आजपासून सुरू होणाऱ्या आठवडय़ात ज्या कंपन्यांची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) सुरू होत आहे त्यापैकी दोन कंपन्यांच्या प्राथमिक विक्रीची दखल घेणे आवश्यक आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स लिमिटेड आणि मॅट्रीमोनी डॉट कॉम लिमिटेड या कंपन्यांच्या भागविक्रीत गुंतवणुकीसंदर्भात विश्लेषण..

भारतातील सर्वसाधारण विमा व्यवसायाचा विचार केल्यास भारतात विमा नियमन प्राधिकरणाकडे ५३ नोंदणीकृत विमा कंपन्या असून यापैकी २४ कंपन्या जीवन विमा व्यवसायात तर उर्वरित २९ कंपन्या सर्वसाधारण विमा व्यवसायातील आहेत. जीवन विमा व्यवसायातील भारतातील जीवन विम्याची बाजारपेठ जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ असून भारतात सुरू असलेल्या जीवन विमा पॉलिसीची संख्या ३ कोटी ६० लाख असून एलआयसी ही जगात सर्वाधिक संख्येने विमा पॉलिसी विकणारी कंपनी आहे. सर्वसाधारण विमा व्यवसायातील या २९ कंपन्यांपैकी सहा कंपन्या सरकारी मालकीच्या असून यापैकी अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी इडिया लिमिटेड ही कृषी विमा व्यवसायात तर जनरल रि-इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया ही पुनर्विमा व्यवसायात आहे. सरकारी मालकीच्या अन्य चार कंपन्या सर्वसाधारण विमा व्यवसायात आहेत. सर्वसाधारण विमा व्यवसायाची मुख्यत्वे आरोग्य विमा आणि मालमत्ता विमा अशी विभागणी होते. भारतात अपोलो म्युनिच, स्टार हेल्थ, मॅक्स बुपा, सिग्ना टीटीके हेल्थ, रेलिगेअर हेल्थ या कंपन्या फक्त आरोग्य विम्याच्या व्यवसायात आहेत तर एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरन्टी कॉर्पोरेशन आणि अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी इंडिया लिमिटेड या कंपन्या अनुक्रमे फक्त निर्यात विमा व कृषी विमा व्यवसायात आहेत.

एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ (एप्रिल २०१६ ते मार्च २०१६चे आकडे अद्याप जाहीर झालेले नाहीत) या काळात विम्याच्या पॉलिसीच्या प्रथम हप्ते उत्पन्नात २२ टक्के वाढ झाली असून सर्वसाधारण विमा व्यवसायाच्या प्रथम हप्ते उत्पन्नात २६ टक्के वाढ झाली आहे. या काळात सर्व विमा कंपन्यांनी नवीन पॉलिसीच्या पहिल्या हप्त्यापोटी आणि विम्याचे नूतनीकरण मिळून १ लाख २५ हजार कोटी गोळा केले. मागील दहा वर्षांत सर्वसाधारण विमा व्यवसाय (पहिला हप्त्यापोटी जमा झालेला निधी) १२ टक्के दराने वाढला असून येत्या २०२२ पर्यंत ही वाढ १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

आयसीआयसीआय बँकेने लोम्बार्ड जनरल इन्शुरन्ससोबत संयुक्तरीत्या प्रवर्तित केलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स लिमिटेडची स्थापना २००० मध्ये झाली. ही कंपनी अग्नी विमा, मोटार विमा, अपघाती विमा, आरोग्य विमा, वैयक्तिक अपघात विमा, समुद्रातून सामान पाठविण्याच्या नुकसानीपोटी काढावयाचा विमा इत्यादी प्रकारचे विमा विकते. या मुख्य व्यवसायाव्यतिरिक्त, ही कंपनी पुनर्विमा, ग्रामीण ऋण विमा, गृह विमा व्यवसाय करते.

