16 January 2019

News Flash

मिसेस मधुरा सानेंचा फंड..

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्ल्यूचीप इक्विटी फंड

|| वसंत माधव कुळकर्णी

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्ल्यूचीप इक्विटी फंड

मागील आठवडय़ात पडद्यावर आलेल्या ‘बकेट लिस्ट’मुळे मराठीत एका नवीन शब्दाची भर पडली. आपल्या इच्छा-आकांक्षांची यादी म्हणजे बकेट लिस्ट! इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यास पैशाची पुरेशी बचत असावी लागते. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटातील नायिका मिसेस मधुरा साने ही पुण्यातील एका उच्चभ्रू सुखवस्तू घरातील गृहिणी आहे. आजचा फंड मधुरा साने या उच्च मध्यममार्गी गृहिणीच्या गुंतवणूक गरजांची पूर्तता करणारा फंड आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्ल्यूचीप फंडाला २३ मे २०१८ रोजी १० वर्षे पूर्ण झाली. या दहा वर्षांत दरमहा पाच हजार रुपयांची नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या सहा लाखांचे १ जून २०१८ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १३.८४ लाख रुपये झाले आहेत. परताव्याचा वार्षिक दर १६.१९ टक्के आहे. २३ मे २००८ रोजी या फंडात एकरकमी गुंतविलेल्या रकमेचे १ जून २०१८ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ४.०१ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १४.८५ टक्के आहे. या दहा वर्षांत या फंडाला चार निधी व्यवस्थापक लाभले. या फंडाची धुरा सध्या एस. नरेन आणि रजत चांडक यांच्याकडे आहे. ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार फंडाची मालमत्ता ३० एप्रिल २०१८ रोजी १७,१४१.९१ कोटी रुपये होती. या दहा वर्षांत ४० पैकी ३८ तिमाहीत फंडाची कामगिरी संदर्भ निर्देशांकापेक्षा सरस झाली आहे. २००८ मधील भांडवली बाजारातील वैश्विक घसरणीनंतर या फंडाची सुरुवात झाली याची नोंद घेणे गरजेचे आहे. भांडवली बाजारातील खडतर कालावधीत सुरुवात झालेल्या या फंडाची दहा वर्षांतील कामगिरी म्हणूनच समाधानकारक म्हणायला हवी. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये फंड निवडीसाठी जे निकष वापरले जातात त्या निकषांची हा फंड पूर्तता करीत असल्याचे दिसून येते.

एखाद्या फंडाची तेजी-मंदीच्या कालावधीतील कामगिरी जोखण्यासाठी ‘मार्केट कॅप्चर रेशो’ हे गुणोत्तर वापरले जाते. लार्ज कॅप फंडाच्या मागील पाच वर्षांतील तेजीच्या कालावधीतील फंडाचा ‘अप मार्केट कॅप्चर रेशो’ आणि मागील पाच वर्षांतील मंदीच्या कालावधीतील ‘डाऊन मार्केट कॅप्चर रेशो’ कोष्टक क्रमांक १ मध्ये दाखविले आहेत. सर्वच फंडाचे ‘अप मार्केट कॅप्चर रेशो’ १०० पेक्षा अधिक असल्याने तेजीत संदर्भ निर्देशांकाहून अधिक नफा आणि ‘डाऊन मार्केट कॅप्चर रेशो’ १०० पेक्षा कमी असल्याने मंदीत निर्देशांकापेक्षा कमी नुकसान देणारे फंड आहेत. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्ल्यूचीप फंडाची कामगिरी तेजी आणि मंदीच्या कालावधीत समाधानकारक असल्याची ग्वाही ‘मार्केट कॅप्चर रेशो’ देत आहेत.

दोन ठरावीक दिवसांतील वृद्धी किंवा घसरण अर्थात ‘पॉइंट टू पॉइंट परफॉर्मन्स’पेक्षा ‘रोलिंग रिटर्न्‍स’ अर्थात चलत सरासरी हा फंड निवडीसाठी सर्वमान्य निकष आहे. सर्वसाधारणपणे तीन किंवा पाच वर्षांची चलत सरासरीच्या निकषांवर निवड केल्यास फंड सहसा अपेक्षाभंग करीत नसतात. तीन वर्षांच्या चलत सरासरीचा सोबतचा आलेख पाहता मागील चार-पाच वर्षांत फंडाने संदर्भ निर्देशांकाहून सरस कामगिरी केल्याचे दिसून येते.

एखाद्या फंडाला सातत्याने अव्वल कामगिरी करणे कठीण असते, परंतु कामगिरीत सातत्य राखणे शक्य असते. हा फंड लार्ज कॅप फंड गटात पहिल्या वा दुसऱ्या स्थानावर नसला तरी मागील दहा वर्षे संदर्भ निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी केलेला फंड आहे. फंड निवडीसाठी नेमके कुठले निकष असावेत याबाबतीत फंड विश्लेषकांमध्ये मतमतांतरे असू शकतील. भारतात बहुसंख्य आणि विशेषत: पोथीनिष्ठ विक्रेते क्वार्टाइल रॅकिंग निकष वापरतात. म्युच्युअल फंडाच्या क्वार्टाइल रॅकिंगची सहज उपलब्धता हे एक कारण असण्याची शक्यता आहे. त्या-त्या फंड गटातील फंडांची त्या तिमाहीतील कामगिरीनुसार पहिले २५ टक्के फंड टॉप क्वार्टाइल रॅकिंगमध्ये येतात. अमेरिकेतून गुंतवणूकविषयक गणिती संशोधनावर आधारित लेख प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकात Persistence of Mutual Fund Performance या शीर्षकाचा एका लेखात क्वार्टाइल रॅकिंग ही फंड निवडीपेक्षा फंड टाळण्याची पद्धत असल्याचे या संशोधकाचे मत होते. फंड निवडीचे नवीन सुधारित निकष लावल्यास लार्ज कॅप गटात आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्ल्यूचीप फंड हा एक उमदा पर्याय असल्याचे दिसून येते. प्रत्येकाच्या आशा-आकांक्षाची ‘बकेट लिस्ट’ वेगळी असली तरी तिला आर्थिक बळ देणारे साधन म्हणून या फंडाचा विचार गुंतवणूकदारांनी करावा.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

First Published on June 4, 2018 12:05 am

Web Title: icici prudential focused bluechip equity fund 2