भालचंद्र जोशी

गेल्या वर्षी मार्च महिन्यातील तीव्र घसरणीत, समभागातून रोखे गुंतवणुकीत संक्रमित झालेले गुंतवणूकदार वर्षभरात बाजारात पुन्हा जोरदार तेजी आल्याने किती नफ्याला मुकले हे ज्याचे त्याने ठरविणे योग्य ठरेल. भीती आणि अनिश्चितता यांच्यामुळे काही वर्षे केलेले आर्थिक नियोजन एका आठवडय़ातील घसरणीमुळे धुळीला मिळाले. बाजार म्हटले की अस्थिरता आलीच. आपल्या मनाला अस्थिरतेशी मैत्री करायला शिकवणे हे एक गुंतवणूकदाराने गुंतवणूक प्रक्रियेत परिपक्व होण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. बाजार अस्थिरतेशी स्नेह कसा जुळवावा, याचा हा वस्तुपाठ..

रोखे म्युच्युअल फंडाचा परतावा नकारात्मक दिसत आहे. सर्वात सुरक्षित समजले जाणारे शॉर्ट टर्म फंड देखील याला अपवाद न ठरल्याने या फंड प्रकारात गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. परंतु तसे पाहिले तर अस्थिरता ही गुंतवणूक आणि त्यातून मिळणारा परतावा याचाच अविभाज्य घटक आहे.

अस्थिरता ही सर्वसाधारणपणे गुंतवणूकदारांना न आवडणारी बाब. दोन वर्षांंपूर्वी झालेल्या भारतातील लोकसभेच्या निवडणुका असोत किंवा करोनामुळे झालेली घसरण किंवा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरची उसळी असो, सर्व गुंतवणूकदारांना निरंतर अस्थिरतेशी सामना करावा लागला. अशा या उलथापालथीच्या काळात एखाद्या निष्कर्षांवर येण्यापूर्वी भावना आणि बुद्धी यांच्या पातळीवर होणारी घालमेल आपण नक्कीच अनुभवली असणार. जेव्हा आपल्या भावना गुंतवणूक आणी गुंतवणुकीचा आढावा या विषयी जेव्हा तीव्र होत असतात. तेव्हा आपल्याला शांत राहून तटस्थतेने विचार करण्याची अत्यंत गरज असते. भावनेच्या ओघात घाईघाईत दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये चुकीचे आर्थिक वर्तन घडण्याची दाट शक्यता असते.

आपल्याला माहिती असेलच की, तणाव मग तो २००८ सारखा आर्थिक असो किंवा नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या निवडणुकीच्या वेळी राजकीय कारणांनी निर्माण झालेला तणाव असो किंवा कोविडसदृश परिस्थितीजन्य आर्थिक तसेच सामाजिक तणाव असो, ही अनिश्चितता बाजारातील अस्थिरता वाढवते. अनिश्चितता गुंतवणूकदरांसाठी तणावपूर्ण असली तरी अस्थिरता हा बाजाराचा न टाळता येणारा भाग आहे. खरे तर, मानसशास्रीयदृष्टय़ा अनिश्चितता आणि मानसिक तणाव हा अतिशय त्रासदायक असतो. अशा तणावपूर्ण मानसिक परिस्थितीत आपल्याला आपण घेतलेल्या निर्णयाची नंतर कदाचित खंत वाटू शकेल. मग ‘एसआयपी’ बंद करणे, समभाग गुंतवणुकीतून मालमत्ता रोख्यात संक्रमित करणे यासारख्या तात्पुरत्या उपायकारक परंतु वित्तीय नियोनासाठी दीर्घकालीन अपायकारक गोष्टी नकळत घडतात.

