|| वसंत माधव कुळकर्णी

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मिड कॅप फंड

मागील सात महिन्यांत गुंतवणूकदारांनी मिड कॅप निर्देशांकाची मोठी घसरण अनुभवली आहे. ९ जानेवारी रोजी मिड कॅप निर्देशांकाने १८,१७३.९१ या पातळीवर शिखर गाठल्यानंतर मिड कॅप निर्देशांकात मोठी घसरण होत, १९ जुलै २०१८ रोजी निर्देशांकाने १४,९९९ चा तळ गाठून पुन्हा वरच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. हा दिशाबद्दल मिड कॅप फंडाचा नव्याने विचार करण्याचा शुभसंकेत आहे.

जानेवारी २०१२ पासून सुरू झालेल्या मिड कॅप फंडाच्या घोडदौडीला जनेवारी २०१८ मध्ये खंडित झाली. १ जानेवारी २०१८ ते ३१ जुलै २०१८ दरम्यान बीएसई मिड कॅप फंडात १५ टक्कय़ांची घसरण झाली तर याच कालावधीत सेन्सेक्स ५ टक्कय़ांनी वधारला. दीर्घकालीन गुंतवणुकीतून संपत्तीची निर्मिती करण्यासाठी मिड कॅप गुंतवणुकीसारखे दुसरे साधन नाही. १ ऑगस्ट २०१३ रोजी मिड कॅप फंडात केलेल्या गुंतवणुकीवर, ३१ जुलै २०१८ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार पाच वर्षांत सर्वाधिक वार्षिक नफा ३०.६८ टक्के एल अँड टी मिड कॅप फंडाने तर बडोदा पायोनियर मिड कॅपने सर्वात कमी नफा ११.७ टक्के दिला आहे. १ ऑगस्ट २००८ रोजी मिड कॅप फंडात केलेल्या गुंतवणुकीवर ३१ जुलै २०१८ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १० वर्षांत सर्वाधिक वार्षिक परतावा २०.६९ टक्के तर सर्वात कमी वार्षिक परतावा १०.२७ टक्के असा आहे. मिड कॅप फंडांची पाच वर्षांतील वार्षिक परताव्याची सरासरी २५.७६ टक्के तर दहा वर्षांतील परताव्याची सरसरी १६.३० टक्के आहे.

मागील अडीच वर्षांत या सदरातून सहा मिड कॅप फंडांची शिफारस केली गेली. या सहाही फंडांची कामगिरी मिड कॅप फंड गटातील सरासरीपेक्षा सरस आहे, हे विशेष. मागील सात महिन्यांत गुंतवणूकदारांनी मिड कॅप निर्देशांकाची मोठी घसरण अनुभवली आहे. ९ जानेवारी रोजी मिड कॅप निर्देशांकाने १८,१७३.९१ या पातळीवर शिखर गाठल्यानंतर मिड कॅप निर्देशांकात मोठी घसरण होत, १९ जुलै २०१८ रोजी निर्देशांकाने १४,९९९ चा तळ गाठून पुन्हा वरच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. हा दिशाबद्दल मिड कॅप फंडाचा नव्याने विचार करण्याचा शुभसंकेत आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मिड कॅप फंडाची पहिली एनएव्ही २८ ऑक्टोबर २००४ रोजी जाहीर झाली. फंडाच्या पहिल्या एनएव्हीपासून ५ हजार रुपयांची नियोजनात्मक गुंतवणूक (एसआयपी) करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या ८.३० लाखाच्या गुंतवणुकीचे ८ ऑगस्ट रोजीचे मूल्य २६.८२ लाख रुपये होते. या फंडाने या नियोजनात्मक गुंतवणुकीवर वार्षिक १५.७९ टक्के दराने परतावा दिला आहे. तर पहिल्या एनएव्हीवर एकरकमी १ लाखाच्या गुंतवणुकीचे ८.८० लाख रुपये झाले असून वार्षिक परतावा १८.९६ टक्के आहे. ३१ जुलै २०१८ रोजी फंडाची मालमत्ता १५३५ कोटी रुपये होती. २००९, २०१२ आणि २०१७ या तेजीच्या कालावधीत या फंडाचा परतावा मिड कॅप फंडांनी दिलेल्या सरासरी परताव्याहून अधिक राहिला आहे. मागील पाच वर्षे जानेवारी-डिसेंबर कालावधीतील परताव्याची कामगिरी या कालावधीतील अन्य फंडाच्या परताव्याच्या तुलनेत समाधानकारक राहिलेली आहे. प्रत्येक वर्षी फंडाचा वार्षिक परतावा १२ ते १४ टक्के दरम्यान राहिला आहे.

निधी व्यवस्थापक गुंतवणुकीसाठी समभागाची निवड करताना ‘बिझनेस स्केलेबिलिटी’, ‘कॉपरेरेट गव्हर्नन्स’ या गुणात्मक तर ‘रिटर्न ऑन कॅपिटल’, ‘फ्री कॅश फ्लो’ ‘अर्निग ग्रोथ’ व इतर संख्यात्मक बाबी विचारात घेऊन केल्या जातात. मितुल कालवाडीया आणि मृणाल सिंग हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक सेवा, रसायने, वाहन पूरक उत्पादने, गैरबँकिंग वित्तीय कंपन्या आणि अभियांत्रिकी आणि भांडवली उत्पादने या उद्योगांतून आहे. फंडाच्या गुंतवणुकीत द इंडियन हॉटेल्स, एक्साइड इंडस्ट्रीज, टाटा केमिकल्स, थॉमस कुक, पीआय इंडस्ट्रीज, फोर्टिस हेल्थकेयर, कोलगेट पामोलिव्ह, द फेडरल बँक, इंजिनीयर्स इंडिया, एआयए इंजीनियरिंग हे दहा आघाडीचे समभाग आहेत. फंडाच्या एनएव्हीच्या चढ-उताराची टक्केवारी अन्य मिड कॅप फंडाच्या टक्केवारीपेक्षा कमी आहे

भारतीय गुंतवणूकदारांच्या बचतीचा ओघ म्युच्युअल फंडांकडे वाढला असला तरी एकूण उपलब्ध साधनांचा विचार करता केवळ म्युच्युअल फंडाचा वाटा १३ टक्के राहिलेला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार अभौतिक साधनांचा विचार करता बँकांच्या मुदत ठेवी आणि त्या खालोखाल जीवन विमा उत्पादने अजूनही भारतीयांना सर्वाधिक प्रिय आहेत. जमीनजुमला, स्थावर मालमत्ता आणि सोन्याचा बचतीचा अंतर्भाव केल्यास म्युच्युअल फंडाचे एकूण गुंतवणुकीत प्रमाण अजूनही एकअंकी भरेल इतके सीमित आहे. समभाग गुंतवणुकीबद्दल अजूनही भारतीयांच्या मनात भीती आणि महागाईमुळे बचतीचे होणारे अवमूल्यन याबद्दल अशिक्षितता असल्याने हे घडत असावे. समभाग गुंतवणूक आणि त्यातही मिड कॅप संपत्तीच्या निर्मिती अग्रेसर ठरले आहेत. श्रावण महिन्याच्या निमित्ताने मिड कॅपच्या या पहिल्या शिवामूठीचा संपत्तीची निर्मिती करू इच्छिणाऱ्यांनी जरूर विचार करावा.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)