|| अजय वाळिंबे

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील सामान्य विमा कंपनी आहे. कंपनी मोटार, आरोग्य, प्रवास, शेती, घर, विद्यार्थी, प्रवास, अपघात इ. अनेक प्रकारचे विमा संरक्षण प्रदान करते. २००१ मध्ये आयसीआयसीआय या आघाडीच्या वित्तीय संस्थेने, फेयरफॅक्सची उपकंपनी लोम्बार्ड इन्शुरन्सच्या संयुक्त विद्यमाने विमा व्यवसाय सुरू केला. त्या वेळी परदेशी कंपनीने या प्रकल्पात २६ टक्के भांडवली गुंतवणूक केली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये भारतीय शेअर बाजारात ‘आयपीओ’द्वारे नोंदणी करणारी ही पहिली भारतीय खासगी विमा कंपनी. गेल्या १७ वर्षांत कंपनीने अनेकविध विमा योजनांचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिलेच, शिवाय आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे आधुनिकीकरणदेखील केले. आज बहुतांशी विमा पॉलिसी आणि दावे निवारणाची प्रक्रियाही मोबाइल अ‍ॅपद्वारे किंवा ऑनलाइन होते. त्यामुळे वेळेची बचत होऊन ‘क्लेम्स’चेदेखील लवकर निराकरण होतात. गेल्या वर्षी कंपनीने आर्टििफशियल इंटेलिजन्सचा वापर करून कॅशलेस मेडिक्लेम प्रोसेसिंगची वेळ ६० मिनिटांवरून केवळ एका मिनिटावर आणला आहे. तसेच गेल्याच वर्षी कंपनीने ओला या खाजगी टॅक्सी सेवेसमवेत करार करून मोठय़ा शहरांसाठी विमा योजना बाजारात आणली आहे. कंपनीचे मार्च २०१९ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षित निकाल जाहीर झाले आहेत. या कालावधीत कंपनीने ८,३७५.३५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,०४९.२७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत २१.८ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीच्या विमा हप्त्यापोटी उत्पन्नामध्ये देखील १७.९ टक्के वाढ झाली आहे (या क्षेत्रातील सरासरी १२.९ टक्क्यांपेक्षा सरस). दीड वर्षांपूर्वी ‘आयपीओ’मध्ये ज्या गुंतवणूकदारांना हा शेअर मिळाला असेल त्यांना ७० टक्के फायदा झाला आहे. आगामी काळात भारतासारख्या देशांत सर्वसाधारण विमा उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल आहे. अनुभवी प्रवर्तक, विम्याचे नवीन विविध पर्याय आणि उद्योगाची वाढ पाहता हा शेअर खरेदीसाठी आकर्षक वाटतो. नवीन गुंतवणूकदारांनी सध्या १,०५० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आपल्या पोर्टफोलियोमध्ये राखून ठेवावा.