अनिश्चिततेत पैसा गमावण्याच्या भीतीत वाढ होते. पैशांचे व्यवस्थापन अधिक काळजीपूर्वक करायला हवे होते, अशी रुखरुख नंतर लागून राहते. याच अनामिक भितीपोटी प्रत्येक गोष्टीत अस्तित्वात नसलेले धोकेही दिसू लागतात. परंतु खरा धोका असतो तो दूरगामी विचार न करता नजीकच्या न घडणाऱ्या किंवा घडण्याची शक्यता अतिशय कमी असलेल्या गोष्टींच्या शक्यतांनी डोक्यात घर कण्याचा. सारासार विचार न करता केलेली कृती यातून घडते. पाश्चिमात्य जगात आर्थिक वर्तनावर संशोधन असे सांगते की, नजीकच्या फायद्याचा विचार करून केलेली कृती भविष्यातील मोठय़ा फायद्यापासून वंचित करते. बाजारातील मोठय़ा प्रमाणातील अस्थिरता तात्पुरते खूपच जास्त पैसे गमावल्याचे मोठे दु:ख देते. अशाच दु:खाच्या आवेगात मार्च महिन्यांत समभागातून रोखे गुंतवणुकीत संक्रमित झालेला गुंतवणूकदार वर्षभरात बाजारात जोरदार तेजी आल्याने किती नफ्याला मुकले हे ज्याचे त्याने ठरविणे योग्य. भीती आणि अनिश्चितता यांच्यामुळे काही वर्षे केलेले आर्थिक नियोजन एका आठवडय़ातील घसरणीमुळे धुळीला मिळाले.

मनाची शक्ती मोठी आहे. निग्रह आणि निश्र्च्य हे बाजार अस्थिरतेवर निश्चितपणे मात करू शकतील. आपण दीर्घकाळ गुंतवणूकदार असल्याने अनिश्चिततेस कारण ठरलेल्या संकटावर मात करणाऱ्या मार्गाचा शोध घेणे हे आपले काम नसून या गोष्टींवर आपले नियंत्रण नसतेच. परंतु अनिश्चिततेपासून आणि ज्या गोष्टी आपण नियंत्रित करू शकतो अशा गोष्टींकडे आपण आपले लक्ष केंद्रित करायला हवे. मालमत्ता विभाजन, जोखीमांक तपासणी, मालमत्तेतील वैविध्य इत्यादी गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत. अनिश्चिततेचा सामना करताना बाजाराची तीव्र प्रतिक्रिया आली तर संकटाचे संधीत रूपांतर करण्याची एक गुंतवणूकदार म्हणून रणनिती नक्कीच अवलंबू शकतो. बाजारातील अनपेक्षित तीव्र घसरण ही गुंतवणुकीची उत्तम संधी निर्माण करते. त्याचा फायदा उठविणे शक्य आहे. आपल्याकडील बलाढय़ कंपन्या जेव्हा घसरणीमुळे सवलतीत असतील तेव्हा खरेदी करण्याची संधी निधी व्यवस्थापक नक्कीच साधत असतात. तेजीमुळे कंपन्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली असेल तर मालमत्ता विभाजन करून आपल्याला गुंतवणुकीचा समतोल साधता येतो.

बाजार म्हटले की अस्थिरता आलीच. आपल्या मनाला अस्थिरतेशी मैत्री करायला शिकवणे हे एक गुंतवणूकदाराने गुंतवणूक प्रक्रियेत परिपक्व  होण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आत्मसंयम व धैर्य अस्थिरतेमुळे विचलित झालेल्या मनाला ताळ्यावर आणण्याचे काम नक्कीच करेल. अनिश्चिततेच्या काळात मनाचे संतुलन ठेवण्याचे कौशल्यही तितकेच महत्वाचे आहे. हे कौशल्य परिस्थितीच्या सकारात्मक बाजूचा विचार करायला शिकवेल. सकारात्मक विचारांमुळे दीर्घकालीन उपयुक्त परिणाम संभवतात. अनिश्चिततेचा आणि विलंबाचा हा काळही निश्चितपणे निघून जाईल. बाजाराच्या अस्थिरतेचा सतत विचार करण्याऐवजी मनाला बाजाराच्या अस्थिरतेशी मैत्री करायला शिकविले तर एक गुंतवणूकदार म्हणून आपण नक्कीच यशस्वी होऊ याबद्दल शंका नाही.

मागील वर्षी बाजाराने मोठी अस्थिरता अनुभवली. या अनुभवांचा योग्य तो धडा घेऊन आपण दीर्घकालीन यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असत.े गुंतवणूक करण्यापूर्वी फंड माहितीपत्रक सखोल अभ्यासा.)

लेखक व्हाइट ओक कॅपिटल मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक व मुख्य परिचालन अधिकारी

bhalchandra.joshi@whiteoakindia.com