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स लिमिटेडकडे विविध प्रकारची विमा उत्पादने असून सर्वसाधारण विमा व्यवसायात ही कंपनी आघाडीच्या कंपन्यांतील एक समजली जाते. आयसीआयसीआय बँकेसारख्या बलाढय़ संस्था प्रवर्तक असल्याने व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक असलेली गुंतवणूक वेळोवेळी केली असून व्यवसाय विस्तारासाठी तंत्रज्ञानावर कंपनीचा भर आहे. विमा प्रतिनिधी आणि इन्शुरन्स ब्रोकर्स या पारंपरिक विक्री साधनांसोबत टेली सेल्स, ऑनलाइन प्लॅटफॉर्म यासारख्या आधुनिक साधनांचा वापर करीत आहे. विम्याचे हप्ते हा कंपनीचा मुख्य आर्थिक स्रोत तर विम्याच्या दाव्याची पूर्तता आणि, पुनर्विम्यापोटी भरावा लागणारा हप्ता हे मुख्य खर्च आहेत. विमा व्यवसाय स्थिर व्यवसाय समजला जातो आणि हा व्यवसाय आर्थिक आवर्तनावर अवलंबून नसतो. हा समभाग गुंतवणुकीचा गाभा (कोअर होल्डिंग) म्हणून समावेश करावा असा आहे. समभाग विक्री १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान खुली राहणार असून १० रुपये दर्शनी मूल्यांच्या समभाग विक्रीसाठी ६५१ ते ६६१ रुपये हा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. व्यक्तिगत गुंतवणूकदाराने किमान २२ समभागांसाठी आणि त्यापुढे २२च्या पटीत अर्ज सादर करायचा आहे.

भारत हा तरुणांचा देश आहे आणि लग्न तरुण वयात होत असल्याने हा देश तसा लग्नाळू वयातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्यांचा देश आहे. भारतात लग्न हा सामाजिक प्रतिष्ठेची गोष्ट असल्याने लग्न हे दोन घराण्यांत तोलले जाते. म्हणून वऱ्हाडी मंडळींना त्याचे मोल असते. म्हणूनच भारतामध्ये लग्नाची मोठी बाजारपेठ आहे आणि लग्नसेवा देणाऱ्यांचे ट्रेड शोजसुद्धा होत असतात. अशा तऱ्हेने तोलामोलाचे लग्न होण्यातील पहिली पायरी म्हणजे अनुरूप वधू किंवा वराचा शोध घेणे. कालानुरूप शोध घेण्याच्या साधनात बदल झाले तरी बहुतांश लग्न कांदे-पोहे आणि चहानंतरच निश्चित होतात. अशाच लग्नसेवा व्यवसायात असलेल्या मॅट्रीमोनी डॉट कॉम लिमिटेड या कंपनीची प्राथमिक विक्री आजपासून सुरू होऊन १३ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. ५ रुपये दर्शनी मूल्याच्या समभागाच्या विक्रीसाठी ९८३ रु. ते ९८५ रु. हा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला असून किमान १५ समभागांसाठी अर्ज व्यक्तिगत गुंतवणूकदारांनी करावयाचा आहे. कंपनी वधू-वर संशोधनासाठी ऑनलाइन मंच वापरण्याची सेवा आणि लग्न पार पाडण्याचीही सेवा देते. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतील वेगवेगळी भाषा बोलणाऱ्यांसाठी वेगवेगळे उपमंच भारत मॅट्रीमोनी डॉट कॉम या नाममुद्रेअंतर्गत उपलब्ध आहेत. या सेवेने भारताच्या अन्य भागांच्या तुलनेत दक्षिण भारतात ही सेवा विशेष लोकप्रिय आहे.

भारताच्या लोकसंख्येच्या ढाच्याप्रमाणे भारतात वय वर्षे १८ ते ३० दरम्यानच्या वधू आणि २१ ते ३५ दरम्यानचे वर असे दरवर्षी ३० कोटी युवक-युवती लग्नबंधनासाठी तयार होतात. लोकसंख्येचा हा घटक (जवळपास एक चतुर्थाश) वधू किंवा वर संशोधन करीत असतो. भारताच्या या वयातील एकूण लोकसंख्येच्या ५९ टक्के लोकसंख्या अविवाहित आहे. तसेच एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के लोकसंख्या या वयोगटातील असल्याने भविष्यातसुद्धा या प्रकारच्या सेवांना मागणी राहणार आहे. एका अंदाजानुसार दर वर्षी ११ ते १२ लाख लग्नात प्रत्येकी ५ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च होत असतो. भारत २०२० मध्ये जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश होणार असल्याने इंटरनेट आधारित वधू-वर सूचक व्यवसायात असलेल्या या कंपनीला उज्ज्वल भवितव्य आहे. या दोन्ही कंपन्यांचा समभागांचा विचार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी करावयास हरकत नाही.