..पण पांढरे सोने काळवंडतेय

एकीकडे सोन्या-चांदीची चमक दिवसेंदिवस वाढत असताना ‘पांढरे सोने’ मात्र काळवंडताना दिसत आहे..

|| श्रीकांत कुवळेकर

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे कापूस उत्पादक राज्य महाराष्ट्रात या वर्षी वाढत्या बीटी क्षेत्रामुळे आणि गेल्या वर्षीपेक्षा अधिक पावसामुळे उत्पादनात चांगलीच वाढ होण्याची चिन्हे आहेत. असे असताना हंगामाला दोन महिने राहिले असताना केवळ जागतिक परिस्थितीमध्ये झपाटय़ाने बदल झाल्याने कापसाच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. एकीकडे सोन्या-चांदीची चमक दिवसेंदिवस वाढत असताना ‘पांढरे सोने’ मात्र काळवंडताना दिसत आहे..

मागील पंधरवडय़ामधील व्यापाराचा विचार करता कमॉडिटी बाजारामध्ये फक्त सोने, चांदी आणि कच्चे तेल या जागतिक पातळीवरील तीन प्रमुख वस्तूंवरच लक्ष केंद्रित झाले होते. सोने आणि चांदीमधील तुफान तेजी टिकून राहिली. त्यात पुढील काळात चढ-उतार झाले तरी मुख्य प्रवाह तेजीचाच राहणार असे वाटत आहे. भारतात वायदे बाजारामध्ये सोने प्रति १० ग्रॅमला ३८,००० रुपयांवर गेले असून प्रत्यक्ष सोने खरेदी जवळपास थांबली आहे. सोन्याच्या भावातील भारतातील हा आजवरचा विक्रमी भाव आहे. चांदीदेखील किलोमागे ४४,००० रुपयांवर जाऊन आली आहे. म्हणजे हाजीर बाजारामध्ये प्रति किलो ४६,००० रुपयांच्या आसपास हा भाव असेल.

या स्तंभामधून जुलच्या सुरुवातीला शिफारस केल्याप्रमाणे सोन्याच्या भावाने खूपच अल्पकाळात आपले ३८,००० रुपयांचे लक्ष्य गाठले आहे. आता सोने ४०,००० रुपयांकडे झेप घेण्याच्या पावित्र्यात असल्याची हवा बाजारात पसरली आहे.

मात्र हाच काळ धोकादायक आहे. वायदे बाजारातील तांत्रिक घटक पाहता ४०,००० रुपयांपर्यंत वाढण्यापेक्षा सोने ३६,५०० रुपयांवर घसरण्याची शक्यता अधिक वाटत आहे. अर्थात ट्रम्प महाशयांचे ट्वीट तर काहीही करू शकते. मग सोने एक-दोन दिवसांत ४०,००० रुपये अथवा ३५,००० रुपये यापैकी काहीही सहज शक्य आहे. त्यामुळे या जीवघेण्या चढ-उतारांमध्ये बाजारापासून दूर राहणे इष्ट.

आता कृषी बाजारपेठेकडे वळूया. मोसमी पावसाच्या हंगामामध्ये या वर्षी भारतात विचित्र चित्र पाहावयास मिळत आहे. अर्ध्याहून अधिक कृषीबहुल भारत उशिरा झालेल्या अतिवृष्टीने पुराच्या, नव्हे महापुराच्या गत्रेत सापडला आहे. तर पूर्वोत्तर भारत अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दक्षिणेतही असमान पाऊस असून महाराष्ट्रातही वेगळी स्थिती नाही. पश्चिम महाराष्ट्र कित्येक दशकांमध्ये न पाहिलेल्या महापुराशी झुंजत आहे, तर मराठवाडा आणि विदर्भ बऱ्यापकी आसुसलेलाच राहिला आहे. देशातील एकत्रित पर्जन्यमानाने गेल्या वर्षीपेक्षा चांगली आकडेवारी दर्शविली असली तरी त्यात विलक्षण असमानता असल्यामुळे कृषी क्षेत्राला तो त्या प्रमाणात तारक राहील की नाही हा यक्षप्रश्नच आहे.

मागील गुरुवापर्यंतची देशभरातील खरीप पेरण्यांची आकडेवारी चांगलीच सुधारली असली तरी पेरण्यात सुमारे चार आठवडय़ांचा विलंब आणि असमान पाऊस यामुळे उत्पादकता कशी राहील यावरच बाजाराची नजर राहील.

कापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रामधील मुख्य नगदी पिके असून देशात सोयाबीनने गेल्या वर्षीपेक्षा थोडे अधिक क्षेत्र नोंदवले असून कापसामध्ये तेवढेच क्षेत्र घटले आहे. महाराष्ट्रामध्ये या उलट परिस्थिती आहे. सोयाबीनचे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा लाखभर हेक्टरने कमी झाले असून कापसाचे क्षेत्र तीन लाख हेक्टरने वाढून ते विक्रमी ४२ लाख हेक्टरहून अधिक झाले आहे. नेमका हाच चिंतेचा विषय आहे.

झालंय काय की दोन-तीन वर्षांतील तेजीनंतर अचानकपणे कापूस मंदीच्या गत्रेत झुकताना दिसत आहे. महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक असून वाढत्या बीटी क्षेत्रामुळे आणि गेल्या वर्षीपेक्षा अधिक पावसामुळे या वर्षी उत्पादनात चांगलीच वाढ होण्याची चिन्ह दिसत आहे. असे असताना केवळ जागतिक परिस्थितीमध्ये झपाटय़ाने बदल झाल्यामुळे हंगामाला दोन महिने राहिले असताना कापसाच्या किमतीमध्ये मोठी घसरण होत आहे.

एकीकडे सोन्या-चांदीची चमक दिवसेंदिवस वाढत असताना पांढरे सोने मात्र काळवंडताना दिसत आहे. कापसाच्या किमती प्रति क्विंटल जूनमधील ६,३०० रुपयांवरून आता ५,८०० रुपयांवर घसरल्या असून लवकरच ५,६०० रुपये हमीभावाच्या खाली घसरणार हे नक्की आहे.

सोन्यातील तेजीची आणि कापसातील मंदीची कारणे सारखीच आहेत. अमेरिका आणि चीनमधील प्रत्येक दिवसागणिक वाढत जाणारा व्यापारी तणाव, चीनने आपल्या चलनामध्ये केलेले अवमूल्यन याचा फटका संपूर्ण जगाला बसत असून आधीच मोडकळीला आलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेलादेखील याचा चांगलाच फटका बसण्याची चिन्हे आहेत. कापसाचा विचार केल्यास अमेरिका जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश असून चीन सर्वात मोठा आयातदार आहे.

कापसाचे उत्पादन जगात सहा टक्क्यांनी वाढण्याचे अंदाज असून मागणीमध्ये जेमतेम दोन टक्क्यांनी वाढ होईल, असे आंतरराष्ट्रीय संस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुढील हंगामाअखेर जागतिक साठय़ांमध्ये चांगलीच वाढ होणार आहे. त्यातच २५ टक्के आयात शुल्क लावल्यामुळे चीनकडून अमेरिकन कापसाला उठाव राहणार नसल्यामुळे तेथील किमती आताच भारतीय चलनानुसार ५,२०० रुपये एवढय़ा खाली आल्या आहेत. बाजार तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील एक महिन्यात त्या ४,८०० रुपये, म्हणजे दहा वर्षांतील नीचांकी पातळीवर येऊ शकतील.

भारतातील कापूस उत्पादन या वर्षांतील ३१० लाख गाठींवरून ३६०-३७० लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता असताना भाव पातळीतील या फरकाने भारतात कापसाची प्रचंड आयात होण्याची शक्यता आहे. खात्रीलायक वृत्तानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर डिलिव्हरीसाठी आताच ५०,००० – ६०,००० गाठीचे आयात सौदे भारतातील काही गिरण्यांनी केले असून ती येऊ घातलेल्या संकटाची एकप्रकारे चाहूल आहे असे म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे निर्यातीची शक्यता नसल्यामुळे येथील साठेदेखील वाढू शकतील आणि त्याचा भावावर अधिक विपरीत परिणाम होईल.

त्यामुळे येणारा काळ इतर शेतकऱ्यांबरोबरच कापूस उत्पादकांकरिता अत्यंत कसोटीचा असणार असे वाटत असून सरकारने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत तर शेतकरी रस्त्यावर उतरल्यावाचून राहणार नाही. शेतकरी नेते आणि शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी झटणाऱ्या सर्वानी युद्धपातळीवर एकत्र येऊन आताच सरकारवर योग्य पावले उचलण्यासाठी दबाव टाकण्याची गरज आहे. कापूस महामंडळ अगदी शंभर-सव्वाशे लाख गाठी हमीभावात खरेदी करेलही, परंतु त्याने प्रश्न सुटणार नाही. फक्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा बराच मोठा वाटा महामंडळाला म्हणजे पर्यायाने सरकारला उचलावा लागेल. सरकारची सध्याची आर्थिक परिस्थिती निश्चितच हे ओझे वाहण्याइतकी चांगली नाही.

या परिस्थितीत कापसावर लवकरात लवकर २० टक्के आयात शुल्क लावल्यास परदेशी कापसाच्या आणि आपल्या किमतीमधील फरक मिटून आयात थांबेल आणि किमती निदान हमीभाव पातळीवर स्थिर होतील असे वाटते. परिस्थिती तर कठीण आहे. देवाकडे एकच प्रार्थना. ट्रम्पना ईश्वर सुबुद्धी देवो आणि जागतिक अर्थव्यवस्थेला निर्माण झालेला धोका टळो.

येणारा काळ इतर शेतकऱ्यांबरोबरच कापूस उत्पादकांकरिता अत्यंत कसोटीचा असणार असे वाटत असून सरकारने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत तर शेतकरी रस्त्यावर उतरल्यावाचून राहणार नाही. शेतकरी नेते आणि शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी झटणाऱ्या सर्वानी युद्धपातळीवर एकत्र येऊन आताच सरकारवर योग्य पावले उचलण्यासाठी दबाव टाकण्याची गरज आहे.

ksrikant10@gmail.com

(लेखक वस्तू बाजार विश्लेषक)

First Published on August 12, 2019 12:19 am

Web Title: how to invest money in silver chemical element mpg 94
Just Now!
X